ब्रेन पॉवर (Brain Power)

संपूर्ण शरीराच्या केवळ दोन टक्के भाग असलेला व फक्त तीन पाऊंड वजन असलेला मेंदू हा आपल्या शरिरात निर्माण होणा-या एकूण ऊर्जेच्या २० टक्के ऊर्जा वापरतो. आहे ना अदभूत! असंच मेंदूचं कार्यही अदभूत आहे. आजही तो आजच्या सुपरकॉम्प्युटरपेक्षा ३० पट वेगानं काम करतोय. हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आपला मेंदू दिवसेंदिवस अधिक तल्लख बनण्यासाठीच बनला आहे. ते अवलंबून आहे तुम्ही त्याचा उपयोग कसा करता त्यावर. २२ जुलै रोजी ‘वर्ल्‍ड ब्रेन डे’ साजरा केला गेला, त्यानिमित्त्यानं…..

प्रत्येकाला वाटतं आपला मेंदू तल्लख असला पाहिजे आणि ते साहजिकही आहे, परंतु तो तल्लख कसा बनेल, याविषयी मात्र आपण अज्ञानी असतो. आपला मेंदू आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणा-या विज्ञानाच्या न्युरोसायकॉलॉजी शाखेने याबाबत अभ्यास केला. मेंदूचा आपल्या स्वभावावर आणि भावनांवर कसा परिणाम होतो, हे त्यांनी तपासलं. या अभ्यासातून असं लक्षात आलं की, मेंदूचा प्रत्येक भाग शरीराच्या वेगवेगळ्या कार्यांशी निगडीत असतो. ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ आणि ‘फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनेंस इमेजिंग’ या आधुनिक तंत्रांमुळे मेंदूचा सखोल अभ्यास करता येतो. मेंदूच्या प्रत्येक मज्जातंतूंना आपापलं काम वाटून देण्यात आलेलं असतं. शरिरातल्या सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते, तर मेंदूची उजवी बाजू शरीराची डावी बाजू नियंत्रित करते.

मानवाची ताकद :

पृथ्वीतलावर जेव्हा मानवाचं अस्तित्व दिसायला लागलं तेव्हा मनुष्य सर्व प्राण्यांत कमजोरच होता. आपण ताकदवान नसलो तरी आपण सर्वात ताकदवान मेंदू विकसित केला जो मानवालाच ताकदवान बनवण्यास कारणीभूत ठरला. आजही इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवी मेंदूचा आकार मोठा आहे. दुस-यांपासून शिकणं, पुन्हा-पुन्हा चुका न करणं आणि एकमेकांत सहकार्य ठेवणं, या त्रिसुत्रीच्या स्वीकारानंच मानवाला जिवंत ठेवलं. एकमेकांना समजण्याची क्षमता हेच आपलं सर्वात मोठं हत्यार आहे. यामुळेच अगदी सुरुवातीच्या काळात आपण जंगलातही जिवंत राहिलो आणि आजच्या या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काळातही. विशेष म्हणजे, प्रत्येकाच्या मेंदूची वायरिंग वेगवेगळी असते. म्हणजे, तुमच्या मेंदूसारखीच रचना असलेला जगात दुसरा मेंदू नाही. मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होतात. कोणत्याही दोन व्यक्तींचे मेंदू समान माहिती, समान पद्धतीनं शिकू शकत नाही. यामुळेच एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते. जी पद्धत जो व्यक्ती अधिक डेव्हलप करतो, त्याच्या मेंदूच्या त्या भागाचा अधिक विकास होतो. म्हणजेच ब्रेन पॉवर वाढवता येते.

मेंदूला ताकदवान बनवण्याचं तंत्र :

नवनवीन गोष्टी शिकणं हा मेंदूला ताकदवान बनवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. आपला मेंदू इंम्प्रूव्ह होण्यासाठीच बनला आहे, हे तुम्ही त्याचा कसा उपयोग करता यावर अवलंबवून असतं. व्यायाम मेंदूची ताकद वाढवतो. सुस्त माणसाचा मेंदू सुस्त असतो. व्यायामामुळं ऑक्सिजनचा फ्लो वाढतो, मेंदू तेज काम करायला लागतो. या बाबी न्युरॉन्सची पैदास वाढवतात. संशोधकांच्या मतानुसार आपला मेंदू साधारणत: २० कि.मी. चालण्यासाठीच बनला आहे. म्हणजे, दररोज एवढं चालल्यावर त्यात ताजेपणा, टवटवीतपणा राहण्यासाठी लागणा-या ऑक्सिजनची आपूर्ती होते. म्हणून आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व मेंदूचा ताजेपणा कायम ठेवण्यासाठी दररोज चालायला हरकत नसावी.

मेंदू एका वेळी एकाच गोष्टीवर फोकस करू शकतो. एका कामावरून दुसरीकडे वळण्यासाठी मेंदूला काही सेकंदांचा वेळ लागतो. म्हणून गाडी चालवतांना फोनवर बोलणं अत्यंत घातक असतं. फोनवर बोलणारा चालक सामान्यांच्या तुलनेत उशिरा ब्रेक लावतो व तुलनात्मक जास्त नुकसान झेलतो, तसेच एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की, जे लोकं नेहमीच ऑनलाईन राहतात त्यांचे विचार विखुरलेले असतात. म्हणून ऑनलाईन असणारे लोकं अनुत्पादक असतात, असं म्हटलं जातं.

मेंदूत आठवण्याच्या वेगवेगळ्या सिस्टिम्स असतात. तुम्ही मिळवलेली माहिती लगेच तुकड्या-तुकड्यांमध्ये विभाजित होऊन कॉर्टेक्समध्ये साठवली जाते. तीच माहिती तीन मिनिटांनी आपण आठवून पाहण्याचा प्रयत्न केल्यास केवळ दहा टक्केच आठवेल, परंतु त्याच माहितीला तात्काळ रिपीट केलं, तर ती ६५ टक्के आठवते. विशेष म्हणजे, तीच माहिती तुम्ही फोटोस्वरूपात तुमच्या मेंदूत साठवू शकले, तर ती ८० टक्के आठवते. याविषयी नाथे प्रकाशनाच्या ‘पुढचं पाऊल’ या पुस्तकात सविस्तर माहिती आलेली आहे.

मेंदू सतत कामात असतो. तो आराम करत नाही. मात्र, झोपेची कमी मेंदूच्या क्षमतेवर असर करते. म्हणून मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं असतं. थकवा जाणवायला लागल्यास पाच-दहा मिनिटांची झोपही तुम्हाला ताजेतवानं तर बनवतेच शिवाय कामाची क्षमताही दुप्पटीनं वाढवते. कायमच तणावाची परिस्थिती असेल, तर मेंदू पाहिजे त्या प्रमाणात लक्षात ठेवू शकत नाही. त्याची क्षमता घसरण्याला त्यात घडणारी रायायनिक क्रिया कारणीभूत ठरते. म्हणून स्वत:ला उत्साही व सकारात्मक ठेवण्याचे मार्ग आपण शोधायला हवेत. दारू, अंमली पदार्थ इत्यादींमुळे उत्साह निर्माण होत नाही, तसंच कोणतंही कुकर्म हे सकारात्मक असू शकत नाही म्हणून हे मार्ग उत्साहाचे व सकारात्मकता निर्माण करण्याचे मार्ग असूच शकत नाहीत. उलट, यामुळे तणाव वाढून मेंदूची कार्यक्षमता कुंठीत होते. सकारात्मकता, तसंच उत्साहासाठी चांगल्या, प्रेरक पुस्तकांचं वाचन उपयुक्त ठरतं.

मेंदूतल्या अर्ध्‍या संसाधनाचा वापर डोळे करतात म्हणून सर्व सेन्सेसमध्ये डोळ्यांचं स्थान सर्वात वरच्या लेव्हलला येतं. मनुष्य आणि स्त्री भावनास्तरावर वेगवेगळे असतात. मुळात दोघांच्या मेंदूची रचनाच त्याप्रमाणे वेगवेगळी असते. असं असलं तरी नावीन्यपूर्ण शिकण्याच्या बाबतीत सर्वांचा कल आपल्या आवडीकडेच असतो आणि तेच त्यासंबंधित ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यकही असतं, पण असो, मेंदूची संरचना एवढी गुंतागुंतीची आहे की, रोजच संशोधक त्याबद्दल काही ना काही नवीन शोधत असतात, परंतु मानवासाठी मेंदू चमत्कारापेक्षा कमी नाही.

‘वर्ल्‍ड ब्रेन डे’चा इतिहास :

२२ जुलै १९५७ रोजी वर्ल्‍ड फेडरेशन ऑफ न्युरोलॉजीची स्थापना करण्यात आली. याच संस्थेनं वर्ल्‍ड ब्रेन डे साजरा करण्याची सूचना केली आणि स्वत:च पुढाकारही घेतला. मात्र, वर्ल्‍ड ब्रेन डे साजरा करण्याची घोषणा होण्यासाठी २०१३ हे साल उजाडावं लागलं आणि २०१४ पासून हा दिवस साजरा केला जातो. जगभरात मेंदूच्या स्वास्थ्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी २२ जुलै २०१४ रोजी पहिल्यांदा वर्ल्‍ड ब्रेन डे साजरा करण्यात आला. निसर्गातल्या या चमत्काराची पॉवर समजून घेण्यासाठी किमान एक दिवस तरी आपण यावर चिंतन करायला हवं.  

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

1 thought on “ब्रेन पॉवर (Brain Power)”

  1. खुप छान मेंदुबद्दल खोलवर अशी माहिती मिळाली,धन्यवाद सर,
    मानसशास्त्र बद्दल आणखी माहिती पोस्ट करता येईल काय सर

    Reply

Leave a Comment