चांगल्या सवयी (Good habits)

पुन्हा चंद्रगुप्तचे प्रशिक्षण सुरू झाले, परंतु आता ते शारीरिक नव्हते तर बौध्दिक होते. दोन वर्षे चाललेले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा त्यांनी चंद्रगुप्तला तोच प्रश्न विचारला आणि चंद्रगुप्तने त्वरित उत्तर दिले.

चंद्रगुप्त मौर्याच्‍या प्रशिक्षणासाठी आर्य चाणक्य यांनी वेगवेगळया विदयेत निपूण शिक्षकांचा शोध घेऊन प्रशिक्षकांची नेमणूक केली. सर्व विद्या शिकल्यानंतर आर्य चाणक्याने चंद्रगुप्तची परीक्षा घेण्याचे ठरविले. मल्लयुद्घ, तलवारबाजी, धनुर्विद्या, भालाफेक सर्व विद्येत चंद्रगुप्तने प्रतिस्पर्ध्‍यांवर विजय मिळविला. आर्य चाणक्याने त्याला काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरेही चंद्रगुप्तने अतिशय शास्त्रशुध्‍द पध्‍दतीचा आधार घेऊन दिलीत. शेवटी त्यांनी चंद्रगुप्तला एक प्रश्न विचारला ‘सदासर्वकाळ लक्षात ठेवावी, अशी कामाची गोष्ट कोणती ?’ या प्रश्नाचे चंद्रगुप्ताने उत्तर दिले ‘वेळेचे नियोजन, कार्यतत्परता, आत्मविश्वास, सातत्य आणि एकाग्रता.’ यावर मात्र आर्य चाणक्य यांचे समाधान झाल्याचे त्यांच्‍या चेह-यावरून दिसत नव्हते. पुन्हा चंद्रगुप्तचे प्रशिक्षण सुरू झाले, परंतु आता ते शारीरिक नव्हते तर बौध्दिक होते. दोन वर्षे चाललेले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा त्यांनी चंद्रगुप्तला तोच प्रश्न विचारला आणि चंद्रगुप्तने त्वरित उत्तर दिले. ‘चांगल्या सवयी,’ आता मात्र आर्य चाणक्य आनंदी झाले. नीतीशास्त्राचे शिक्षण देताना आर्य चाणक्य यांनी ‘चांगल्या सवयी’ या वाक्याचा शब्दश: अर्थ चंद्रगुप्तला समजावून सांगितला,मनाला योग्य वळण लावायचे असल्यास चांगल्या सवयी किती महत्त्वपूर्ण  ठरतात हे आपल्याला दैनंदिन उदाहरणावरूनही लक्षात येईल. मनुष्याचे मन चंचल असते, त्याच्‍यावर नियंत्रण मिळविणे पाहिजे तेवढे सोपे नाही, तसेच त्याला पाहिजे त्या दिशेने वळविणे हेही अतिशय अवघड असते. त्याच्‍यावर नियंत्रण मिळविण्याच्‍या अनेक विधी धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. त्यापैकीच  चांगली सवय हेही एक आहे. अर्थात जे आपल्या मनाला पटत नाही ते न करणे, दारू पिणा-याला दारूचे दुष्परिणाम माहिती असतात, परंतु एकदा त्याने चुकीचा मार्ग धरला की, तो सोडणे त्याच्‍यासाठी कठीण असते. खोटे बोलणा-यालाही खोटे बोलण्याच्‍या परिणामांची माहिती असते, परंतु त्याची सवय एकदम सुटत नाही. काहींना मोठेपणा दाखविण्याची, काहींना आहे त्यापेक्षा अधिक ज्ञान दर्शविण्याची सवय होऊन बसते. असे व्यक्ती दुस-याच्‍या भावनेची फारशी कदर करत नाहीत. नको त्या ठिकाणी नको ते बोलणे, फिजूल आत्मप्रौढी मिरविणे, चांगल्या गोष्टीकडे मुद्दाम कानाडोळा करणे, इतरांना तुच्‍छ समजणे इत्यादी अनावश्यक बाबींमुळे आपली प्रतिमा मलीन होत आहे, त्याचेही भान त्यांना नसते. या बाबी टाळण्यासाठी चांगल्या सवयी अत्यंत महत्त्वाच्‍या ठरतात. एक सडक्या कांद्याने चांगले शंभर कांदे सडतात, परंतु शंभर चांगल्या कांद्याने एक सडका कांदा चांगला होत नाही, ही वास्तविकता असली तरी ती मनुष्याला जशीच्‍या तशी लागू पडत नाही. चांगल्या सवयी असलेल्या मनुष्याचा परिघ एवढा विस्तीर्ण असतो की, जो मनुष्य त्या घे-यात येतो त्याच्‍यावर चांगलेच परिणाम होतात.

विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्‍या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष परिश्रमाची आवश्यकता पडत नाही. मित्रांमध्ये अनावश्यक गप्पा करून वेळ गमावण्यात त्याला स्वारस्य नसते. आज करिअरची अनेक क्षेत्रे खुली असतानाही अनेक विद्यार्थ्‍यांकडून ‘आम्हाला कोणाचे मार्गदर्शन मिळाले नाही’ अशाप्रकारचे हताश उद्गार ऐकायला मिळतात. एक लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणार नाहीत तुम्हाला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे, याची दिशा दुसरा ठरविणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हालाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालनाच देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत तर त्या संपूर्ण मानवी गुण वृध्दिंगत करण्यास मदत करतात.

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

2 thoughts on “चांगल्या सवयी (Good habits)”

Leave a Comment