गुरूदक्षिणा (Gurudakshina)

सर्वांनी मडकी उचलली व तेथून दोन मैल अंतरावर असलेल्या नदीवर गेले. त्यांनी मडकी भरली व आश्रमाच्‍या दिशेने निघाले. पण काय, सर्व मडकी लवकरच रिकामी झाली. मडकी ठिकठिकाणी फुटलेली असल्यामुळे त्यात पाणी शिल्लकच राहत नव्हते.

विद्यार्थ्‍यांना सहा वर्षे गुरुकुलमध्ये शिक्षण दिल्यानंतर गुरूने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. पूर्वी मुलांना शिक्षणासाठी आश्रमात शिक्षा ग्रहण करण्यासाठी पाठविले जात होते. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरू विद्यार्थ्‍यांकडून गुरूदक्षिणा घेत असत. याहीवेळेस गुरुजींनी विद्यार्थ्‍यांकडे गुरुदक्षिणेची मागणी केली. ‘मुलांनो, तिथे ठेवलेली ती मडकी घेऊन जा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन या, हीच माझी गुरुदक्षिणा राहील.’ सर्वांनी मडकी उचलली व तेथून दोन मैल अंतरावर असलेल्या नदीवर गेले. त्यांनी मडकी भरली व आश्रमाच्‍या दिशेने निघाले, पण काय, सर्व मडकी लवकरच रिकामी झाली. मडकी ठिकठिकाणी फुटलेली असल्यामुळे त्यात पाणी शिल्लकच राहत नव्हते. कोणी हाताने छिद्रे दाबून तर कोणी फुटलेल्या जागी माती लावून छिद्र बुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही उपयोग नाही, कोणालाही मडकी भरून पाणी आश्रमापर्यंत नेता येईना. त्यामध्ये असलेल्या श्रवणला ही बाब लक्षात आली. गुरुजींनी आपली परीक्षा घेण्यासाठी हे सर्व केले आहे म्हणून दुसरी युक्ती शोधली पाहिजे, या विचारात श्रवण गढून गेला. तोपर्यंत आपल्याला पाणी नेणे शक्य नाही म्हणून इतर मुलांनी ओंजळीत पाणी नेण्याचा केविलवाणा पण शेवटचा प्रयत्न केला व आश्रमाकडे परतायला लागले. गुरुजींजवळ जाऊन प्रत्येकाने पाणी आणण्यासाठी केलेल्या परिश्रमाचा म्हणजे अपयशाचा पाढा वाचला. गुरुजींनी विचारले श्रवण कोठे आहे. सर्व इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात अर्धनग्न अवस्थेत श्रवण येताना दिसला. श्रवणने आपली बंडी (शर्ट) काढून ती पाण्याने स्वच्‍छ धुतली व ओली करून ओंजळीत घेतली व गुरूकडे आणली. गुरुजी यात मी थोडे पाणी आणू शकलो. आपली आज्ञा असेल तिथे हे पाणी सोडतो. गुरुजींनी श्रवणला जवळ घेतले व आशीर्वाद दिले. तात्पर्य उपलब्ध असलेल्या गोष्टीतून जो मार्ग काढतो तोच विजय मिळवितो.

अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली तेव्हा झेलम नदी दुथडी भरून वाहत होती. झेलम नदी पार करून अलेक्झांडर येऊ शकणार नाही म्हणून पुरू राजा निश्चिंत होता. मात्र, अलेक्झांडरने पर्यायी मार्ग शोधून काढला व गफलतीत असलेल्या पुरू राजाचा पराभव केला. हेच राज्‍य पुढे सेल्युकस निकोटरचा पराभव होईपर्यंत म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा शासनकाळ येईपर्यंत टिकून राहिले.

वरील दोन्ही गोष्टींमध्ये विसंगती आढळत असली तरी एकसमानता आहे, ती म्हणजे परिस्थिती कितीही प्रतिकूल असो परिश्रम घेण्याची तयारी असेल व दूरदृष्टी असेल, तर यश निश्चितपणे मिळविता येते. सामान्यांच्‍या जीवनात हेच घडते. आपण जेथे आहोत त्याच परिस्थितीत घुटमळत आहोत, त्यातून बाहेर निघण्याचा विचारच करीत नाही, तिथल्या तिथेच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखादा पर्यायी विचार आला तरी त्यात आपल्याला धोका वाटतो, त्यात आपण यशस्वी होऊ का, हा प्रश्न निर्माण होतो. धोका पत्करण्याची सवय नसल्यामुळे अशा कितीतरी संधी आपण सोडून देत असतो किंवा रिकाम्या हाताने परतत असतो. प्रश्न सर्वांनाच असतात. जेवढे मोठे नेतृत्व असेल तेवढ्याच मोठ्या समस्या असतात, परंतु त्या समस्या सोडविण्याचे सामर्थ्‍यही नियतीने आपल्याला दिले आहे. मी अशा अनेक महिलांना ओळखतो ज्‍या कधी घराबाहेर पडल्या नव्हत्या. घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे कधी काम करण्याची त्यांना आवश्यकताच पडली नाही.

मग पतीच्‍या तब्येतीमुळे किंवा कमावत्या व्यक्तीच्‍या अचानक निधनामुळे त्यांना घराबाहेर पडावे लागले. सुरुवातीला कुटुंबाचे ओझे आपल्याला पेलणार नाही, या विचारानेही चिंताग्रस्त होणा-या या महिला आज सक्षमतेने घराचा गाडा ओढत आहेत. सर्व जबाबदारी सांभाळूनही त्यांच्‍या चेह-यावर जिंकण्याचा आनंद आहे. त्या अशा करू शकल्या कारण त्यांच्‍याकडे काम करण्याशिवाय दुसरे पर्याय नव्हते. लिज्‍जत पापड हेही अशाच मोठ्या उद्योगसमूहाचे नाव आहे. जिथे आपले पर्याय संपले, असे म्हणतो ख-या अर्थाने तेथूनच आपल्या नवीन जीवनाची सुरुवात झालेली असते. यश मिळविण्यासाठी नवनवीन संधी शोधाव्या लागतात. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी रात्रंदिवस झटावं लागतं, चाकोरीबाहेर विचार करण्याची क्षमता विकसित करावी लागते. विशेष म्हणजे, या सर्व गोष्टींसाठी पैसा खर्च करावा लागत नाही. पैशाने पैसा निर्माण करता येतो, ही बाब जेवढी खरी आहे तेवढीच हीही बाब खरी आहे की, बहुतेक उद्योगपतींना यशस्वी होण्यासाठी आपल्या घरून पैसा मिळाला नव्हता, तर त्यांनी तो मिळविला. पैशाच्‍या मागे धावल्याने पैसा मिळत नाही, तुम्ही त्याच्‍या पुढे चाला म्हणजे तो तुमच्‍यामागे चालेल. तुम्ही ज्‍या क्षेत्रात आहात त्या  क्षेत्रात टॉपर राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. अडचणी आपल्या क्षमता वाढवितात, वेगळा विचार करण्यासाठी त्या बाध्य करतात. जेवढ्या अधिक अडचणी, तेवढे अधिक प्रश्न म्हणजे ते सोडविण्यासाठी तेवढ्या अधिक क्षमतांचा उपयोग तुम्ही करणार.

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे)

5 thoughts on “गुरूदक्षिणा (Gurudakshina)”

Leave a Comment