मोठे आश्चर्य

“जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते आहे?’’ यावर युधिष्ठिर उत्तरतो, “या जगात दररोज, दिवसरात्र लोक मृत्यू पावत असतात, तरीही जिवंत राहिलेले लोक संपत्तीची इच्‍छा करतात हेच जगातील फार मोठे आश्चर्य आहे.!” 

महाभारतात एक सुंदर कथा आहे. झाडावर बसलेला यक्ष पाणी प्यायला आलेल्या एकेक पांडवाला प्रश्न विचारतो. जे त्याचे उत्तर देत नाही त्यांना तो मारतो. सर्वात शेवटी ‘धर्मराज’ जातो. युधिष्ठिराला तो विचारतो की, “जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते आहे?” यावर युधिष्ठिर उत्तरतो, “या जगात दररोज, दिवसरात्र लोक मृत्यू पावत असतात, तरीही जिवंत राहिलेले लोक संपत्तीची इच्‍छा करतात, हेच जगातील फार मोठे आश्चर्य आहे.!” सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यानंतर यक्ष खुश होऊन युधिष्ठिराला वर मागायला सांगतो. युधिष्ठिर चारही भावाला पुन्हा जिवंत करायचा वर मागतो. यक्ष तथास्तू म्हणतो. इतर चार भाऊ का मारले गेले होते? कारण, त्यांनी त्या यक्षाच्‍या प्रश्नांची उत्तरे न देता उलट त्यालाच आव्हान दिले होते म्हणून. त्यावेळी त्यांनी क्रोध न करता संयम ठेवून यक्षाच्‍या प्रश्नांची उत्तरे दिली असती तर काय बिघडले असते. 

ब-याच  वेळा आपल्या पाहण्यात येते की, लोक अगदी क्षुल्लक कारणामुळे क्रोधीत होतात. अशा वेळेस सहिष्णुतेपेक्षा आक्रमकतेची भावना बळावते आणि समस्या अधिक वाढते. क्रोधामुळे संभ्रम होतो. संभ्रमामुळे स्मरणशक्‍ती जाते. स्मरणशक्‍ती गेल्याने विवेकबुध्दी नष्ट होते आणि विवेकबुध्दी नष्ट झाल्याने विनाश होतो. निराशेतून उत्पन्न होणा-या भावना या अतृप्त इच्‍छा, महत्त्वाकांक्षा आणि बहुतेक वेळा नात्यांमधून निर्माण होतात. ‘या सगळयांचे मूळ असते अपेक्षा. मग ज्‍या अपेक्षा अतिशयोक्‍त वाटतात, त्या सोडूनच दिल्यात तर… वैफल्यातून निर्माण होणारा क्रोध हाच या सगळयातून निर्माण होणारा असतो. क्रोध मनुष्याला सर्वतोपरी अंध करतो. जेव्हा एक मिनिटभर तुम्ही रागावलेले असता, तेव्हा आनंदाचे हजारो सेकंद तुम्ही घालवलेले असतात. म्हणून संयम हेच मानसिक शक्‍तीचे प्रतिबिंब असते.

‘मनो एव मनुष्यनां कारणं बन्ध मोक्षयो :।’ “मानवी मन हेच मनुष्याच्‍या सुखदु:खाचे मूळ कारण आहे.” पाश्चात्य वैज्ञानिकांनीही गेली तीन दशके संशोधन करून ‘आपले मन हेच आपल्या निरोगी वा रोगी जीवनाचे मूळ कारण आहे’, असा अत्यंत महत्त्वाचा सिध्‍दांत मांडला. म्हणून योग्य वेळी मनाला वेसन घालण्याचे धारिष्ट्य आपल्यात असायला हवं. रडणे हे कोणत्याही गोष्टीच्‍या शेवटी येते, पण हसू हे गोष्ट घडत असताना येते. त्यामुळेच रडण्याऐवजी हसत राहा. 

सुप्रसिध्‍द विचारवंत गार्डन हिन्कले म्हणतो,’आयुष्य हे चांगले कर्म करून त्याची मजा लुटण्यासाठी असते, दु:ख सोसण्यासाठी नव्हे.’ म्हणून स्वत:ची उपेक्षा स्वत:च करू नका. तुम्ही स्वत:चा उध्‍दार स्वत:च करू शकता. तुम्हीच स्वत:चे खरे मित्र आहात. चांगला आणि सकारात्मक विचार करा आणि विचारांप्रमाणेच मिळालेल्या यशाचा आनंद लुटा.  

——————-

( Visit SanjayNathe.com for more articles )

Leave a Comment