खीर कशी आहे?

संधी प्रत्येकासाठीच असतात. मात्र, ती संधी मिळविण्याची पात्रता अंगी असावी लागते. सर्वच क्षमता जन्मजात नसतात. काही क्षमता योग्य प्रशिक्षणाने, जाणीवपूर्वक विकसित कराव्या लागतात.

एकदा गौतम बुद्धांनी नवीन शिष्याला एका मठाची जबाबदारी सोपविली. त्यामुळे ब-याच दिवसांपासून त्यांच्यासोबत असणा-या शिष्याने गौतम बुद्धांना काहीशा नाराजीने प्रश्न विचारला, `महाराज, मी ब-याच दिवसांपासून आपल्यासोबत राहतो, आपली सेवा करतो. मात्र, जबाबदारी आपण नवीन शिष्याला सोपविली. मी सुद्धा जबाबदारी पेलण्यास समर्थ होतो, असे तुम्हाला वाटत नाही का ?’ गौतम बुद्ध अत्यंत ज्ञानी होते. ते उदाहरणांद्वारे विषयाचे गांभीर्य पटवून देत असत. त्यांनी शांतपणे शिष्याचा प्रश्न ऐकून घेतला व नवीन शिष्याला बोलवणे धाडले. तत्पूर्वी, त्यांनी त्याला खीर देऊन त्याची चव विचारली. तो म्हणाला, `महाराज, खीर नेहमीसारखीच गोड आहे.’ नवा शिष्य लगेच हजर झाला. त्याला बुद्धाने जवळच असलेली खीर प्यायला सांगितली आणि विचारले, `खीर कशी लागली?’, तो म्हणाला, `महाराज रुचीपूर्ण व गोड आहे.’ आता ते जुन्या शिष्याकडे वळले आणि म्हणाले, `ब-याच वेळपासून खिरीमध्ये चमचा पडलेला होता. मात्र, तो खीर कशी आहे, हे सांगू शकला नाही.’ आता मात्र जुना शिष्य वरमला व आपल्यापेक्षा योग्य व्यक्तीला गौतम बुद्धांनी जबाबदारी दिली हे त्याच्या लक्षात आले.

संधी प्रत्येकासाठीच असतात. मात्र, ती संधी मिळविण्याची पात्रता अंगी असावी लागते. वेळप्रसंगी ती पात्रता सिद्ध करण्याची क्षमता असावी लागते. स्पर्धा परीक्षांद्वारे प्रत्येकालाच संधी मिळते, परंतु परीक्षा उत्तीर्ण  करण्याची क्षमता असणारेच पदे मिळवितात. सर्वच क्षमता जन्मजात नसतात. काही क्षमता योग्य प्रशिक्षणाने, जाणीवपूर्वक विकसित कराव्या लागतात. आपण सर्व  क्षमतावान परीक्षार्थी आहात. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्य तुम्हाला विकसित करण्यासाठी सातत्याने, संयमाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सातत्य आणि संयम हे दोन्ही गुणही तुमच्याकडेच  आहेत. आवश्यकता आहे केवळ त्याची अंमलबजावणी करण्याची.


( Visit SanjayNathe.com for more articles )

Leave a Comment