अपयशाचं सर्वात मोठं कारण (The biggest reason for failure)

आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीशी आपण कसं वागतो आणि आपल्यापेक्षा ताकदवर व्यक्तीसमोर किती नतमस्तक होतो, यावर आपली ओळख (Identity), वास्तविकता (Reality) ठरत असते. आदरानं नतमस्तक होणं वेगळं आणि भीतीपोटी नतमस्तक होणं वेगळं. जबाबदारीचं ओझं झुकायला भाग पाडतं, असं म्हणून आपणच आपल्यातल्या प्रचंड शक्तीचा अवमान करत असतो. हो, झुकायचं पण किती, याला काही मर्यादा असतात ना! याउलट, तुमचंच व्यक्तिमत्त्व असं असावं की, प्रत्येकानं आदरानं नतमस्तक व्हावं.

लहानपणी धावत असताना तुम्ही पडले. तुम्हाला पाहून आजुबाजूचे लोकं हसलेत. तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत एक करार (Agreement) केला की, यापुढं सर्वांसमोर धावायला नको, काही नवीन करायला नको, पडलो किंवा हरलो तर लोकं हसतील. आजही तुम्ही शर्यत तर दूरच तुम्ही इतरांसमोर धावायलाही लाजता. कारण, लोकांच्या हसण्यामुळे तुम्ही तयार केलेले Negative Belief तुम्हाला तसं करण्यापासून थांबवते. आज जेव्हा खरंच धावण्याची गरज आहे तेव्हा तुमच्यासमोर तोच नकारात्मक करार पुढं येतो. हा करार भीतीवर आधारित आहे जो नेहमी-नेहमी तुमच्यासमोर प्रगट होतो आणि तुम्हाला नवीन काही करण्यापासून थांबवतो. असा एखादा करार असता, तर काही हरकत नव्हती, परंतु तुम्ही असे शेकडो-हजारो करार स्वत:सोबत केलेले आहेत, जे तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यात संपूर्ण ताकद लावण्यापासून परावृत्त करतात, नवं काही करू देत नाहीत. कारण, अवचेतन मन इथं प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेसारखं काम करतं.  

बाल्यावस्थेत आणि कुमारवयात आपल्यासोबत अशा अनेक नकारात्मक घटना घडलेल्या असतात, ज्यामुळे तुम्हाला मित्रपरिवारात मान तुकवावी लागली, आप्तांनीही तुमची टिंगल केली, मित्र तुमच्या अपयशावर हसलेत. त्यांची टिंगल, हसणं तुम्हाला अपमान वाटलं. असा अपमान पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही त्या गोष्टींनाच खो दिला. त्याबद्दल तुम्ही तुमच्या मनात एकप्रकारे नकारात्मक भावना तयार करून ठेवलीय. अशा अनेक नकारात्मक भावनांना तुम्ही सहेजून ठेवलंय, यालाच Negative Belief System असं म्हणतात. ज्या ज्या गोष्टींबद्दल तुम्ही नकारात्मक करार केलेले असतील त्या त्या गोष्टी करण्यापासून तुमचं अंतर्मन तुम्हाला परावृत्त करतं. एखाद्याला इंग्रजीची, तर दुस-याला गणिताची भीती वाटते, याचाच अर्थ ते तुमचे Negative Belief असतात. असे नकारात्मक करार तोडणं महत्त्वाचं असतं, म्हणजे विजयाचा मार्ग सुकर होतो.   

असा मनुष्य काहीही मिळवू शकतो, ज्यानं आपल्या अवचेतन मनातल्या Negative Belief System नष्ट केल्या असतील. स्वत:शीच केलेले नकारात्मक करार, अनुबंधावर मात केलेली असेल. अशा व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक सर्व बाधा संपून गेलेल्या असतात. असा व्यक्ती जिंकण्यासाठीच लढतो. उलट, मानसिक बाधा असलेल्या व्यक्तींचे विचारच कमजोर असल्यामुळे ते प्रत्येक शर्यतीबद्दल शंका उपस्थित करतात. आपण हरलो तर, आपल्याला वेळेवर आठवलं नाही तर, आपल्याला भाषण जमले नाही तर… अशा अनेक आशंकांनी आपल्यावर ताबा मिळवलेला असतो जो तुमच्या बुद्धिमत्तेचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण करत असतो. म्हणून क्षमता व पात्रता असूनही अनेकजण प्रत्यक्ष लढाईपूर्वीच हरलेले असतात. व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा असो वा त्यासंबंधित पुस्तकं असो ते तुम्हाला तुमचे Negative Belief  तोडण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. तुम्हाला असं कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात ज्याबद्दल तुमच्या मनात Negative Belief  असतात. प्रोत्साहनामुळे तुम्ही असं कार्य करण्याची हिंमत करता आणि तुमच्या असं लक्षात येतं की, तुम्ही ज्या कामाला अवघड समजून करायलाच घाबरत होते ते अत्यंत सोपं होतं. अशा पद्धतीनं इथं Negative Belief  तुटतो आणि त्या कामाविषयीची तुमच्या मनातली भीती कायमस्वरूपी दूर होते. 

असे नकारात्मक अनुबंध तोडायचे कसे?

असे नकारात्मक अनुबंध एक-एक हद्दपार करायला फार वेळ लागू शकतो. कारण, नकळत असे हजारो अनुबंध आपल्या मस्तिष्कात कायमस्वरूपी ठसलेले असतात. म्हणून त्याऐवजी तुम्हाला हवे तसे अनुबंध तयार करा. शब्दात मोठी शक्ती असते. जे तुम्ही तुमच्याबद्दल बोलाल तसंच घडत जाणार. म्हणून तुम्हाला जे हवं, जे करायचंय त्याबद्दलच बोला. जोपर्यंत सकारात्मक अनुबंध (Positive Belief ) तयार होत नाहीत तोपर्यंत सातत्यानं बोला, विश्वासानं बोला. तोपर्यंत बोला जोपर्यंत खरोखर तुमचा विश्वास निर्माण होणार नाही. शब्द तुमच्या भावना बदलवतात आणि कार्य करायला भाग पाडतात. शब्दात जादू असते. तुमचं तुमच्याबद्दल सकारात्मक बोलणं धिरे धिरे अस्तित्वात यायला लागतं. काही नकारात्मक अनुबंध मनात खोलवर रुजलेले असतात. त्यातून सुटका मिळवण्यासाठी त्याच्या मूळ घटनेपर्यंत जाऊन त्यातून मुक्त होणं गरजेचं असतं. म्हणजे, बालपणीची ती घटना असेल, तर ती आठवून पाहून तिला नॉर्मल करणं आवश्यक असतं. याची एक पद्धती आहे. त्याबद्दल आपण पुन्हा कधी चर्चा करू. अपयशाचं सर्वात मोठं कारण Negative Belief  हेच असतं. शेवटी एवढंच म्हणेल की, तुम्ही स्वत: खूष असाल, तर दुसरा कोणीही तुम्हाला दु:खी करू शकणार नाही.

अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

1 thought on “अपयशाचं सर्वात मोठं कारण (The biggest reason for failure)”

Leave a Comment