तुमच्यासारख्या महान व्यक्तीकडे काम करण्याची संधी मिळाली, हीच फार मोठी उपलब्धी आहे. आपली कंपनी अधिक मोठी होईल आणि त्या कंपनीच्या वाटचालीत माझा काही वाटा आहे, असे मला जेव्हा वाटेल, तेव्हाच मी वाढीव पगाराचा आनंदाने स्वीकार करेन. – डेव्हिड
छोट्या डेव्हिडला कामाची अत्यंत आवश्यकता होती. तो अनेक दुकानांत काम मागायला गेला. तिथे तो तेथील कर्मचा-यांना भेटायचा. येथे कामगाराची एखादी जागा रिकामी आहे का, असा विचारायचा. बहुतेक ठिकाणी त्याची कर्मचा-यांकडून खिल्ली उडवली जायची. डेव्हिडला मोठे वाईट वाटायचे. अनेक ठिकाणी कर्मचारी कामचुकारपणा करताना डेव्हिडने अनुभवले होते. ‘मला जर अशा ठिकाणी काम मिळाले, तर दोन-तीन कर्मचा-यांचे काम मी एकटाच करू शकेल,’ असा विचार डेव्हिडच्या मनात यायचा. मात्र, त्याच्याकडे कोणतेच काम नव्हते. उपासमारीमुळे त्याचे शरीर खंगले होते. फार मोठी ताकद एकवटून त्याने हिंमत केली व तो पिलार्ड कंपनीचे मालक लॉर्ड मॅकनवेल्थ यांना भेटला. मी कोणतेही काम प्रामाणिकपणे व तुम्ही द्याल त्या पगारावर करेल, अशी विनंती करून त्याने मॅकनवेल्थ यांच्याकडे नोकरीसाठी विनवणी केली. त्यांनाही स्लीपरची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी अत्यल्प पगारावर डेव्हिडची नेमणूक केली. शेवटी स्लीपरचे काम ते. त्यामुळे डेव्हिडच्या कार्यक्षमतेविषयी किंवा पगारवाढीविषयी कोणीही लक्ष दिले नाही. पाहता-पाहता दोन वर्षे उलटली. मात्र, डेव्हिडने पगारवाढीसाठी कधीही विनंती केली नव्हती. तो प्रामाणिकपणे काम करायचा आणि विशेष म्हणजे, त्याने दोन वर्षांत सुटी तर घेतली नाहीच; शिवाय सुटीच्या दिवशीही तो कार्यालयात झाडपूस करून व पूर्णवेळ थांबूनच घरी जायचा. कामाप्रति डेव्हिडची प्रामाणिकता मॅकनवेल्थच्या नजरेतून कशी सुटणार! त्यांनी एकदा डेव्हिडला सहज विचारले, ‘मार्केटिंगचे काम करणे तुला आवडेल का?’ डेव्हिडने आनंदाने त्यांना होकार दिला.
मार्केटिंगविषयी डेव्हिडला फारशी माहिती नव्हती. मात्र, त्याच्या गरजा पूर्ण होतील, एवढी पगारवाढ त्याला मिळाली होती. पहिल्याच महिन्यात त्याचे काम इतर एक्झिक्युटिव्ह एवढे होते. त्याला मिळालेल्या टी.ए. व डी.ए.च्या भत्त्यातून शिल्लक राहिलेली रक्कम त्याने कंपनीकडे जमा केली. लॉर्ड मॅकनवेल्थला आश्चर्याचा धक्काच बसला. सर्व एक्झिक्युटिव्ह अधिक टी.ए. व डी.ए.ची मागणी करीत असताना डेव्हिडने अधिक तर सोडाच, दिलेल्या भत्त्यातील रक्कमही कंपनीकडे जमा करावी, याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत असे सर्वप्रथमच घडले होते. त्यांनी डेव्हिडला पुन्हा पगारवाढ दिली. आता डेव्हिडने पूर्ण कार्यक्षमता पणाला लावून काम करायला सुरुवात केली.
डेव्हिडच्या कामाचा उरक, त्याची काम करण्याची अफाट क्षमता पाहता लॉर्ड मॅकनवेल्थ यांनी त्याला बढती देऊन सहा महिन्यांच्या आतच दुप्पट पगारवाढ देण्याचे घोषित केले. डेव्हिड मात्र मॅकनवेल्थकडे जाऊन म्हणाला, ‘तुमच्यासारख्या महान व्यक्तीकडे काम करण्याची संधी मिळाली, हीच फार मोठी उपलब्धी आहे. आपली कंपनी अधिक मोठी होईल आणि त्या कंपनीच्या वाटचालीत माझा काही वाटा आहे, असे मला जेव्हा वाटेल, तेव्हा मी वाढीव पगाराचा आनंदाने स्वीकार करेन. आता तर मी केवळ माझे कर्तव्य बजावत आहे, त्यामुळे मला वाढीव पगाराची आवश्यकता नाही.’ डेव्हिडची पगार न वाढवण्याची सूचना खरोखरच थक्क करणारी व सामान्याला कर्माप्रति अधिक जागरुकतेची शिकवण देणारी होती. जेव्हा डेव्हिडने पगारवाढ नाकारली, तेव्हा कंपनी जेमतेम तीस हजार पौंडांची वार्षिक उलाढाल करायची. तेथून एकाच वर्षात कंपनीची उलाढाल दोन लाख चाळीस हजार पौंड इतकी झाली. अर्थातच, कंपनीच्या वाढीत डेव्हिडचा वाटा मोठा होता. आता मॅकनवेल्थ यांनी दिलेली पगारवाढ डेव्हिडने आनंदाने स्वीकारली, तसेच कंपनीने दिलेल्या डायरेक्टरपदाचाही सन्मानाने स्वीकार केला. याउलट, त्याच कंपनीत अनेक वर्षांपासून कार्य करणा-या कर्मचा-यांच्या परिस्थितीत मात्र विशेष फरक पडलेला नव्हता. अर्थात, प्रामाणिकत्व जपल्यास त्याच्या परतफेडीत उशीर लागला तरी चालेल; पण त्याची परतफेड होणार, हे निश्चित असते.
ही केवळ बोधात्मक कथा नव्हे, तर वास्तविकता आहे. आजच्या तरुणांसाठी ते केवळ प्रेरणात्मक विचार नाहीत तर भविष्यातील यशाची नांदी आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. रिकामे राहण्यापेक्षा जे तरुण मिळेल ते काम करतात आणि पगाराला दुय्यम स्थान देतात; भविष्यात पगारच त्यांच्यामागे धावतो. याउलट, मनाजोगा पगार मिळत नाही म्हणून जे रिकामे राहतात, ते केवळ अमूल्य वेळेचा अपव्ययच करीत नाहीत; तर जीवनात मिळणा-या नवीन अनुभवालाही मुकतात. मोठे होण्यासाठी मोठ्या विचारांची गरज असते, मोठ्या पगाराची नाही. प्रामाणिकपणे कार्य करणा-याला भलेही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला, तरी अंतिम विजय त्याचाच असतो, एवढे निश्चित.
( See SanjayNathe.com for similar articles .)
I want to to thank you for this good read!! I certainly loved every little bit of it. I have you bookmarked to look at new things you postÖ