क्षमता व एकाग्रतेएवढंच सातत्य महत्त्वाचं

जीवनात अपयशाचा सामना करता करता अनेक वेळा मनुष्य तुटून जातो. अंत:करणातून तुटलेल्या मनुष्याला सफलता मिळवणं अशक्यप्राय वाटायला लागतं. हारून तो प्रयत्नच सोडून देतो. हीच ती सर्वात मोठी चुकी असते. यश मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असतं. परिस्थिती बदलतच असते. म्हणून भूतकाळात मिळालेल्या अपयशाच्या भुताला मानगुट पकडण्याची संधी देऊ नये. पूर्ण क्षमता आणि एकाग्रतेनं पुन्हा प्रयत्नाला लागा. यश निश्चित मिळेल.

वडील कामात व्यस्त असताना त्यांचा आठ वर्षांचा मुलगा त्यांच्याकडे येऊन प्रश्न विचारत होता. लहान मुलाच्या डोक्यातले प्रश्न ते. वडील शांतपणे उत्तर द्यायचे आणि पुन्हा कामात गढून जायचे, परंतु मुलाचे प्रश्न काही संपायचे नाव घेत नव्हते. साहजिकच त्याच्या अशा प्रश्न विचारण्यानं त्यांच्या कामात व्यत्यय येत होता. त्यांनी विचार केला, याला असं काम द्यायचं जेणेकरून हा तीन-चार तास कामात राहील. म्हणून त्यांनी भिंतीवर टांगलेला जगाचा नकाशा काढला, त्याचे तुकडे केले आणि ते मुलाला म्हणाले, ‘बेटा हा जगाचा नकाशा होता. आता तो कागदाच्या चिठो-यात गायब झाला. तुला ते कागदाचे तुकडे पुन्हा जोडून जगाचा नकाशा तयार करायचाय.’ मुलगा हो म्हणाला आणि ते कागदाचे तुकडे घेऊन दुस-या खोलीत गेला. वडिलांना वाटले आता तीन-चार तास आपण शांतपणे काम करू शकतो. ते पुन्हा कामात मग्न झाले. केवळ पाच मिनिटात मुलानं आवाज लावला, ‘बाबा इकडे या, जगाचा नकाशा तयार झालाय.’ त्यांना आश्चर्य वाटलं. तिथं जाऊन बघितलं, तर खरोखरच मुलानं जगाचा नकाशा जोडलेला होता. त्यांनी आश्चर्यानंच मुलाला विचारलं, ‘बेटा, तू हे कसं केलं?’मुलगा म्हणाला, ‘तुम्ही जो जगाचा नकाशा दिला होता त्याच्या मागं माणसाचं चित्र होतं. मी तो माणूस जोडला. जग आपोआपच जुळत गेलं.’

खरंच माणूस जोडणं फार सोपं आहे. मुलासारखंच माणूस जोडण्याचा प्रयत्न केला, तर ते सोपं आहे. मुलं अशी निर्विकार असतात, पण त्यांच्यात प्रचंड कल्पकता असते. त्या कल्पकतेला तुम्ही कोणती दिशा देता त्यावरच त्या मुलाचं भविष्य असतं. तसंच जीवनात येणा-या प्रत्येक समस्येला दोन पदर असतात. तुम्हाला वाटतं की, ती समस्या एवढी मोठी आहे की, ती सोडवणं अत्यंत अवघड. म्हणून तुम्ही निराश होता. मुलाप्रमाणे कल्पकता वापरली, तर त्या समस्येला सोडवण्याचा दुसरा पदरही तुम्हाला सापडेल. समस्येचं मूळ समजून घ्या, ती सोडवण्याचा दुसरा मार्ग निश्चित सापडेल.

शिकण्याची इच्छा हवी

दोन तरुण मित्रांनी एकाच वेळी व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय ब-यापैकी चालला होता. व्यवसायात भरपूर नफा मिळाल्यामुळे पहिला मित्र निश्चिंत होता. अचानक कोरोना आला आणि व्यवसायात तोटा यायला लागला. जवळ असलेली पुंजीही संपत आली. काय करावं त्याला कळत नव्हतं. तेवढ्यात त्याच्या मित्राची कहाणी त्याच्या कानावर आली. त्याचा व्यवसाय याहीकाळात ब-यापैकी नफा कमवत होता. हे कसं शक्य आहे! ते जाणून घेण्यासाठी तो मित्राकडे गेला. मित्रानं त्याची आवभगत केली आणि त्याच्याकडे येण्याचं कारण विचारलं. त्यानं जे घडलं ते सांगितलं आणि त्याला प्रतिप्रश्न केला, ‘तुझा व्यवसाय एवढ्या सुदृढ अवस्थेत कसा?’ मित्र म्हणाला, ‘मी सुरुवातीपासूनच व्यवसायात नवनवीन गोष्टी शिकत होतो. माझ्या झालेल्या चुकांची पुनरावृत्ती तर मी टाळलीच शिवाय, दुस-यांनी केलेल्या चुकांपासूनही बोध घेत गेलो. त्यामुळे व्यवसायातले उतार-चढाव मी चांगल्या पद्धतीनं शिकू शकलो. परिणामी, मी अशा वस्तू दुकानात ठेवायला सुरुवात केली ज्या जीवनावश्यक होत्या. कोरोना आल्यावर मी जीवनावश्यक वस्तूंवर जास्त लक्ष केंद्रित केलं. परिणामी, याहीकाळात माझा व्यवसाय ब-यापैकी सुरू आहे.’

जीवन ही पाठशाळाच समजायची आणि आपण कायमच विद्यार्थी बनून राहिलो, तर शिकण्यासारखं इथं भरपूर मिळतं. कारण, जीवन प्रवाही असतं. इथं नेहमीच काहीतरी नवीन जन्माला येतं आणि जुनं पडद्याआड जात असतं. या शर्यतीत तोच जिंकतो, जो कायमच शिकत राहतो. जो थांबतो तो संपतो.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हे असंच असतं. झ-यातल्या पाण्यासारखं प्रवाही राहून स्वच्छ व शुद्ध राहायचं की, डबकं बनून राहायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.

स्पर्धा परीक्षेतही असंच

संधी कधीच संपत नसतात. मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या असोत. स्पर्धा परीक्षेद्वारा करिअर ही सुद्धा अनेक संधींपैकी एक संधीच, पण इथं जमलं नाही तर पुढं कसं, याचा विचारच अस्वस्थ करतो. जीवन एवढ्यासाठीच मिळालं का? एवढ्यावरच ते थांबतं का? नाही ना! पण या संधीच्या बाबतीत तरी तुम्ही प्रामाणिक असता का? यातही अगदीच अपवाद सापडतील. नाही तर, वेळेवर धावपळ करणारेच अधिक आणि हेच त्या स्पर्धा परीक्षेच्या काठीण्य पातळीबद्दल बोलणार. परीक्षा आली की, तासनतास अभ्यास करायचा आणि परीक्षा संपली की, अभ्यासाकडे पाठ फिरवायची. साप्ताहिकं, मासिकं, दैनिकं बंद करायची. पुस्तकांना उघडणं बंद. प्रश्नपत्रिका सोडवून पाहण्याचा प्रश्नच नाही. जाहिरात आली की, पुन्हा सर्व सुरू करायचं. असं केल्यानं काय मिळणार? तीन-चार वर्षे घालवल्यानंतर मिळालंच तर वर्ग तीनचे पद, तेही महत्प्रयासानं अन्यथा भोपळाच. सातत्याचं महत्त्व काही औरच असतं. म्हणून स्पर्धा परीक्षेद्वारा करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्‍यांनी सातत्यानं स्वत:ला स्पर्धेत ठेवणं गरजेचं असतं. अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यायची असते. ज्ञानार्जनाचे नवनवीन मार्ग शोधायचे असतात. पहा, अपेक्षेपेक्षा लवकर यश मिळतं की नाही!

                स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र जेवढं सांगितलं जातं तेवढं कठीण मुळीच नाही. थोडं बारकाईनं लक्ष द्या, आहे काय त्यात, बेस तर 6वी ते 10वी पर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचाच आहे. हे शिकण्यासाठी तुम्हाला क्लासेस लावण्याची गरज पडणार का? नाही ना! तुमच्यात ती क्षमता असतेच. योग्य वेळी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करणं आणि अभ्यासात सातत्य ठेवणं. या दोन बाबी जरी पाळल्या गेल्यात तरी यश मिळवणं तुम्ही समजता एवढं अवघड निश्चितच जाणार नाही.

पोलीस भरतीचा असा अभ्यास करा

दहा लाखाहून अधिक आवेदन केलेल्या 2019 च्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला आता मुहूर्त मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून किंबहुना, त्याही आधीपासून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत. कोरोना काळातही अनेकांनी शारीरिक चाचणीच्या सरावाला ब्रेक बसणार नाही, याची काळजी घेतली. आता कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचेच, या उद्देशाने विद्यार्थ्‍यानी कंबर कसली आहे.

पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर ‘रोजगार नोकरी संदर्भ’मध्ये पुरवणी काढून संबंधित परीक्षेला उपयुक्त त्या डिपार्टमेंटची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळातही सातत्याने पोलीस भरतीसंबंधित माहिती येथे देण्यात येत आहे. परीक्षार्थींच्या अभ्यासात खंड पडू नये आणि अभ्यासातील सातत्य कायम रहावे, हा त्यामागील उद्देश. संबंधित परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी आणि शारीरिक चाचणीविषयी माहिती आपणास आहेच. येत्या दीड-दोन महिन्यात अभ्यासाला गती कशी मिळेल, गुणानुक्रमात अव्वल येण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे असायला हवे, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

आपल्याकडे असलेली पोलीस भरतीची पुस्तके अनेकदा वाचून झालेली असतील, काही विद्यार्थी तर ते कोळून प्यायले असतील. फावल्या वेळेचा सदुपयोग चांगलाच. आता विद्यार्थ्‍यानी सरळ सराव प्रश्नपत्रिकेकडे वळावे. सोबतच यापूर्वी विचारलेल्या प्रश्नपत्रिकाही सोडवून पहाव्यात. दिवसाला किमान एक प्रश्नपत्रिका सोडवून पहावी. त्यात किती गुण मिळतात, याची नोंद ठेवावी. उर्वरित वेळेत जे अभ्यास साहित्य जवळ असेल त्याची रिव्हिजन करावी. शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यावी. अधूनमधून शालेय पुस्तके वाचावीत. प्रश्नपत्रिका सोडवत असतानाच जेव्हा तुम्ही अभ्यास साहित्यही वाचता तेव्हा अभ्यासातील एकाग्रता वाढते. प्रश्नपत्रिका सोडवून पाहिल्याशिवाय आपल्याला आपल्या अभ्यासातील कच्चे दुवे कळत नाहीत.

नियोजन महत्त्वाचे :

कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन महत्त्वाचे असते. कोणीतरी आपला अभ्यास करून घेईल अथवा एखाद्या कोचिंग क्लासला गेल्यावरच आपण अभ्यासाला सुरुवात करू, असे अवलंबित्व नकोच. कारण, ज्यावेळी आपण दुस-यावर अवलंबून असतो तेथेच आपण फार मोठी चूक करीत असतो. शिवाय, या परीक्षेचा अभ्यासक्रम एवढाही कठीण नाही की, तुम्हाला अभ्यासात अडचणी निर्माण होतील अथवा कळणारच नाही. म्हणूनच तर म्हटले आहे की, अधूनमधून शालेय पुस्तकांचा अभ्यास सुरूच ठेवायचा. दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोडवून पाहिल्यानंतर राहिलेला पूर्ण वेळ विषयानुरूप अभ्यासासाठी घालवावा. यासाठी उमेदवाराने उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करावे. अभ्यासातील कच्चे दुवे शोधून त्याकडे अधिक लक्ष पुरवावे. नियोजनाने हे सर्व शक्य होते.

सरावाकडे लक्ष द्यावे : 

प्रश्नपत्रिका सोडवून पाहणे गरजेचेच, परंतु परीक्षेच्या आधी त्याच प्रश्नपत्रिकेवर पुन्हा सराव होणे हे सुद्धा गरजेचे असते. स्वत:चे नियोजनच तसे असावे. एखादी प्रश्नपत्रिका तुम्ही एकदा सोडवून पाहिली, तुम्ही स्वत: चेक केली आणि नंतर सोडून दिली, असे करू नका. विशिष्ट कालावधीनंतर त्याच प्रश्नपत्रिकेवर पुन्हा सराव होणे गरजेचे असते. बरेच वेळा पहिल्या सरावाच्या वेळी झालेल्या चुका नकळत दुस-या वेळीसुद्धा होतात. अशा वेळी आपल्याला किती वेळा सराव गरजेचा आहे, हे कळते. अशाच पद्धतीने आपल्याला आपल्याच अभ्यासात इम्प्रुव्हमेंट करणे शक्य होते.

वाचकांच्या मागणीनुसार, तसेच संभावित परीक्षा लक्षात घेऊन आपल्या साप्ताहिकात अभ्यास साहित्य प्रसिद्ध करण्यात येते. पुढेही हीच परंपरा कायम राहील. सर्व परीक्षार्थींना लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा.

वेळेचा सदुपयोग

मोठेपण मागून मिळत नाही, तर त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. प्रत्येक चुकीपासून विनम्रपणे शिकण्याची क्षमता विकसित करावी लागते. राजहंसासारखे चांगले गुण तेवढे वेचायचे असतात आणि वाईट गुणांचा त्याग करायचा असतो. ध्येय गाठण्यासाठी संपूर्ण समर्पणानं कामाला लागायचं असतं. असं केल्यानंच तुमचं कर्तृत्वच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सूर्यासारखं तेज प्रदान करतं.

                गीतांजली राव, संशोधक वृत्तीनं जगाला बुचकळ्यात टाकणारी मुलगी, वय वर्षे 15 फक्त. सुप्रसिद्ध टाईम्स मॅगझीननं ‘किडस् ऑफ द इयर’ या पुरस्कारानं सन्मानित केलं तेव्हा ती प्रकाशझोतात आली. तिनं जे काही केलं ते पुरस्कारासाठी नव्हतंच. पुरस्कार तर तिच्यामागं धावत आलेत. ज्यावेळी सामान्य मुलं गप्पांमध्ये व मोबाईल पाहण्यात वेळ गमावत होती त्यावेळी गीतांजली मात्र ध्येयानं प्रेरित होऊन संशोधनात मग्न होती. तशी ती आठ-नऊ वर्षांची होती तेव्हापासूनच संशोधनात रमली. मानवहितासाठी काहीतरी चांगलं करावं, हेच तिचं लक्ष्य. त्यासाठी निमित्त तेवढं हवं होतं. आधुनिकीकरण आणि अंदाधुंद औद्योगिकीकरणामुळे एवढ्या समस्या उभ्या केल्यात की, त्यातच तिला तिचं लक्ष्य प्राप्त झालं. मानवानं एकीकडे विकास चालवला, पण तोच त्याच्यासाठी विनाशाचं सुद्धा कारण ठरतोय.

                निमित्त होतं शुद्ध पिण्याच्या पाण्याचं. मूळ भारतीय असलेली आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या गीतांजलीच्या असं लक्षात आलं की, अमेरिकेतील बहुतेक प्रांतातल्या पिण्याच्या पाण्यात शिसं हे धातुक मोठ्या प्रमाणात आढळतं, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक म्हणूनच कॅन्सरसारख्या रोगाला निमंत्रण देणारं आहे. कोणत्या प्रांतातल्या पाण्यात किती प्रमाणात शिसं आढळतं, हे तपासण्यासाठी गीतांजली कामाला लागली आणि लवकरच तिनं एक उपकरण शोधून काढलं, जे पाण्यातली शिशाची मात्रा शोधून काढतं. म्हणजे, ते पाणी पिण्यायोग्य आहे अथवा नाही, हे ते उपकरण सांगतं. तेही खूप महागडं नाही. मोबाईलच्या आकाराचं आणि अगदीच स्वस्त. त्याला तिनं नाव दिलं ‘टेथीस’ आणि या ‘टेथीस’मुळं गीतांजली संपूर्ण अमेरिकेत चर्चेचा विषय बनली. जेव्हा टाईम्स मॅगझीननं 2020 मध्ये जगातला पहिला ‘किडस् ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्याचं ठरवलं तेव्हा त्यांच्याकडे पाच हजार नावं आलीत. त्यातून गीतांजली ही एकमेव निवडली गेली. हॉलीवूड स्टार एंजेलीना जोलीनं तिची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. या पुरस्काराचा पहिला मान मिळवणारी ती पहिलीच मुलगी ठरली.

                ”माझा प्रत्येक दिवसाचा उद्देश एवढाच असतो की, आज कोणाच्या तरी चेह-यावर आनंद पाहायचा. पुढं हाच उद्देश अधिक व्यापक झाला आणि समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मला काय करायला पाहिजे, याच उद्देशानं मी कामाला लागली.’’ असं म्हणणारी गीतांजली तिस-या वर्गापासूनच असं नवनवीन संशोधनं करायला लागली आणि वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत तिनं जगात प्रसिद्धी मिळवली. विशेष म्हणजे, हे सर्व कार्य करत असताना आलेल्या अडचणींबद्दल ती बोलत नाही. तुमचं ध्येय ठरलेलं असेल आणि पूर्ण क्षमतेनं तुम्ही त्याच्या मागं असाल, तर अडचणी ह्या अडचणी ठरतच नाहीत, असं तिचं म्हणणं. म्हणून दु:ख मांडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा इथं प्रश्नच नाही. तसंही तुम्हाला पुढं जायचं असेल, तर तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाबद्दल बोला, लोकांना तुमच्या अडचणी सांगत बसू नका. अपयशी माणसांच्या अडचणी ऐकण्यात कुणालाच रस नसतो. शिवाय, असं केल्यानं तुमच्या अडचणी संपणार थोडच असतात, उलट त्या वाढतात. कोरड्या सहानुभूतीशिवाय पदरात काहीच पडत नाही. म्हणून ही झंझटच नको. अडचणींविषयी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामात वेळ घाला ना!

                बरं, गीतांजलीच्या नावे एकच संशोधन अथवा एकच पुरस्कार नाही. नवी पिढी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे, हे तिला उमजलं वयाच्या नवव्या वर्षी आणि त्या वर्षीपासूनच ती त्या समस्या सोडवण्यासाठी कशोसीनं कामाला लागली. तिनं असा अॅप निर्माण केला जो सायबर बुलींग थांबवण्यास सक्षम आहे. यासोबतच ती आतापर्यंत तीस हजार मुलांना ‘न्यू इनोव्हेशन’विषयी मेंटॉर राहिलेली आहे. याच काळात तिनं पुस्तकही लिहिलीत. अर्थात, हे सर्वच थक्क करून सोडणारं म्हणून भल्याभल्यांना आश्चर्यचकित करणारं. एवढ्या कमी वयात गीतांजलीला एवढं कसं साध्य झालं? याचं उत्तरसुद्धा तंत्रज्ञानानं आधीच देऊन ठेवलेलं. या वयोगटातल्या मुलांची ग्रहणशक्ती आणि आकलनशक्ती जबरदस्त असते. त्यांच्यावर योग्य संस्कार असतील आणि त्यांच्या आवडीच्या कामात त्यांना आव्हानात्मक जबाबदारीचं भान करून देण्यास तुम्ही सक्षम ठरल्यास मुलं असं आगळंवेगळं, आश्चर्यचकित करणारं कार्य करू शकतात. त्यासाठी पालकवर्ग सुद्धा परिपक्व असावा लागतो. मेडिकल, इंजिनीअरिंगच्या चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळावा, एवढ्यासाठीच अभ्यासाचा आग्रह धरणारे पालक नसावेत. वेळेच्या सदुपयोगाचं भान मुलांना करून देणारा मेंटॉर असावा. मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी आणि क्षमतेची भरमार असते. शिवाय, ती वस्तुनिष्ठ असतात. पूर्वग्रह नसल्यामुळे ते प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या अँगलमधून विचार करून सोडवतात. हेच तर गीतांजलीनं केलं.

                गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही, वेळ विकत घेता येत नाही इत्यादी वेळेचं महत्त्व सांगणारे आणि त्यावर बोलणारे पुष्कळ मिळतात, परंतु वेळ कशी आणि कुठं गुंतवायचा, याविषयी त्यांची मानसिकता तयार करणारे मात्र विरळच. गीतांजली असं करू शकली. कारण, मानवहित हाच तिचा उद्देश होता. इतर मुलांना मार्गदर्शक ठरतील, असं लिहू शकली. कारण, तिला वाचनाचाही छंद होता. मुलांना ती मार्गदर्शन करू शकली. कारण, त्यात तिला आनंद आणि समाधान मिळत होतं. मुलांच्या आनंदानुसार वेळेची गुंतवणूक हीच त्यांच्यासाठी प्रोत्साहन ठरत असते. वेळ कधीच निघून जात नसते. तुम्ही आज आणि आत्तापासून जरी वेळेची गुंतवणूक चांगल्या कार्यासाठी करायचं ठरवलं, तरी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. काहीच सुचत नसेल, तर चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून सुरुवात करा. दुस-यांच्या भल्यासाठी केलेलं प्रत्येकच कार्य चांगलं असतं. गाडगेबाबांनी स्वच्छतेपासून सुरुवात केली होती. करण्यासाठी भरपूर आहे, सुरुवात व्हायला हवी.

हॅप्पी, सक्सेसफूल लाईफ

सुखी जीवनासाठीच तर सर्व धावपळ चाललीय. नोकरी हवीय, चांगला पगार हवाय, सुंदर घर हवय… कशासाठी? हे सर्व ठीक आहे. पण संपत्तीमुळं तुम्ही स्वत:ला आनंदी बनवू शकाल. सुख मिळालं म्हणजे आनंद मिळतोच असं नाही. परंतु आनंद मिळाला तर सुख मिळतच हे निश्चित.

आपल्या शरीरात असे हार्मोन्स असतात, जे आपल्याला आनंदी आणि आरोग्यदायी ठेवण्यास मदतगार ठरतात. मनुष्याचा मेंदू हॅप्पी हार्मोन्स म्हणजेच न्युरोट्रांसमीटर बॅड्स निर्माण करीत असतो, जेणेकरून आपण आनंदाचा अनुभव करू शकू. तुम्हाला कोणी शाबासकी दिली, तुमच्या कार्याची तारीफ केली, तुम्हाला चांगले गुण मिळाले वा तुम्हाला एकदम लॉटरी लागली अशावेळी आपल्याला जो हर्षानंद होतो त्याला कारण असते आपल्या मेंदूत स्त्रवणारं ‘डोपामाईन’ हे हार्मोन. म्हणजे तुम्हीच तुम्हाला रिवार्ड देण्याची पद्धती शोधून काढली तरी डोपामाईन पाझरतं आणि तुम्हाला आनंदाचा अनुभव होतो. कोवळ्या उन्हात बसल्यानंही डोपामाईनची सेंसिटीविटी वाढते.

आनंदी आणि हेल्दी ठेवण्यासाठी जसं डोपामाईन गरजेचं तसंच डिप्रेशनपासून वाचण्यासाठी सिरोटोनिन महत्त्वाचं. म्हणूनच सिरोटोनिनला ‘अॅन्टीडिप्रेशनल हार्मोन’ सुद्धा म्हटलं जातं. सिरोटोनिन कमी झाल्यासच डिप्रेशनचा धोका उद्भवतो. ते कमीच होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत. खेळ तथा व्यायामाने सिरोटोनिनची लेव्हल योग्य राहण्यास मदत होते. तसेच इस्ट्रोजन नावाचे हार्मोन सिरोटोनिनला बनविण्यास मदत करते आणि आपल्याला अस्वस्थता, चिडचिडेपणापासून वाचवते. महिलांमध्ये मोनोपॉज काळात इस्ट्रोजन कमी होते. आजची लाईफस्टाईल, स्मोकिंग यामुळेही ते कमी होते. इस्ट्रोजन वाढविण्यासाठी योग, मेडिटेशन उपयुक्त ठरतं. हॅप्पी आणि सक्सेसफूल लाईफसाठी डोपामाईन, सिरोटोनिन या हार्मोन्सचं स्‍त्रवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ते स्‍त्रवण्यासाठी आणि आपल्या अवचेतन मनाला दिशा देण्यासाठी तुम्ही ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ चा उपयोग करायला हवा.

मागे असण्याचं कारण….

दुस-यांचं दु:ख पाहून दु:खी होणं स्वाभाविकच. ही मानवाची नैसर्गिक वृत्ती, परंतु दुस-याचं सुख पाहून सुखावणारा विरळाच. दुस-याच्याही सुखात सुख मानणारा खरा आनंदी असतो. कारण, दुस-याच्या सुखानं दुखावणारा व्यक्ती ईर्षेत स्वऊर्जेचा नाश करतो. याउलट, सुखावणारा व्यक्ती स्वउत्साहात वाढ करतो. सुयोग्य कार्यापासून प्रेरणा न घेणारे मागं पडतात. मागं असण्याचं कारणंच द्वेष, ईर्ष्‍या हे असतं.

जीवनात पैसा महत्त्वाचा असतोच, पण पैशाचा लोभ माणसाचं रूपांतर हिंश्वापदात करतं. प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशानं गाढ झोपेचा आनंद घेता येतो, परंतु बेईमानीनं व भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशानं अनिद्रेचा त्रास होतो. आपण पैसा कमावतो कशासाठी? सुख, समाधान मिळवण्यासाठीच ना!

लियो टॉलस्टॉयचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला. शिवाय, ते मोठे तत्त्वज्ञ, विचारवंत आणि कादंबरीकार होते. जिवंतपणीच त्यांची ख्याती जगभर पसरलेली होती, एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व होतं. त्यांच्या नावावरचं गांधीजींनी द. आफ्रिकेत ‘टॉलस्टॉय फार्म’ नावाचा आश्रम काढलेला होता. अगदी उतारवयात टॉलस्टॉय यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरीब, बेसहारा लोकांना दानात दिली आणि स्वत: ते एस्टापोवो रेल्वे स्टेशनवर जीवनयापनासाठी मिळेल ते काम करत असताना कडाक्याच्या थंडीमुळे मरण पावले. त्यांनी संपूर्ण जीवन स्वत:ला चांगला माणूस बनवण्यात घालवलं. ज्याप्रमाणे एक मेणबत्ती हजारो मेणबत्तींना पेटवू शकते, तसंच मानवी जीवन असावं, असं ते म्हणायचे आणि तोच प्रयत्न त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केला.

अशी अनेक उदाहरणं मोठ्या माणसांनी आपल्या पुढ्यात ठेवलीत ती आपणही जीवनात मागं राहू नये यासाठीच. 

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे)

2 thoughts on “क्षमता व एकाग्रतेएवढंच सातत्य महत्त्वाचं”

  1. Precious stimulus for each and everyone’s life who disappointed scatter,regarding their ambition for them it act like remedy. Thank you sir by mindly for your precious thought , views, opinion, research, knowledge and many more things I and we always appreciate you for your well being towards society for literate ethically and with proper guidance . Again Thank you very much for encourageble article.

    Reply

Leave a Comment