अंगीकारावे असे गुण

एकदा एक पिल्लू अंड्यातून निघण्यासाठी धडपडताना एका कनवाळू व्यक्तीने पाहिले आणि त्याला अंड्यातून सहजतेने बाहेर निघता यावे म्हणून अंडे हाताने फोडले. पक्ष्याचे पिल्लू बाहेर तर आले, परंतु दुस-या दिवशी मरण पावले.

अंगभूत गुणांना, साहसी कर्तृत्वाला जर कोणाचे योग्य मार्गदर्शन मिळाले तर साधारण व्यक्तीही चमत्कार घडवू शकेल. राजा धनानंदाने केलेला अपमान सहन न झाल्याने आर्य चाणक्याने गुराख्याच्‍या मुलाला प्रशिक्षित करून चक्रवर्ती राजा चंद्रगुप्त बनविले. स्वत: अनुभवातून मनुष्याला शिकायला, समजायला बराच अवधी लागतो. मात्र, दुस-याच्‍या अनुभवातून तो लवकर प्रशिक्षित होऊ  शकतो. म्हणून इतरांनी केलेल्या चुका टाळण्याकडे ज्‍याचा कल असतो तोच भविष्यात यशस्वी बनतो. तो इतरांच्‍या तुलनेत झपाट्याने प्रगती करू शकतो, परंतु यशस्वी होण्यासाठी अशा व्यक्तीला कमी संघर्ष करावा लागला असेल तर त्याचे यशही एक जोखीम असते, हे गृहीत धरून त्याने पुढचे नियोजन करणे अपेक्षित असते.

निसर्गनियमानुसार संघर्ष करणाराच आकाशी भरारी घेऊ शकतो. कोणत्याही यशाचा शॉर्टकट नसतो. मानवी कल्पकतेने तो कमी करता येऊ शकतो एवढे निश्चित. खेचरांची पिल्ले अंड्यातून जन्माला येतात. एकदा एक पिल्लू अंड्यातून निघण्यासाठी धडपडताना एका कनवाळू व्यक्तीने पाहिले आणि त्याला अंड्यातून सहजतेने बाहेर निघता यावे म्हणून अंडे हाताने फोडले. पक्ष्याचे पिल्लू बाहेर तर आले परंतु दुस-या दिवशी मरण पावले. नंतर त्या व्यक्तीच्‍या लक्षात आले की अंड्यातून बाहेर येण्यासाठी पिल्लाला जी कसरत करावी लागते त्यामुळेच त्याच्‍या पंखांना बळ मिळते आणि या बळाच्‍या भरवशावरच ते पिल्लू आकाशात उंच भरारी घेते. आपण त्या पिल्लाची मदत करून त्याला असहाय केले. परिणामी, त्या पिल्लाच्‍या मरणाला आपणच कारणीभूत ठरलो. म्हणून जे पालक आपल्या मुलांची खूप काळजी घेतात, एवढी की ब-याच मुलांना संघर्ष काय, हेच समजत नाही. तीच मुले पुढे जबाबदारी पेलण्यात असमर्थ ठरतात. म्हणून थोडी का होईना जबाबदारी मुलांवर टाकायला हवी. म्हणजे येणारी पिढी प्रबळ मानसिकतेची बनेल. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ते सज्‍ज राहतील. परिस्थितीपुढे ते घुटणे टेकणार नाहीत. निसर्गनियमानुसार जितका अधिक संघर्ष ते करतील तेवढे अधिक मानसिक बळ त्यांना लाभेल व ते जीवनात कठीणातील कठीण प्रसंग सहजतेने हाताळतील. 

कोणतेही यश सहजासहजी मिळत नसले तरी ते मिळणारच नाही म्हणून संघर्ष करणे सोडून देणे यापेक्षा अधिक मूर्खपणा दुसरा असू शकणार नाही. म्हणून यश मिळविण्यासाठी जेवढा संघर्ष आवश्यक असतो तेवढाच यश मिळेपर्यंतचा संयमही आवश्यक असतो. अर्थात, संघर्षाएवढेच महत्त्व संयमाचेही आहे. तुम्हा-आम्हा सर्वांमध्ये खूप क्षमता आहेत. या क्षमतांना आपणच मर्यादा घालून प्रतिबंधित केले आहे. थोड्या यशात हुरळून जाणारे आपण बाजारात मर्दुमकी न गाजवता बायकात बडबडतो. 

कमजोर व्यक्तिमत्त्वाची ओळख त्याच्‍या दैनंदिन वागण्याच्‍या अवलोकनावरून सहज करता येऊ  शकते. जो व्यक्ती आपल्या कर्तृत्वाबद्दल घरात बायकांजवळ अधिक बडबड करतो, जो व्यक्ती इतरांसमोर आपल्या नोकरांवर अनावश्यक चिडतो, जो न केलेल्या कामाचेही क्रेडिट स्वत:कडे घेतो, जो मोठ्या व्यक्तींशी आपले संबंध असल्याची बतावणी इतरांसमोर करीत असतो, जो घरातील बायकांच्‍या कार्यात अनावश्यक हस्तक्षेप करीत असतो, कामाच्‍या व्यस्ततेमुळे मला वेळच मिळत नाही अशी बतावणी करून जो सामाजिक जबाबदारी झटकतो, जो इतरांची मदत करताना स्वार्थी वृत्तीचा परिचय देतो, जो दुस-याच्‍या कार्यात यासाठी सहभाग घेतो. कारण, पुढे त्याने आपल्या कार्यात सहभाग घ्यावा ही अपेक्षा ठेवतो. जो नेहमी स्वत:ऐवजी इतरांच्‍या डोक्याने विचार करतो. जो मोठ्याला खुश ठेवण्यासाठी कमजोर व्यक्तीवर अत्याचार करतो. अशी व्यक्ती  कमजोर, घातकी, परावलंबी व अपयशी असते. यापैकी कोणताही दुर्गुण आपल्यामध्ये असेल, तर वेळीच त्याला बाहेर करा. अवलंबित्व सोडा, आळसाला दूर लोटा, महत्त्वाकांक्षेला जागवा आणि ख-या अर्थाने माणसासारखे यशस्वी जीवन जगा.   


(Visit  SanjayNathe.com  for more articles)

Leave a Comment