जसं मी तसंच… (Just like me)

असं म्हणतात, स्वभाव नैसर्गिक असतात, ते बदलविता येत नाहीत. म्हणून स्वभावाला औषध नसतं, असंही म्हटलं जातं. परंतु स्वभावात बदल घडवून आणता येतात, हे प्रथमत: आपण स्वीकारायला हवं.

महाभारतातील एक प्रसंग : कौरव पांडवांच्‍या सभेत श्रीकृष्ण हजर होते. श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले की, ”या सभेत किती सज्‍जन गृहस्थ बसले आहेत ते मला सांग.” दुर्योधनाने सभेतील प्रत्येकावर कटाक्ष टाकला आणि म्हणाला की, ”प्रत्येकाने काहीना काही अपराध केले आहेत. त्यामुळे मला येथे एकही सज्‍जन दिसत नाही.” हाच प्रश्न श्रीकृष्णाने युधिष्ठिराला केला, ”धर्मराजा, या सभेत किती दुर्जन आहेत ते मला सांगा.” धर्मराज म्हणाला, ”माधवा, मला येथे एकही दुर्जन दिसत नाही.” तात्पर्य, आपल्या मनातील भावना चष्म्याप्रमाणे काम करतात. तुमच्‍या मनात चांगल्या भावना असतील, तर तुम्हाला दुस-यातील चांगलेच गुण दिसतील. तुमच्‍यातच दोष असतील, तर तुम्हाला दुस-यातील दोषच दिसतील.

काही लोकं सातत्याने शंका घेत असतात. मुळात हा त्यांच्‍या विचारांचा दोष असतो. अशा वृत्तीमुळे त्यांना दुस-यात चांगले गुण दिसतच नाही. ते केवळ नकारात्मक बाजूच पहात असतात. विशेष म्हणजे, अशा व्यक्‍ती स्वत:ची परीक्षाही स्वत:च्‍याच नजरेतून करत असतात. आपल्यापेक्षा कर्तृत्ववान, बुध्दिमान व्यक्‍ती या विश्वातच नाहीत काहीसा असा भास त्यांना होत असतो. आपल्या या नकारात्मक वृत्तीमुळे आपले किती नुकसान होत आहे, याचा ते विचारच करीत नाही. प्रत्येकामध्ये वाईटासोबत चांगलेही गुण असतात. अशा व्यक्‍ती इतरांजवळील चांगल्या गुणांना मुकतात. याउलट, ज्‍या व्यक्‍ती इतरांमधील केवळ चांगलेच गुण शोधत असतात ते सदोदित काहीना काही नवीन मिळवित असतात. दोन्हीमध्ये कमालीचा फरक असतो. एक नकारात्मक व्यक्‍ती अशा व्यक्‍तीना आकर्षित करीत असतो जे नकारात्मकच असतात आणि एक सकारात्मक व्यक्‍ती केवळ अशाच व्यक्‍तीना आकर्षित करतो जे सकारात्मक असतात. विचारांत खरेच मोठी शक्‍ती असते. आपण कसा विचार करतो यावर आपले भविष्य अवलंबून असते.

एक व्यक्‍ती दुस-या गावातील माणसांबद्दल माहिती विचारीत होता, ”काहो, या गावातील माणसं कशी आहेत?” त्या गावातील सद्गृहस्थ म्हणाले, ”महाशय आपण अशी चौकशी का करीत आहात?” तो म्हणाला, ”मी ज्‍या गावात राहतो, तेथील लोकांचा स्वभाव वाईट आहे. नको तिथे राजकारण करतात, दुस-याचे सुख त्यांच्याकडून पाहवले जात नाही, दुस-याच्या सुखात विष कालविण्यापलीकडे त्यांना काहीच जमत नाही.” गावातील सद्गृहस्थ म्हणाले, ”आमच्‍या गावातही असेच लोकं राहतात.” यांचा वार्तालाप संपत नाही तोच तिथे दुसरा व्यक्‍ती आला आणि त्या सद्गृहस्थाला तोच प्रश्न केला, ”महाशय, येथील गावकरी एकमेकांसोबत कसे वागतात?” त्या सद्गृहस्थाने प्रतिप्रश्न विचारला, ”आपण ज्‍या गावी राहता तेथील नागरिक एकमेकांसोबत कसे वागतात?” तो व्यक्‍ती म्हणाला, ”आमच्‍या गावातील लोकं अत्यंत सज्‍जन आहेत. ते एकमेकांच्‍या मदतीला नेहमीच तत्पर असतात. ते खोटे बोलत नाहीत. दुस-यांविषयी वाईट बोललेलं मी त्यांच्‍या तोंडून अजूनपर्यंत ऐकलं नाही. आम्ही सर्व एक आनंदी कुटुंबातील सदस्यांसारखे जीवन जगतो.” ते सद्गृहस्थ उत्तरले, ”महाशय, आमच्‍या गावातील लोकंही तसेच आहेत. येथेही सर्वजण एका कुटुंबातील सदस्यांसारखे गोडीगुलाबीनेच राहतात.” हा वार्तालाप तो पहिला व्यक्‍ती ऐकत होता, तो त्या सद्गृहस्थाला म्हणाला, ”महाशय, आपण आताच मला सांगत होते की, येथील लोकं चांगले नाहीत, एकमेकांची मदत करीत नाहीत, दुस-याचे सुख त्यांच्‍याकडून पाहवले जात नाही, वगैरे वगैरे आणि आताच त्यांच्‍याविषयी चांगले सांगत आहात. तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलत आहात.” ते सद्गृहस्थ म्हणाले, ”महोदय, खोटं बोलण्याचा प्रश्न येतोच कोठे. तुमच्‍याशी खोटं बोलून मला काही लाभ आहे का? मग मी खोटं का बोलावं. मी तुम्हाला दिलेली उत्तरेही बरोबरच आहेत. कोणत्याही गावातील सर्वच माणसं वाईट नसतात. जर ती आपल्याला वाईट दिसत असतील याचा अर्थ दोष त्यांच्‍यात नाही, आपल्यात आहे हे प्रथमत: आपण मान्य केले पाहिजे. चांगला व्यक्‍ती दुस-यातील गुणच शोधत असतो. याउलट, दोषपूर्ण व्यक्‍ती दुस-यातील दोषांविषयीच बोलत असतो.”

असं म्हणतात, स्वभाव नैसर्गिक असतात, ते बदलविता येत नाहीत. म्हणून स्वभावाला औषध नसतं, असही म्हटलं जातं. परंतु स्वभावात बदल घडवून आणता येतात हे प्रथमत: आपण स्वीकारायला हवे. आपण स्वत:ला वेळ द्यायला हवा. जे विचार स्वत:लाच अस्वस्थ करतात ते विचार शोधता आले पाहिजेत. सुरुवातीला आपण स्वत:ला शांत करायचे, मग ‘या गोष्टी आपणास विचलित करतात त्या विचारांपासून स्वत:ला दूर करायचे, म्हणजे तेथून आपले मन हटवायचे आणि आता आपल्याला जे हवे त्या बाबींवर स्वत:ला एकाग्र करायचे, जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत दुसरा कोणीही आपल्याला आनंदी करू शकत नाही. दुस-यात दोष शोधणारा व्यक्‍ती आनंदी जीवन कसा जगू शकेल! आपण जसा विचार करतो, तशाच घटना आपण आपल्याकडे आकर्षित करीत असतो. दुस-यातील दोषांवर भाष्य करणारा, स्वत:मध्येही तेच दोष घेऊन फिरत असतो. म्हणून दुस-यातील गुण शोधा. त्या गुणांचा स्वत:लाही फायदा होईल. ब-याच नवनवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. दुस-यांकडे पाहण्याच्‍या दृष्टिकोनातही बदल पडेल. आपसुकच आपण दुस-याची प्रतिष्ठा जपायला लागू. परिणामी, दुसरे व्यक्‍ती तुमची प्रतिष्ठा जपतील. जसे तुम्ही दुस-यांसोबत वागाल, तसेच इतरही तुमच्‍यासोबत वागतील. दुस-यांकडून मान-सन्मान मिळावा, असे आपल्याला वाटत असेल, तर आपणही त्यांना मान-सन्मान दिला पाहिजे. आपल्या सुखाचा शोध दुस-यांमध्ये घेऊन चालणार नाही. स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तरी मोठा फरक पडेल. आपण आनंदी तर जग आनंदी. असा आनंद स्वत:मधूनच प्रस्फुटित होत असतो. दुस-यांच्या नजरेतून स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. जीवनात खूप काही घटना अशा घडत असतात ज्‍या आपण दुस-याजवळ बोलूच शकत नाही. त्या सुखद असोत वा दु:खद त्या आपल्यासाठी युनिक असतात. आपलं समजून अशा घटना आपण दुस-याजवळ बोललो तर बदनामी तर होणार नाही ना! हा विचारच आपल्याला अस्वस्थ करीत असतो. अशा घटना कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाच्‍या जीवनात घडलेल्या असतात. खरे पाहाल तर त्यात नवीन असे काहीच नसते. खुल्या मनाने अशा घटनांना आपल्या विश्वासू मित्राजवळ वाट मोकळी करून द्यायला हवी. आपल्यासाठी मोठी असलेली घटना ही दुस-साठी अतिशय क्षुल्लक असते, याचा आपण कधी विचारच करीत नाही. लोकं काय म्हणतील, केवळ एवढाच विचार आपल्याला किती अस्वस्थ करून सोडतो. ज्‍याचं  जळतं, त्यालाच कळतं’ हे खरं असलं तरी स्वत:च्‍या विचारातील थोड्या बदलानं, सकारात्मक दृष्टिकोनानं आपण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे)

1 thought on “जसं मी तसंच… (Just like me)”

Leave a Comment