मदतीचा लाभ

संकटात जो दुस-याची मदत करतो त्याला दिलेल्या मदतीच्या हजारो पट लाभ  मिळतो. मदत केल्याने स्वत: जवळील काहीच कमी होत नाही. म्हणून जीवनात कधीच मदतीचा हात आखडता घेऊ नका. निसर्ग कोणाचा द्वेष करीत नाही. झाड सर्वांनाच सावली देते, मग एखादा त्या झाडालाच कापायला आलेला असला तरी!

गुणवत्तेची नक्कल करता येत नाही. गुणवत्ता ही सवयच असावी लागते. एखादी वाट तयार होण्यासाठी ज्याप्रमाणे तिथे सतत ये-जा असावी लागते, त्याचप्रमाणे सखोल वैचारिक मार्ग तयार करण्यासाठी त्या मार्गासंबंधी पुन्हा-पुन्हा विचार केला जायला हवा.

नक्कल करणारा स्वत:ची क्रिएटिव्हिटी गमावून बसतो. त्याला नकलीचा मार्गच योग्य वाटत असल्यामुळे तो स्वत:च्या बुद्धिमत्तेचे आणि विकासाचे मार्गही अवरुद्ध करत जातो. तुम्हाला तुमच्या जीवनात वेगळेपणा हवा आहे ना! मग वेगळे विचार करायला शिका. स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच आवडतो. अनेकदा याविषयी कटू अनुभव येत असले, तरी वैयक्तिक प्रतिमेला यामुळे तडा जात नाही. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण नक्कल करण्याचे टाळतो.

देण्याने वाढच होते

आज खूप काही मिळालं पाहिजे, असा विचार करीत एक भिकारी राजवाड्याकडे निघाला. रस्त्यात एक-दोन घरातून त्याला भिक्षा मिळाली. थोडा पुढं गेल्यावर तो मुख्य रस्त्याला लागला आणि पाहतो तर काय, प्रत्यक्ष महाराजांची स्वारी त्याच्या दिशेने येत होती. जसा राजा भिका-याजवळ पोहोचला तसा त्याने भिका-यापुढे पदर पसरला आणि म्हणाला, “मला तुमच्याजवळचं दान द्या. दुष्काळामुळं राज्य संकटात आहे. त्यातून वाचण्यासाठी मी राजगुरूला उपाय विचारला. राजगुरू म्हणाले, रस्त्यात जो पहिला भिकारी मिळेल त्याच्याजवळ भिक माग म्हणजे राज्यावरचे संकट नाहीसे होईल. कृपया नाही म्हणू नका.” 

भिका-याला या सर्व गोष्टींचे आश्चर्य वाटले. त्याने आपल्या झोळीत हात घातला आणि मूठभर धान्य हातात घेतले, परंतु तत्क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला की, मूठभर राजाला दिले तर आपण काय खायचे. म्हणून तो त्याची मूठ थोडी सैल करतो, पुन्हा तोच विचार…पुन्हा मूठ सैल… असे करता करता तो केवळ एकच दाणा राजाला देतो. घरी गेल्यावर तो पत्नीला घडलेली सर्व हकीकत सांगतो आणि झोळी तिच्याकडे सोपवतो. ती झोळी उलटी करते तेव्हा त्यातून सोन्याचे एक नाणे खाली पडते. त्याचे डोळे खाड्कन उघडतात आणि तो जोरात ओरडतो की, मी राजाला सर्व धान्य का दिले नाही? संकटात जो 

दुस-याची मदत करतो त्याला दिलेल्या मदतीच्या हजारो पट लाभ  मिळतो. मदत केल्याने स्वत: जवळील काहीच कमी होत नाही. म्हणून कधीच मदतीचा हात आखडता घेऊ नका.

निसर्गाचा नियमही तोच

आंब्याच्या झाडाला मुले दगड मारत होती. त्याच झाडाखालून गौतम बुद्ध जात होते. आंबे पाडण्यात मुले एवढी दंग होती की, त्यांचे इकडे तिकडे लक्षच नव्हते. एक दगड गौतम बुद्धाच्या डोक्याला लागला आणि डोक्यातून रक्त वाहायला लागले. बुद्धाचे डोळेही पाणावले. ते पाहून मुलांना कसंसच झालं. ते बुद्धाची क्षमा याचना करू लागले. तुम्हाला खूप लागलं, डोकं दुखत असेल म्हणून डोळे पाणावले. आम्हाला माफ करा-असं ते सारखं म्हणू लागले. गौतम बुद्ध म्हणाले, “बाळांनो, मला लागले खरे आहे, ती जागा दुखत आहे हेही खरे आहे, पण पाणावलेले डोळे हे त्या दु:खाचे कारण नाही. तुम्ही आंब्याच्या झाडाला दगड मारता तरी ते तुम्हाला फळ देते. मी मात्र तुम्हाला काहीच देऊ शकत नाही.” म्हणजे निसर्गाची वृत्तीच देण्याची आहे. गौतम बुद्धाचे शब्द ऐकून मुले स्तब्ध झालीत. ती एकमेकांच्या चेह-याकडे पाहत होती.  निसर्ग कोणाचा द्वेष करीत नाही. झाड सर्वांनाच सावली देते, मग एखादा त्या झाडालाच कापायला आलेला असला तरी! पाणी घाण करणा-यालाही नदी पाणी देतेच. थोडक्यात, मानव जर निसर्गाचाच एक भाग आहे, तर त्याचे वर्तनही निसर्गाशी जुळवून घेणारे का असू नये!


( Visit SanjayNathe.com for more articles )

Leave a Comment