अडचणीतच संधी मिळतात (Opportunities come with difficulty)

मी नेहमी स्वत:ला प्रश्न करतो, ‘जर हा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, तर मी आता जे करायला जाणार आहे, हे करण्याची आवश्यकता आहे का?’ त्याचं उत्तर जेव्हा जेव्हा ‘नाही’ असं आलं तेव्हा मी माझा निर्णय बदलला.   – स्टीव जॉब्ज

सध्या सर्वांनाच झटपट यशाची धुंदी चढली आहे. प्रत्येकाला यश पाहिजे असले तरी यशासाठी किंमत मोजायला कोणीही तयार नाही. यश मिळविण्यासाठी लागणारे नियोजन, कमालीची सहनशीलता, दूरदृष्टी ठेवून सुरू केलेल्या कार्यातील सातत्य मात्र आजचा तरुण हरवून बसला आहे. तो अत्यंत अधीर, चिडचिडा आणि चिंताग्रस्त भासतो, नव्हे तसा तो झाला आहे. १९७४ साली स्टीव जॉब्ज १९ वर्षांचा होता त्यावेळी आध्यात्मिक शांतीकरिता तो भारतात आला होता. सिरियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेले अब्दुलफतेह जंदाली आणि अमेरिकेतील पदवीधर तरुणी जोआन शिएबल या दोघांच्‍या पोटी २४ फेब्रुवारी, १९५५ रोजी सॅनफ्रॉन्सिस्‍को येथे स्टीव्ह यांचा जन्म झाला, परंतु त्यावेळी या दोघांचेही लग्न झाले नसल्याने कलॅरा आणि पॉल जॉब्ज या मध्यमवर्गीय जोडप्याने त्यांना दत्तक घेतले. पुढे त्याच्‍या आई-वडिलांचे लग्न झाले असले तरी स्टीव हा दत्तकपुत्र म्हणूनच ओळखला गेला.

साधारण मुलगा 

स्टीव जॉब्ज कॉलेज वयात अत्यंत हुशार मुलांपैकी एक असा टॅलेंटेड मुलगा नव्हता. हायस्कूलमध्ये असतानाच  त्याला एका कंपनीत पार्ट-टाईम जॉब करावा लागला. ‘ऑडिटिंग’ च्‍या प्रथम सत्र परीक्षेतच तो नापास झाला. तोपर्यंत त्याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. मात्र, ऑडिटिंगच्‍या वर्गात बसता यावे म्हणून स्टीव मित्राच्‍या खोलीवर राहायचा आणि कोकच्‍या बॉटल विकून मिळणा-या पैशातून गुजराण करायचा.

२५ व्या वर्षी लक्षाधीश

१८७४ ला भारतात आलेल्या स्टीवने १९७६ मध्ये ‘अॅपल’ नावाचा संगणक तयार केला. आधुनिक तंत्रज्ञानाने झपाटलेल्या स्टीवने केवळ चार वर्षात कंपनीच्‍या संगणक आणि अन्य उत्पादनांच्‍या विक्रीने ११ कोटीचा पल्ला पार केला. त्यावेळी त्याचे वय होते केवळ २५ वर्षे. पहिल्या पर्सनल कॉम्प्युटरच्‍या यशानंतर लगेच दुस-या वर्षी जॉब्ज यांनी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा ‘अॅपल २’ संगणक तयार केला. १९८३ मध्ये त्यांनी ग्राफिक युजर, इन्टरफेस, आयकन्स, विण्डोज आणि माऊसने कर्सर फिरवता येणारा संगणक तयार केला. १९८४ मध्ये  स्वस्त आणि जलदगतीने काम करणारा संगणक बाजारात आणला.

आपल्याच कंपनीतून हकालपट्टी 

कंपनीचा चढता ग्राफ, वर्चस्वाची चढती स्पर्धाही घेऊन आली. अंतर्गत वर्चस्व मिळविण्याच्‍या स्पर्धेत स्टीव जॉब्ज मागे पडले. १९८५ मध्ये अॅपलचे सीईओ जॉन स्कुली यांनी जॉब्जना बाहेरचा रस्ता दाखवला. स्वत: निर्माण केलेल्या कंपनीतूनच हकालपट्टी होण्याची जगातील कदाचित ही पहिलीच घटना असावी.

अॅपलच्‍या लोगोत हिरवे सफरचंद होते. २०१० साली ८.३ अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेले स्टीव जॉब्ज आज हयात नाहीत. केवळ ५६ वर्षे वय लाभलेल्या या कार्पोरेट क्षेत्रातील महात्म्याने केवळ ३२ वर्षाच्‍या कारकिर्दीत जीवनाला कलाटणी देणारे संशोधन केले. कार्पोरेट क्षेत्रातील मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल पहिल्यांदाच जग हळहळले. जगातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी संपादकीय लिहून त्यांना श्रध्‍दांजली अर्पण केली. त्यांची कल्पकता, जिद्द वाखाणण्यासारखी होती. त्यांचं साधं राहणीमान आणि ग्राहकांची प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा अट्टाहास त्यांना सामान्यांच्‍या हृदयापर्यंत घेऊन गेला.

‘मृत्यू हा हाकेच्‍या अंतरावर असतो. वेळ थोडा आहे. तुमचं मन सांगतं त्या रस्त्याने जा. इतरांचं ऐकत बसू नका. मीही आयुष्यात तसंच आपल्या मनाचं ऐकत गेलो’ असे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना सांगणा-या स्टीव जॉब्ज यांना किती संकटांचा सामना करावा लागला, हे मुद्दाम सांगायला नको. यापूर्वीही आपण ‘संवाद’ मधूनच त्यांचा जीवनपट थोडक्यात पाहिला होता. त्यांनी कधीच अपयशाचा पाढा वाचला नाही किंवा आपल्या अपयशाचे खापर दुस-यावर फोडण्याचाही प्रयत्न केला नाही. जे इतरांसाठी उपयुक्त होतं आणि जे त्यांना योग्य वाटलं ते त्यांनी केले. मागे वळून पहायला कधी त्यांना वेळच मिळाला नाही.

क्षमतांची कमी कोणामध्येच नाही. अपार क्षमता असूनही त्याचा वापर करण्याचा अभाव मात्र ब-याच जणांत आढळतो. प्रत्येक अडचण ही तुम्हाला नवीन रस्ता शोधण्यासाठी निर्माण झालेली असते, ती तुम्हाला थांबविण्यासाठी नसते. त्या अडचणीतून जो मार्ग काढतो नव्हे मार्ग शोधतो तो जिद्दीने आपले ध्येयही गाठतो. म्हणून रडत बसू नका, मिळालेल्या अडचणीतही संधी शोधण्याचा प्रयत्न करा. यश तुमच्‍या केवळ बुध्दिमत्तेच्‍या नव्हे तुमच्‍या मेहनतीच्‍या, सातत्याच्‍या भरवशावरच मिळेल यावर विश्वास असू द्या.

मोठाच विचार करा ! जीवनात कमी  मिळेल अशी अपेक्षा केली तर कमीच मिळेल. जसं सामान्‍य लोकं काम करतात तसंच तुम्‍हीही कराल तर तेच मिळेल जसं अधिकांश सामान्‍य लोकांना मिळतं. काही मिळविण्‍यासाठी संघर्षाची ईच्‍छा व्‍यक्‍त कराल तर शेवटी संघर्षच मिळेल. जीवनाकडून मोठया गोष्‍टींची अपेक्षा कराल तर मोठयाच गोष्‍टी जीवनात येतील. मी येथे भौतीक बाबींविषयी बोलत नाही. मी चांगल्‍या जीवनाविषयी बोलतोय.चांगल्‍या म्‍हणजे अशा जीवनाविषयी ज्‍यामध्‍ये अपेक्षित पैसा आहे. आवडीचे काम करण्‍यासाठी पुरेसा वेळ आहे, मानसिक शांती आहे. तुम्‍ही आजच्‍या परिस्थितीत समाधान मानु शकत नाहीत, कारण तुम्‍हाला हव्‍या तशा चांगल्‍या जीवनाचे तुम्‍ही हकदार आहात. ते मिळविण्‍याचीही तुमची क्षमता आहे. यासाठी तुम्‍हाला तुमच्‍या विचारांना बदलण्‍याची गरज आहे. यासाठी तुम्‍ही मानायला हवे की तुम्‍ही सर्व चांगल्‍या गोष्‍टींसाठी हकदार आहात. म्‍हणून यशस्‍वी लोकांच्‍या अपयशापेक्षा त्‍यांनी मिळविलेल्‍या यशावर लक्ष दया. जीवनात जे हवं तेच बोला, जे नको तिकडे लक्ष देऊ नका. मोठी अपेक्षा कराल, मोठा विचार कराल आणि त्‍यावर विश्‍वास ठेवाल तर मोठेच मिळेल.

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

Leave a Comment