थांबायचे नसेल तर… (If you don’t want to stop)

एमपीएससी राज्यसेवेची जाहिरात आली. पोलीस भरतीच्या परीक्षा सुरूच आहेत. पोलीस भरतीच्या नवीन जाहिराती अजून येण्याच्या बाकी आहेत. आरोग्य सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन इत्यादी परीक्षा येऊ घातल्यात. प्रत्येक आठवड्यात कोणती ना कोणती परीक्षा होतेय. स्पर्धा परीक्षार्थ्‍यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती होतच आहे, परंतु नेमकं यश मिळवण्यासाठी स्वत:मध्ये विश्वास असायला हवा. तो मात्र दुसरीकडे मिळणार नाही. असा सकारात्मक विश्वास निर्माण होतो आपल्या दृढ विचारांमधून आणि आपल्या सुयोग्य कृतीतून. म्हणूनच स्वत:चे विचार आणि कृती याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे.

आपले विचार सृजनात्मक असतात. म्हणूनच तर तुमच्या सकारात्मक विचारांचे सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचे नकारात्मक परिणाम मिळतात. ‘कोणत्याही परिस्थितीत मला यशस्वी व्हायचंच’, ‘यावेळी मी या स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारच’, हे विचार सकारात्मकच. या विचारांवर जेवढा अधिक तुमचा विश्वास असेल तेवढेच चांगले परिणाम तुमच्या दृष्टीत्पथास पडतील. तुमचाच विश्वास डळमळीत असेल, तर हवे ते परिणाम मिळणार कसे! तुमच्याविषयी दुस-यांचा विश्वास इथं काम करणार नाही. तुमचा स्वत:विषयी विश्वास असायला हवा. जोपर्यंत तुम्ही तुमचं जीवन बदलण्याचा विचार करत नाहीत तोपर्यंत कोणतीही बाह्य शक्ती तुमचं जीवन बदलवू शकत नाही.

कोणत्याही परीक्षांविषयी विद्यार्थ्‍यांच्या मनात सुप्त भीती असतेच. काहींच्या मनात अपयशाची भीती असते. हीच भीती तुम्हाला अभ्यासाला प्रवृत्त करते, परंतु तीच भीती अवास्तव आणि मोठ्या प्रमाणात असेल, तर ती आधी चिंता निर्माण करेल, नंतर तणाव आणि शेवटी नैराश्य. ही भीती कोणी निर्माण केली? याला दुसरा कोणी जबाबदार आहे का? जसे या सर्व बाबींना तुमचे नकारात्मक विचार कारणीभूत असतात तसंच तुमच्या यशाबद्दलही असतं. तुम्हाला दुसरा कोणी यशस्वी किंवा अयशस्वी करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वत: तशी परवानगी देत नाही. तुमचं यश सर्वस्वी तुमचं असतं. म्हणून यशाचं संपूर्ण श्रेयही तुम्हालाच असतं. तुम्हाला मिळालेल्या यशाचा आनंद जेवढा तुम्हाला स्वत:ला होतो तेवढा क्वचितच एखाद्या निकटतम व्यक्तीला होत असेल. तुम्ही यशस्वी होता कारण, तुमच्या मनात यशाची तेवढी तीव्रता असते म्हणून.

यश मिळवण्याचा विश्वास निर्माण होतो कसा? जो कायमच यशाचा विचार करतो, कालांतरानं त्याचं चेतन मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं. ज्या विचारांवर चेतन मनाचा विश्वास बसतो ते तो अवचेतन मनाकडे पाठवतो. विचार जर डळमळीत असतील, तर असे विचार चेतन मन अवचेतन मनाकडे पाठवणार नाही, परंतु सातत्यानं तुम्ही यशाचाच विचार करत असाल आणि ‘मला या परीक्षेत यश मिळणारच’ अशाप्रकारचं स्वगत करत असाल, तुम्ही स्वत:च यशाला अनुभवत असाल, तशा भावना निर्माण होत असतील. सकाळ-सायंकाळ आणि जेव्हा तुम्हाला फावला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सातत्यानं तसाच यशाचा विचार करत असाल, तर तुमचाही त्या विचारांवर विश्वास व्हायला लागतो. हाच विश्वास चेतन मनात निर्माण होतो. मग यशाचा हा विश्वासपूर्ण विचार चेतन मन अवचेतन मनाकडे पाठवतो. हा एकप्रकारचा अवचेतन मनाला चेतन मनानं दिलेला आदेशच असतो. जसा हा विचार अवचेतन मनाकडे जातो तशीच या विचारांची छाप मेंदूतल्या कार्य करणा-या पेशींवर पडते आणि अवचेतन मन तात्काळ त्या दिशेनं कामाला लागतं. अवचेतन मनाची शक्ती असीमित असते, याविषयी तुम्ही ऐकलं असेल. 

अवचेतन मन चेतन मनाच्या तुलनेत दहा हजार पटीहून अधिक ताकदवर असतं. आजचं विज्ञानही त्याविषयी निश्चित संशोधन करू शकलेलं नाही. अवचेतन मनामध्ये आलेला यशस्वीतेचा विचार पूर्णत्वास नेण्यासाठी अवचेतन मन नकळतपणे तुमच्याकडून ते कार्य करवून घेतो, जे यश मिळवण्यासाठी गरजेचं असतं. तुम्हाला अभ्यास महत्त्वाचा वाटायला लागतो. तुमचा दैनंदिन प्राधान्यक्रम बदललेला असतो. यशासाठी जे जे गरजेचं असतं त्या दिशेनं तुमची वाटचाल सुरू होते. यशाच्या दिशेनं जाणारे मार्ग खुलायला लागतात. तुम्हालाही अभ्यासात गोडी निर्माण होते. अभ्यासातला कंटाळा छु मंतर झालेला असतो. प्रत्येक वेळी तुम्हीच तुमच्या कर्तृत्वावर आनंद व्यक्त करत असता. बस ‘वाह!’ हाच शब्द प्रत्येक वेळी तोंडून निघतो. ‘एवढं सोपं असून याआधी अभ्यासाकडे दुर्लक्ष कसं झालं’, असंही तुम्हाला वाटतं. असा अनुभव यापूर्वी तुम्हाला आलाही असेल. यशस्वी होणारे अनेक जण नकळत अवचेतन मनात सकारात्मक विचार टाकत असतात आणि अवचेतन मन त्यांचा उद्देश गाठण्यासाठी आकाशपातळ एक करतो. हीच अवचेतन मनाची ताकद असते. जी तुम्हीही अनुभवत असता. तुम्हाला यश हवं, यशाबद्दलच बोला, असं उगाच म्हटलं जात नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात यश हवं असेल, अडथळे आले तरी थांबायचं नसेल, तर अवचेतन मनाला सक्रिय करण्याची विधी प्रत्यक्षात आणा आणि प्रत्यक्ष अनुभवा अवचेतन मनाची अचूकपणे कार्य करण्याची क्रियाशिलता!

___________________                                                                  

अतिचेतन समाधान

आर्किमिडीजबद्दल एक आश्चर्यकारक किस्सा सांगितला जातो. ते आंघोळ करीत असताना त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सापडले आणि ते सेरॅक्यूजच्या सडकेवरून नग्नावस्थेतच ओरडत, ओरडत राजमहालाकडे धावत सुटले ‘‘युरेका! युरेका’’ (‘‘मला मिळाले, मला मिळाले.’’)  

आर्किमिडीज हे प्राचीन ग्रीक गणितज्‍ज्ञ, भौतिकशास्‍त्रज्ञ, अभियंता, संशोधक व खगोलशास्‍त्रज्ञ होते. त्यांचा जन्म सिसिलीमधील सेरॅक्यूज येथे झाला. सोनाराने बनविलेल्या मुकुटात चांदीची भेसळ असल्याचा राजा हिरो यांस संशय आला व त्याची शहानिशा करण्याचे काम आर्किमिडीज यांच्याकडे सोपविण्यात आले. याचे उत्तर त्यांना आंघोळीसाठी टबमध्ये उतरल्यावर अचानक मिळाले आणि ते एवढे रोमांचित झाले की, त्यांना कपड्याचेही भान राहिले नाही आणि ते तसेच धावत सुटले.

असेच काही बाबतीत तुमच्याही सोबत घडले असेल. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करीत होते त्याचे उत्तर तुम्हाला अचानक मिळाले असेल. कधी झोपेतून उठल्याबरोबर, कधी तयारी करीत असताना, तर कधी त्याच विचारात एकांतात बसलेले असताना. हीच आपल्या अतिचेतन मनाची कमाल आहे. अतिचेतन मन तुम्हाला अशाही प्रश्नांची उत्तरे मिळवून देतो की, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. अगदी अचूक उत्तर. फक्त तुम्हाला तुमचा प्रश्न अतिचेतन मनाला विचारता यायला हवा.

जर तुम्ही सकारात्मकतेने संकल्प करता, स्पष्टतेने मानसिक चित्र पहाता आणि महत्त्वाचे म्हणजे त्यावर विश्वास ठेवता, तर तुम्हाला योग्य वेळी योग्य कार्य करण्याची प्रेरणा मिळते. अचानक तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते. यालाच आपण अतिचेतन समाधान म्हणतो. असे समाधान तुमच्या समस्येचे अचूक उत्तर देते. अचानक मिळालेल्या अशा उत्तराने तुम्ही स्वत:च आश्चर्यचकीत होता. तुमच्या प्रत्येक समस्येची तुम्हाला अशीच आश्चर्यकारक उत्तरे हवी असल्यास सर्वप्रथम तुम्ही आकर्षणाचा नियम समजावून घ्यायला हवा आणि मग बघा, तुमच्या जीवनात कशा आश्चर्यकारक घटना घडतात ते!

___________________

कृतज्ञता

कामासाठी वेळ द्या. कारण,

ती यशाची किंमत आहे.

विचारांसाठी वेळ द्या. कारण,

ते शक्तीचं उगमस्थान आहे. 

खेळासाठी वेळ द्या. कारण,

ते तारुण्याचं गुपित आहे.

वाचनासाठी वेळ द्या. कारण,

तो ज्ञानाचा पाया आहे.

स्वत:साठी वेळ द्या. कारण,

आपण असलो तरच हे जग आहे.

आणि  

दुस-यांसाठी वेळ द्या. कारण, ते नसले तर आपलं असणंही निरर्थक आहे.

स्वामी विवेकानंद

स्वामीजींचं हे वाक्य कितीदा तरी तुमच्या कानावर आदळलं असेल आणि कित्येकदा वाचनातून गेलं असेल, परंतु यावर अंमल करणं जमलं की नाही, यावर शंकाच असेल!

शब्दांमध्ये मोठी ताकद असते. सकारात्मक शब्द हे तुमची सकारात्मक भावना तयार करतात. सकारात्मक भावना सकारात्मक घटना घडण्यासाठी, ब्रह्मांडासोबत सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून सकारात्मक शब्दांना शक्तीचं उगमस्थान म्हटलं आहे आणि हे शब्द जर मुद्दाम जिभेवर खेळवायचे असतील, तर सकारात्मक वाचन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आपल्या साप्ताहिकातही आपण भरपूर सकारात्मक वचनं देण्याचा, तसंच मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.

शब्दांमध्ये अत्यंत चमत्कार घडवून आणणारा सर्वात शक्तिशाली शब्द आहे तो म्हणजे ‘कृतज्ञता.’ अनेकदा आम्ही आमच्या वाचकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचंही हेच कारण. तरुण पिढी सोशल मिडियाच्या आहारी गेलीय, असं बोललं जातं, परंतु याच तरुण पिढीनं ‘रोजगार नोकरी संदर्भ’ला घराघरात पोहोचवण्यात मदत केली आणि अजूनही करतात. त्यामुळेच त्यांच्याबद्दल ह्रदयातून कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्या यशासाठी ब्रह्मांडाकडे प्रार्थना करणं हे सहाजिकच आहे. कारण, त्यांना साप्ताहिकाचा फायदा झाला  आता तसाच तो आपल्या मित्रालाही व्हावा, यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे नकळतपणे विवेकानंदांच्या विचारानुसार वाटचाल आहे. ही बाब साधी नाही म्हणून ती दुर्लक्षित करण्यासारखी तर बिलकूलच नाही. म्हणून वाचकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मित्रांनो, तुम्हालाही कुणाची मदत होत असेल, तर ह्रदयातून त्याला धन्यवाद म्हणा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही दुस-याचे धन्यवाद व्यक्त करता तेव्हा ह्रदयात कृतज्ञतेच्या भावना उचंबळून येऊ द्या. मग अनुभवा ‘कृतज्ञता’ या शब्दात किती ताकद आहे ती! ह्रदयातून व्यक्त केलेली कृतज्ञता तुमच्या जीवनात तात्काळ सकारात्मक बदल घडवून आणेल. जे दुस-यांना द्याल तेच तुम्हाला परत मिळेल.

___________________

चिंता कशाला?

करिअरविषयी विद्यार्थ्‍यांचा अॅग्रिसेव्हनेस कळू शकतो, परंतु करिअरबाबत चिंता… छे! असली चिंता कोण करतो ज्याच्याकडे रिकामा वेळ आहे. योग्य कामाची सूची नसलेल्या डोक्यालाच चिंता करायला जागा मिळते. तुम्ही अभ्यास करत असाल, तर प्रत्येक वेळा तुम्हाला अभ्यास केल्यानंतर समाधान मिळते. प्रत्यक्ष अभ्यासाची कृती ही सकारात्मक कृती असल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होतो. अभ्यासाचा कंटाळा आला असेल, तर दुस-या चांगल्या कामात मन रमवावे, चिंता छु मंतर होईल.

चेतन मन एका वेळी एकच विचार करू शकते. मग तुम्ही अभ्यास करीत असाल, तर चिंता होईल कशी? आणि चिंता करीत असाल, तर अभ्यास होणार कसा? म्हणून चिंतेपासून मुक्ती मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वत:ला कोणत्याही चांगल्या कामात गुंतवून ठेवणे.  

मन रमविण्याचा एकमेव मार्ग मोबाईल, च्ॉटिंग, सोशल मिडिया, असे जर वाटत असेल, तर ते एकदमच चुकीचे ठरेल. कारण, त्याने चिंता कमी तर होतच नाही, ती अधिक वाढते. चिंतेने तणाव निर्माण होतो. आणि नंतर डिप्रेशन. म्हणून मोबाईलपासून शक्य तेवढे दूर रहा. आवश्यक तेवढाच त्याचा वापर करा.

एखादे काम अर्धवट सोडणे हेही चिंतेचे, तणाव निर्माण होण्याचे प्रमुख कारण असते. म्हणजे, तुम्ही आज ठरवले की, एवढा अभ्यास पूर्ण करायचा आणि मध्येच मोबाईलमध्ये मित्रासोबत चॅटिंग करायला लागले. ही कृतीच तुमच्या तणावाला कारणीभूत ठरते. अशा वेळी अत्यंत नम्रतेने मित्राची क्षमा मागून नंतर फोन करण्याचे आश्वासन देऊन लगेच अभ्यासाला सुरुवात करावी. अधिक एक महत्त्वाची बाब, जो सातत्याने क्रियाशील असतो तो कधीच तणावाला बळी पडत नाही. म्हणून स्वत:ला चांगल्या कामात गुंतवा, नेहमी क्रियाशील ठेवा आणि चिंतामुक्त जीवन जगा.

___________________

शक्तिशाली ‘स्वगत’

फ्रान्सिस बेकन यांनी म्हटल्याप्रमाणे ‘काही पुस्तके ही केवळ आस्वाद घेण्यासाठी असतात, काही सखोल अभ्यासासाठी, तर काही त्यातील विचारांचे मंथन करून आत्मसात करण्यासाठी असतात.’ मोठ्या व्यक्तींची जीवनचरित्रे, अनुभवी व्यक्तींनी लिहिलेली प्रेरणात्मक पुस्तके ही तिस-या प्रकारात मोडणारी असतात. विश्वातील सर्वात शक्तिशाली नियम ‘आकर्षणाचा नियम’ तुमच्या आमच्यापर्यंत ग्रंथांच्या माध्यमातूनच तर पोहोचला.

शिक्षित असलेल्यांना सुशिक्षित करण्याचे काम जसे पुस्तकांच्या माध्यमातून होते, तसेच व्यावसायिकांना नवनवीन तंत्र आत्मसात करण्याचे कार्यही पुस्तकेच करतात. स्पर्धा परीक्षार्थ्‍यांमध्ये अभ्यासाची जिद्द निर्माण करण्याची ताकदसुद्धा पुस्तकांमध्येच असते. एवढेच काय तर, डिप्रेशनमध्ये गेलेल्यांना संजीवनी देण्याची क्षमताही पुस्तकांमध्ये असते. तुम्ही कोणती पुस्तके वाचता, यावर ते अवलंबून असते. केवळ आस्वादासाठी कथा-कादंब-या वाचत असाल तर ती बाब वेगळी. 

माणूस जन्माला येतो तेव्हा तो तणाव घेऊन येत नाही, तसाच तो बुद्धिमत्ताही घेऊन येत नाही. त्याची संवेदनशिलता, आजुबाजूची परिस्थिती आणि कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची पद्धत तणाव निर्माण करते, तसेच मनुष्याची जिज्ञासा, ज्ञान अर्जित करण्याची इच्छाशक्ती, समाज आणि निसर्गातील घडामोडी समजावून घेण्याची वृत्ती त्याला ज्ञानार्जनासाठी प्रवृत्त करते. जसा तो कुटुंब, शिक्षक आणि मित्रपरिवारातून शिकत असतो, तसाच तो चांगल्या, वाचनीय, प्रेरक, अभ्यासनीय पुस्तकातून आपल्या बुद्धिमत्तेला आकार देत असतो. स्वत:तील क्षमतांची जाणीव जेवढी प्रेरक पुस्तके करून देतात तेवढे ज्ञान क्वचितच दुसरीकडून मिळण्याची शक्यता असते. मानवी जीवन समृद्ध करण्यात पुस्तकांचे महत्त्व असे असाधारण असते. 

नकारात्मक प्रभावांपासून वाचविण्याचे तंत्र विकसित करण्यास पुस्तकेच मोठ्या प्रमाणावर मदत करतात. कारण, तुम्ही जो विचार करीत असता तोच तुमच्या सवयीचा भाग बनतो. दुस-यातील चांगले गुण शोधण्यास आणि ते अंगिकारण्यास सकारात्मक विचार कारणीभूत ठरतात. तुमच्या क्षमता असीमित असतात, त्या स्वत:ला ओळखता यायला हव्यात. शिवाय, त्यांना योग्य दिशा देता यायला हवी. त्यासाठीच तुम्ही स्वत:ला नेहमी प्रश्न विचारायला हवा, ‘या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मला काय करायला हवे?’, या क्षेत्रात यश मिळविण्याची योग्यता आणि क्षमता आपल्यात आहे, यावर विश्वास असायला हवा. त्यावर विश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही तुमच्या सीमित विचारांची आणि अपयशाच्या भीतीची बंधने तोडून टाकायला हवीत. जेव्हा तुम्ही स्वत:चीच भीती घालवता तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ज्या अडचणी वाटत होत्या त्यातील ब-याचशा आपोआपच नाहिशी झालेल्या आहेत. त्या अडचणी तुम्ही तुमच्या स्वरचित विचारप्रणालीतून निर्माण केलेल्या होत्या. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देता, विचार बदलवता तेव्हा भीती आपोआपच नाहिशी होते.

स्वत:चा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपण स्वगत करावे. ‘मी स्वत:वर प्रेम करतो’, ‘मी स्वत:ला पसंत करतो’, ‘यश मिळविण्याची कमालीची क्षमता निसर्गाने मला बहाल केली आहे’,‘मी सदासर्वकाळ सकारात्मकच विचार करतो’, ‘माझ्यात भरपूर क्षमता आहेत.’ ही वाक्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वत:शीच बोला. ही वाक्ये तुमचे जीवन बदलवून टाकतील. तुम्ही विचार केला नसेल अशा अद्भूत, सकारात्मक घटना तुमच्यासोबत घडायला लागतील. तणाव हलका होईल. जीवनात चमत्कार घडायला लागतील. 

तुम्ही तुमच्या विचारांनी वर्तमानातील जीवनाचे निर्माण केले आहे. तुमच्या आजच्या परिस्थितीला तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. याचा दोष दुस-याला देऊन अपयशाला पुन्हा वाट मोकळी करून देण्यापेक्षा त्या वास्तविकतेचा विचार करा. वास्तविकतेचा स्वीकार करणे हीसुद्धा फार महत्त्वाची बाब असते. एक वेळा जबाबदारी स्वीकारली की, त्याच्याशी लढण्याची तयारी बुद्धी करायला लागते. तुम्हाला तुमचे अवचेतन मन असे मार्ग सुचविते, ज्याचा तुम्ही विचारही केलेला नसतो. अनेकदा तुम्ही म्हणता, ‘एवढं सोपं मला याआधी का सुचलं नाही?’ खरे तर, ते सोडविण्यासाठी तुम्ही स्वत:ला प्रश्नच विचारलेला नसतो. तुम्ही त्यातून सुटण्याचा बचावात्मक पवित्रा घेतलेला असतो. आता तुम्ही आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केलेला असतो. विचारांना सकारात्मक वळण देण्यासाठी शक्तिशाली स्वगत करणे सुरू केलेले असते. ख-या अर्थाने आता तुम्ही आखाड्यात उतरलेले असता, म्हणून त्याच पद्धतीने तुमचा अवचेतन मेंदू प्रतिक्रिया द्यायला लागतो. त्या कमालीच्या असतात.

( See SanjayNathe.com for similar articles )

8 thoughts on “थांबायचे नसेल तर… (If you don’t want to stop)”

  1. Hi just wanted to give you a brief heads up and let you know a few of the
    images aren’t loading correctly. I’m not sure why but I think its a
    linking issue. I’ve tried it in two different web browsers and both
    show the same results.

    Reply
  2. Sweet blog! I found it while surfing around on Yahoo News.
    Do you have any tips on how to get listed in Yahoo News?
    I’ve been trying for a while but I never seem to get there!
    Appreciate it

    Reply

Leave a Comment