आपलं आयुष्य कोण घडवतं. आपले आजुबाजूचे लोकं, आपली परिस्थिती की, आपली गृहितकं! आपले विचार आणि अनुभवातून निर्माण झालेली गृहितकं आपल्या आयुष्याला दिशा देतात. पूर्वानुभवातून चुकीची निर्माण झालेली गृहितकं बदलता येत नाही का? अपयशाचा लागलेला डाग, यशामध्ये बदलता येणार नाही का? बदलता येतो. त्यासाठी आपल्याला आपलीच विचारपद्धती समजून घ्यायची आणि हव्या त्या दिशेनं बदलण्याची गरज असते. जगायचं कसं! हसतं की कण्हत, हे शेवटी आपल्यालाच ठरवायचं असतं.
”आपल्या सगळ्या त्रासदायक भावना आणि अतार्किक वागण्यामागे मनात चालणारे अतिरेकी विचार असतात.’’ हे डॉ. अल्बर्ट एलिस या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचं एक मुख्य तत्त्व. हे असे विचार असतात जे प्रत्यक्षात उतरलेलेच नसतात. आपण असं केलं, तर लोक अशी प्रतिक्रिया देतील, अशाप्रकारचं हे गृहितक असतं. उदाहरणार्थ, आपण परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर….. आता विचार करून बघा, तुमच्या मनात कोणकोणते विचार येतात ते. बरं, आज हा प्रश्न अपघातानं तुमच्या मनात निर्माण झाला. पण तुम्ही झोपतांनाही त्याचाच विचार करत होता. या एकाच प्रश्नानं झोप येत नव्हती. दुस-या दिवशी तर सारखा तोच प्रश्न डोक्यात घुटमळायला लागला. कुणीही समोर दिसलं की, एकदम डोक्यात यायचं ‘आपण फेल झालो, तर हे काय प्रतिक्रिया देतील. आपल्याला नालायक तर ठरवणार नाहीत ना!’ आपल्याच अशा अतिरेकी विचारांनी आपल्या भावनासुद्धा भीतीदायक बनतात. सातत्यानं तोच तो विचार केल्यामुळं ती फेल्युअरची नकारात्मक बाब तुमच्या अवचेतन मनात जागा मिळवते आणि नकारात्मक विचारांची एक चेन रिअॅक्शन सुरू होते. जी तुमच्या दैनंदिन वागण्यावर आणि काम करण्याच्या पद्धतीवरसुद्धा प्रभाव टाकायला लागते.
गंमत म्हणजे, ती घटनाच घडलेली नसते. ज्या विचारांमुळं तुम्ही एवढे अस्वस्थ झालात. तो जर… तर… चा विचार होता. त्या विचाराला डोक्यात घातलं कोणी? तुम्हीच ना! तुम्हीच तुमच्या मेंदूची कचराकुंडी बनवून ठेवली. कचरा टाकाल तर कचराच बाहेर येईल ना. बरं, अशा नकारात्मक बाबी अवचेतनमध्ये गेल्यावर त्याचा भयंकर परिणाम आपल्यावर आणि आपल्या वागण्यामुळे इतरांवर होत असतो. अनेक प्रकारचे संशय अशा विचारांतूनच निर्माण होतात. अशा अतिरंजीत संशयाला थोडा जरी वास्तविकतेचा धागा मिळाला तरी त्या धाग्याला पकडून हिमालयाचं टोक गाठलं जातं. हा एवढा मोठा स्फोट असतो की, यानं संपूर्ण कुटुंब, मित्रपरिवार, प्रेमीजन संशयाच्या घेराव्यात येतात. आपलेच नकारात्मक विचार आपलं किती मोठं नुकसान करतात, असला विचार करायलाही आपल्याकडे वेळ नसतो. म्हणून कितीही वाईट घटना घडो, ती आपल्या मेंदूत कशाप्रकारे टाकायची, याचं स्वातंत्र्य तर आपल्याकडेच असते ना! मग ‘आपण फेल झालो तर…..’ असा विचार करण्याऐवजी ‘आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो तर…..’ असा विचार केला आणि झोपतांनाही तोच विचार आपल्या अवचेतनमध्ये टाकला तर काय होईल?’
तुम्ही कल्पना करू शकाल का? सुरुवातीला कदाचित तुमचा अंदाज गडबडेल, पण तुम्ही जो सकारात्मक विचार सातत्याने केला असतो, काहीच दिवसात तो विचार तुमच्या भावनासुद्धा आनंदी आणि उत्साही बनवतो. तो कुटुंबातील सदस्य, मित्र, स्नेही यांच्याकडे बघण्याचा आणि त्यांच्यासोबत वागण्यातही सकारात्मक बदल घडवून आणतो. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, केवळ याच सकारात्मक विचारानं परीक्षेच्या निकालानंतर ज्या सर्वांच्या प्रतिक्रिया मिळतात त्या तुमच्या अपेक्षेपेक्षाही उत्साही असतात. ज्यांच्याकडून अपेक्षा नसते तेही तुमच्या पाठीवर शाबासकी द्यायला आलेत, हे पाहून तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. सकारात्मक विचारांचं असं असतं. ते सुगंधासारखे सर्वीकडे दरवळतं.
विचारांना थांबवता येत नाही, हे खरचं. पण आपल्याच विचारांना दिशा देण्याचं काम आपलंच असतं. परिस्थितीचा दबावच एवढा होता की, मला माझ्या डोक्यात येणारे नकारात्मक विचार थांबवताच आले नाहीत, अशीच उत्तरं अनेकांकडून ऐकायला मिळतात. ते खरंही असतं, पण दिवसातून दोन-चार क्षणही तुम्हाला तुमच्या विचारांना दिशा द्यायला मिळू शकले नाहीत, हे कसं शक्य आहे? आपल्या भावना आपल्याला आपल्याच विचारांबाबत सजग करत असतात. त्या भावनांना ओळखून लगेच आपण आपल्या विचारांना योग्य दिशेनं वळवायला हवं. नको असलेल्या, त्रासदायक विचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. ते विचार बदलण्याच्या फंदात पडू नका. विचार बदलणं म्हणजे त्याच विचारांकडे मोर्चा वळवण्यासारखं असतं. हव्या त्या विचारांना जागा मोकळी करून द्या. तुम्ही तुमच्या मनात मुद्दाम सकारात्मक विचार आणायला सुरुवात केली, तरी चांगले निकाल भेटतील. अशा वेळी त्वरित तुमच्या भावना सकारात्मक बनवतील, असे विचार करा. आपल्या जीवनात अशा कितीतरी सकारात्मक आणि खूप आनंद निर्माण करणा-या घटना घडलेल्या असतात, अशा वेळी त्या आठवायच्या. आपल्या भावना चांगल्या बनल्यात की, मग ज्यावर तुम्ही आता काम करीत आहात त्या गोष्टीला अत्यंत सकारात्मक पद्धतीने अंतिम पाडावावर घेऊन जा. अर्थात, हे तुम्हाला विचारांतच तर करायचे असते. कारण, विचारच तुम्हाला घडवतात. तेच तुमच्याकडून यश मिळविण्यासाठी आवश्यक ते कार्य करून घेतात.
हे खूप बरं आहे की, मनुष्याच्या डोक्यात एका वेळी एकच विचार येऊ शकतो. म्हणजे, तुम्ही एकाच वेळी दोन विचार करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही सकारात्मक विचार करत असाल, तर त्याच वेळी नकारात्मक विचार असू शकत नाहीत. सृष्टीनं दिलेल्या वरदानाचा आपण कसा फायदा घेतो, यावरच आपलं यशापयश अवलंबून असतं. जसं
दुस-याचा द्वेष केल्यानं आपणच इतरांच्या द्वेषास कारणीभूत ठरतो. कारण, आकर्षणाच्या नियमानुसार द्वेष द्वेषालाच आकर्षित करतो. असं कोणतंही कृत्य आपण करू नये त्यामुळं आपल्या भावना नकारात्मक होतील. कृत्य विचारांशिवाय घडत नाही. आपल्याच अनुभवातून आपण आपल्या भावनांबद्दल सांगू शकतो. कारण, कोणते विचार आपल्या भावना नकारात्मक बनवतात आणि कोणते विचार आपल्या भावना सकारात्मक बनवतात, हे फक्त ज्याचं त्यालाच कळतं. फक्त आपल्यालाच आपल्या विचारांना दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा असतो. स्वानुभवाचा हा प्रांजळ प्रयत्न तुम्हाला वेगळ्या उंचीचा प्रत्यय आणून दिल्याखेरीज राहणार नाही.
(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)
अप्रतिम लेख. आपला विचार हा नेहमी सकारात्मकच असावा त्यातून नव्या गोष्टींची पालवी निर्माण होण्यास मदत मिळते आणि आत्मविश्वास पक्का होतो.