क्षमता (Capacity)

‘जर तुम्ही तुमच्‍या जीवनाशी प्रेम करीत असाल, तर आपला वेळ वाया घालू नका. कारण, जीवन त्यापासूनच बनलेले असते.’     – बेरोन डी

जे व्‍यक्‍ती यशस्वी आहेत, त्यांच्‍याकडे वेळ नसतो. कारण, ते वेळ खर्च करीत नसतात, तर ते वेळेची गुंतवणूक करीत असतात. पैशांची योग्य जागी योग्य वेळी गुंतवणूक ज्‍याप्रमाणे पटीमध्ये धनलाभ घडवून आणतो, त्याचप्रमाणे वेळेची योग्य गुंतवणूक करणारे धनलाभापेक्षाही अधिक पटीत यश मिळवत असतात. तसेच जे व्‍यक्‍ती बेकार असतात, त्यांच्‍याकडेही वेळ नसतो. मात्र, ते वेळ कुठेतरी वायफळ कामात खर्च करीत असतात. चांगल्या कामासाठी खर्च केलेला वेळ भलेही लगेच फळ न देवो; परंतु तो रबरी चेंडूप्रमाणे तुम्हाला उंचीवर पोहोचवण्याची क्षमता निश्चितच ठेवत असतो.

वेळेची चांगल्या कार्यात गुंतवणूक तुम्हाला नेहमी व्यस्त ठेवते. मग आपल्याला अशक्य वाटणारे कार्यही सहज शक्य होते. अमेरिकेची वुल्मा रुडॉल्फ लहानपणी नऊ रोगांनी ग्रस्त होती. तिला नीट चालतासुदधा येत नव्हते. खेळण्याची आवड असूनसुदधा ती खेळू शकत नव्हती. मात्र, ती खचली नाही. तिने वेळेचे नियोजन करून सुरुवातीला चालण्याचा सराव केला. सर्वांगात होणा-या असंख्य वेदना सोसल्या; परंतु नियोजन ढळू दिले नाही की, आरामात वेळ घालवला नाही. घरच्‍यांची तसेच समाजाची सहानुभूती असूनही तिचे स्वत:चे करिअर खेळामध्ये करण्याचे ठरवले. ते अशक्य वाटणारे ध्येय होते. दिवसभर काम करून थकलेला सामान्य मनुष्य दुस-या दिवशी उठण्याचा कंटाळा करतो. वुल्मा मात्र त्याला अपवाद होती. शारीरिक त्रासाकडे तिने लक्षच दिले नाही. सातत्याने व्यायामामध्ये वेळेची गुंतवणूक करीत गेली आणि त्याचे तिला फळही मिळाले. १९६० च्‍या रोम ऑलिम्पिकमध्ये तिने अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकून जगाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

वुल्मा रुडॉल्फची येथे मुद्दाम आठवण करण्याचा उद्देश एवढाच की, कॉमनवेल्थ गेम दिल्लीत झाले, तेव्हा डॅनिएल ब्राऊनविषयी ऐकायला मिळाले. इंग्लंडची आर्चर (तीरंदाज) २२ वर्षीय डॅनिएल ब्राऊन हीसुदधा अपंग आहे. डॅनिएल कॉमनवेल्थमध्ये भाग घेण्यासाठी भारतात आली होती. तिला व्हीलचेअरवर आणण्यात आले. कारण, व्हीलचेअरशिवाय तिला चालता येत नाही. उभे राहताना कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. एका असाध्य रोगाने तिच्‍या पायाला अपंग बनवले आहे. ती म्हणते, रोज सकाळी उठल्यानंतर पायाला असंख्य वेदना होतात. सराव रोजच करायचा असतो. आता वेदनेची सवय पडली; परंतु मी वर्तमानात जगते. भूतकाळ माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. कारण, कालपेक्षा आज मी चांगला ‘परफॉर्म’ करते. माझ्या वेदनेनेच मला मानसिकरित्या कणखर बनवले आहे. जिद्दीने कोणत्याही बाबीवर विजय मिळवता येऊ शकतो, हे मी स्वत:च्‍या सरावानेच शिकले. याच डॅनियलने २००८ च्‍या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून आपल्या देशाचे नाव जगात उंचावणारी डॅनियल पुन्हा व्हीलचेअरवर बसून कॉमनवेल्थचे सुवर्ण जिंकण्यासाठी सज्‍ज होते. दुर्दम्य इच्‍छाशक्‍तीच्‍या बळावर जगातील कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचा संदेशच जणू ती देण्यासाठी येथे आली होती.

यशाची भावना मनात ठेवून कार्य केल्यास यशच मिळते. मला काय करायचे, हे ठरवल्यानंतर ते ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असते. कशीही परिस्थिती आली, तरी तिच्‍यावर मात करण्याची हिंमत अंगी असणे आवश्यक असते. कोणतेही कार्य लहान किंवा मोठे नसते. वुल्मा रुडॉल्फने चालण्याचाच प्रयत्न केला नसता, तर ती ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्ण मिळवू शकली नसती. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना कमालीचा त्रागा सहन करावा लागतो. अनेकांच्‍या तोंडी लागावे लागते. अनेकदा चुकीची माहिती व आत्मविश्वासाचे खच्‍चीकरण केले जाते, परंतु तुमचे ध्येय ठरलेले असेल, तुम्ही झपाटलेले असाल, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. म्हणून जे कोणते कार्य तुम्ही हाती घेतले असेल, ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करा. अपयशाची भीती डोक्यात येऊ देऊ नका. केवळ यशाचा आणि यशाचाच विचार करा. लक्षात ठेवा,’तुम्ही जसे तुम्हाला पाहता तसेच तुम्ही घडत जाता.’ बायबलमध्येही म्हटले आहे, ‘तुम्ही जसा विचार करता, तसे तुम्ही घडत जाता.’ हेच हॉर्वर्ड विश्वविद्यालयाचे मानसतज्‍ज्ञ डॉ. जेम्स यांनी म्हटले आहे आणि हेच जगप्रसिद्घ मनोविकारतज्‍ज्ञ एमिली एच. कैंडी यांनी म्हटले आहे. डॉ. जेम्स यांच्‍या मतानुसार तर आपल्यात किती अपार क्षमता आहे, हे पाहू शकणारी जगात एकही एक्स रे मशिन  नाही. अशी एखादी मशिन अस्तित्वात असती, तर आपल्या क्षमता पाहून स्वत:लाच आश्चर्याचा मोठा शॉक बसला असता. थोडक्यात, यश मिळवण्याची क्षमता सर्वांमध्ये आहे. तिचा योग्य वेळी, योग्य वापर होणे गरजेचे आहे.

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे)

4 thoughts on “क्षमता (Capacity)”

Leave a Comment