मनाचे सामर्थ्‍य

दु:खाचा पहाड कोसळल्यास रडत वेळ गमविण्यापेक्षा त्यातून मार्ग शोधण्यासाठी धडपडणारा नेहमी यशस्वी होतो. मी काय गमाविले? यात वेळ घालविण्यापेक्षा मी काय कमाविले? यावर चिंतन केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

एक आंधळा रस्त्याच्‍या कडेला उभा राहून भीक मागत होता. ब-याच वेळेपासून एक वाटसरू त्याचेवर नजर ठेवून होता. थोड्या वेळाने वाटसरू त्यांच्‍याकडे जाऊन म्हणाला, ”तुला दिसत नाही, हात तुटलेला आहे आणि ब-याच वेळापासून तुला कोणी भिकही घातली नाही. तरीही तू आनंदी आहेस. तुझ्या चेह-यावर त्रागा नाही की कंटाळा नाही.” भिकारी म्हणाला, ”साहेब, आपण फार दयाळू आहात. मी आंधळा आहे, हे खरे आहे, परंतु आपल्या बोलण्यातील आपुलकी, दयाळुपणा माझ्या हृदयापर्यंत पोहोचू शकला. कारण, मी ऐकू शकतो. देवाने माझे पायही शाबुत ठेवले आहेत. तो किती दयाळू आहे, ज्‍याने तुमच्‍यासारख्या महान व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी मला वाचा दिली. तुमच्‍या भावना समजण्यासाठी कोमल हृदय व विश्लेषणात्मक बुध्‍दी दिली.”  भिका-याशी झालेल्या संवादाने वाटसरू दंग राहिला. माझ्याजवळ काय नाही, यापेक्षा माझ्याकडे काय आहे, याची जाणीव ठेवणारा नेहमीच आनंदी राहतो. दु:खातही सुख शोधणारेच नेहमी आनंदी राहतात.

मला मिळालेला वेळ मी कसा खर्ची घालावा?, हे सर्वस्वी माझ्यावर अवलंबून असते. दु:खाचा पहाड कोसळल्यास रडत वेळ गमविण्यापेक्षा त्यातून मार्ग शोधण्यासाठी धडपडणारा नेहमी यशस्वी होतो. मी काय गमाविले?, यात वेळ घालविण्यापेक्षा मी काय कमाविले?, यावर चिंतन केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हीच सकारात्मकता आपल्या नकारात्मक बाबींचेही विश्लेषण करून त्यातूनही नवीन मार्ग शोधण्यास, स्वत:ची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते. जसा तुमचा चष्मा, तसे तुम्हाला जग दिसते. चष्मा आपण रंगीत चढवितो की साधा, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. काही लोक नेहमीच उत्साही असतात. अशा लोकांची कार्यक्षमताही वाखाणण्यासारखी असते. त्यांचा उत्साह, कार्यक्षमता वाढविते. 

कार्यक्षमतेने इच्‍छाशक्ती प्रबळ होते. हीच इच्‍छाशक्ती तुम्हाला बिकट परिस्थितीतही सकारात्मकता प्रदान करते. अशी माणसे कठीण प्रसंगाला घाबरून पळून जात नाहीत त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. कठीण प्रसंग प्रत्येकावरच येतात. अशा प्रसंगालाही जो खेळाडू वृत्तीने घेतो, जिंकण्‍याच्‍या इर्षेने हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी स्वयंप्रेरणेने कार्य करतो तो यश मिळवितोच. कोणतीही बिकट परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. भलेही ती तुम्हाला दोन पावले मागे टाकण्यास भाग पाडत असेल, परंतु जो मनाने हरतो त्याला पुढे चालण्यास प्रवृत्त करणे अतिशय कठीण असते. गाढ झोपलेल्या माणसाला झोपेतून उठविणे कठीण नसते, परंतु झोपीचे सोंग घेतलेल्या माणसाला उठविणे अत्यंत कठीण असते. म्हणून मनाला काबूत ठेवा. त्याला नकारात्मक विचार करण्यापासून थांबवा. तेही तुमच्‍या शरीराचा अविभाज्‍य अंग आहे. जसे शरीराचे स्नायू तुमच्‍या इच्‍छेशिवाय हालचाल करू शकत नाहीत, तसेच तुमच्‍या मनालाही आपल्या चांगल्या इच्‍छेप्रमाणे वळण लावा. ही कठीण बाब असली तरी ती संभव आहे. चांगल्या सवयी वाईट सवयींना हद्दपार करतात. मनाला चांगल्या विचारांची सवय लावल्यास ते वाईट विचारांपासून तुम्हाला दूर नेईल.

यासाठीच चांगल्या मित्रांची संगत, चांगले वाचन, चांगल्या सवयी असणे अत्यंत गरजेचे असते. मनाच्‍या वेगावर जो नियंत्रण ठेवतो त्याचा अपघात होऊच शकत नाही. दुस-याचे सुख पाहून हळहळणारे खूप सापडतात, परंतु दुस-याच्‍या आनंदाने जे आनंदी होतात तिच खरी माणसं असतात. दुस-याची मदत केवळ पैशानेच होत नाही. मानसिक धीर देऊन, विचारांच्‍या देवाणघेवाणीतूनही दुस-याला मदत करता येते, परंतु त्यासाठी आपण मनाने सकारात्मक, ऊर्जावान, सामर्थ्‍यशाली असलं पाहिजे.


( Visit SanjayNathe.com for more articles )

Leave a Comment