अनुभव महत्त्वाचा 

जीवनात कोणतीच बाब अनुपयुक्त नसते, तसेच तुम्ही पंडित बनले म्हणजे तुम्हाला पूर्णत्व प्राप्त झाले, असेही नाही. सुसंस्कारांबरोबर व्यवहारिकता शिकणेही फार महत्त्वाचे आहे.

एकदा एक विद्वान पंडित गंगा नदीच्‍या किना-यावर पोहोचले. त्यांना नदीच्‍या पलीकडील तीरावर जायचे होते. थोड्या वेळात त्यांना नौका मिळाली. नौकेत बसून ते पैलतीरावर जायला लागले. नौका नदीपात्रात मधोमध पोहोचल्यावर पंडिताने नावाड्याला प्रश्न केला, ‘तुझे शिक्षण किती झाले आहे?’ नावाडी  अशिक्षित होता. त्याने खरे उत्तर दिले. त्यावर पंडित म्हणाला, ‘शिक्षणाशिवाय जीवन म्हणजे काही जीवन आहे? तुला शिक्षण येत नाही म्हणजे तुझे एक तृतीयांश जीवन वायफळ गेले.’ थोड्या वेळाने पंडितजींनी दुसरा प्रश्न विचारला. ‘नाव वल्हविण्याशिवाय तुला दुसरे कोणते काम जमते?’ त्यावर नावाडी उत्तरला  ‘कोणतेच नाही’, पंडित म्हणाला, ‘अरे, कोणतेचकाम जमत नाही म्हणजे तुझे दोन तृतीयांश जीवन व्यर्थ गेले.’ नावाडी चूपचाप ऐकत होता. त्याला अपराध्यासारखे वाटायला लागले. तेवढ्यात जोराचा वारा सुटला आणि नौका हेलकावे खाऊ  लागली.  आता नावाड्याने प्रश्न केला, ‘पंडितजी तुम्हाला पोहता येते का?’, पंडितजींनी नकारार्थी मान हलविली. नावाडी म्हणाला, ‘पोहता येत नसेल, तर तुमचे पूर्ण जीवन व्यर्थ आहे.’ वादळ जोरात वाहत होते, नौका बुडणार असे वाटताच नावाड्याने पाण्यात उडी घेतली व पोहत पैलतीरावर पोहोचला. पंडितजीला मात्र जलसमाधी मिळाली.

जीवनात कोणतीच बाब अनुपयुक्त नसते तसेच, तुम्ही पंडित बनले म्हणजे तुम्हाला पूर्णत्व प्राप्त झाले, असेही नाही. सुसंस्कारांबरोबर व्यवहारिकता शिकणेही फार महत्त्वाचे आहे. येथे व्यवहारिकतेचा संबंध अर्थव्यवहाराशी नसून तुमच्‍या करिअरशी संबंधित आहे. आपला उद्देश ठरला असेल आणि तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल, तर तुम्ही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न प्राधान्याने केले पाहिजे. आज कोणतीही शासकीय नोकरी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय मिळत नाही. मग तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला हवा. अनेकांच्‍या बाबतीत असे घडते की, त्यांना सरकारी नोकरी पाहिजे आहे, परंतु ते स्वत: पदवीनंतर पदव्युत्तर पदवी, बी.एड, एम.एड, पीएच.डी., पुन्हा दुस-या विषयात पदव्युत्तर पदवी, अशा केवळ पदव्या घेण्याच्‍या मागे असतात. वयाची बत्तीशी उलटल्यानंतर म्हणजे, नोकरीसाठीची वयोमर्यादा संपण्याच्‍या मार्गावर असताना स्पर्धा परीक्षेच्‍या अभ्यासाला लागतात. अशा वेळी वयोमर्यादेबरोबर वेळेचा दबावही वाढतो. परिणामी, सर्वांचेच निकाल अनुकूल असतात, असे नाही.

ध्येय ठरविल्यानंतर ते मिळविण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असते. कितीही थकवा आला तरी, जो हाती घेतलेल्या कार्याला नेटाने करतो, काहीही झाले तरी जिद्द सोडत  नाही, इतर कोणतेही काम आले तरी ध्येयाला फाटा देत नाही त्याला अपयश येऊच शकत नाही. यश मिळविण्यामध्ये जेवढा वाटा तुमच्‍या बुध्दिमत्तेचा असतो त्यापेक्षा जास्त वाटा तुमच्‍या मेहनतीचा आणि सातत्याचा असतो. अपयश मिळेल, असे गृहीत धरून थांबू नका. तुम्ही ठरविलेले ध्येय तुम्ही गाठू शकता, याचा तुम्हाला आत्मविश्वास आहे ना! तुमचे मन, बुध्‍दी हो म्हणत असेल, तर मागे वळून पाहू नका. कोणतेही ध्येय असो, ते गाठताना अडचणी येणारच. अडचण आली म्हणून घाबरू नये. अडचणी तुम्हाला अधिक पुष्ट बनवितात, अडचणी सोडविल्याने जो आत्मविश्वास मिळतो तो पैसे देऊन बाजारात मिळत नाही.


( Visit SanjayNathe.com for more articles )

Leave a Comment