यशासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Get out of the comfort zone for success)

आळस हा मानवी स्वभावगुण आहे. जेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या ध्येयावर केंद्रित करता तेव्हा खरी कामाला सुरुवात होते. अशावेळी स्वत:च स्वत:ची वातावरणनिर्मिती करावी लागते. एखाद वेळेला केलेला चालढकलपणा अंगलट येण्याची शक्यता असते. म्हणून स्वत:ला अशा पद्धतीनं मोटिव्हेटेड ठेवा की, ध्येयावरचा फोकस हटणार नाही. आमच्या वाचकांचं स्वत:वरचं नियंत्रण कायम राहावं, सातत्यानं ध्येयाधिष्ठित वर्तन असावं, हाच आमचा प्रयत्न असतो. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी कमजोर पडू नये म्हणूनच संवाद, भन्नाट, भरारी, करिअर मार्गदर्शन इत्यादी लेखमालांच्या माध्यमातून तसा सकारात्मक प्रयत्न केला जातो. आपला वाढता प्रतिसाद या प्रयत्नांना शक्ती प्रदान करतो.

आळस हा चांगल्या विचारांनासुद्धा फाटा देतो. विद्यार्थी अभ्यासाचं वेळापत्रक तयार करतो, एकाच आठवड्यात त्यात बदल करतो, पुन्हा नवं वेळापत्रक तयार केलं जातं, ते पुन्हा बदलवलं जातं. काही दिवसातच अनेकदा केलेलं वेळापत्रक केवळ आळस केल्यामुळे कोलमडतं. हा मानवी स्वभावगुणच. सामान्य माणूस यालाच जीवन म्हणतो. तुम्हीच तुमच्या अपयशाचा विचार केलेला असेल, तर यश मिळणार कसं? ऐश्वर्यात बालपण गेलेल्या व्यक्तींना सुखासीनतेची सवयच जडलेली असते. काही केल्या ते त्या कोषातून बाहेर पड़ू इच्छित नसतात. अशी माणसं नेहमी वरच पहात जगतात. जणू खाली पाहून जगायला त्यांना आयुष्यानं शिकवलेलंच नसतं. आळस रोमारोमात भिणलेला असतो. आयुष्य कळायला लागतं तोवर अनेकांची वेळ निघून गेलेली असते.  

‘तसं पाहीलं तर जीवनात काहीही कठीण नाही, जे काही काठीण्या वाचतं ते सारं आपल्या डोक्यात असतं. सारं काही सरळ सोप आहे. फक्त पूर्ण निष्ठेनं तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करत रहा. सर्वांकडूनच शिका, सर्वांच्याच चांगल्या गुणांचं अनुकरण करा. कौतुक करा. माणसातली लोलुपता त्याचा विनाश घडवून आणते. आयुष्यात ना पळायचं, ना थांबायचं… फक्त चालत राहायचं, चालत राहायचं. जेव्हा कठीण परिस्थितीत घाबरलेले असाल तेव्हा तेव्हा तुमच्यापेक्षा गलितगात्र लोकांकडे बघा, तुम्हाला तुमच्या क्षमतांची ओळख पटेल’, असं आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर म्हणतो तेव्हा ते ऐकलंच पाहिजे. यासाठी एक जिवंत उदाहरण सांगतो.

संदीपचा जन्मही अशाच सुखवस्तू घरात दिल्लीत झाला. त्यांचे वडीलांचा अल्युमिनियमचा व्यवसाय होता. सारी सुखं दिमतीला. खाऊनपिऊन सुखी कुटुंब. वडीलांचा व्यवसाय मस्त मजेत चालला होता. सर्वत्र बरकतच बरकत. काही कुठं कमी नव्हतं, पण एकाएकी हा व्यवसायच ठप्प झाला. सारंच कुटुंब रस्त्यावर आलं. वडीलांनी व्यवसाय सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेरीस सारंच व्यर्थ. जगण्यातली ग्राऊंड रिअॅलिटी आता कुठं सा-यांना दिसू लागलेली होती. उद्योग-व्यवसायात चढउतार असतातच. अशा परिस्थितीत काही जण नैराश्याच्या गर्तेत जातात. संदीपच्या वडीलांचंही तेच झालं. या परिस्थितीनं सारं कुटुंब एकमेकांना धरून राहून आला दिवस ढकलू लागलं. पोटाशी दोन मुलं आणि ही दोघं पती-पत्नी. त्याच्या आईलाही काही सुचेनासं झालं. संदीप त्यावेळी होता 17-18 वर्षांचा. शिक्षणात फारसं लक्ष नव्हतं. दिल्लीतल्या करोडीमल कॉलेजचं शिक्षण तिस-या वर्षापासून ते सोडलेलं. बाहेर नुसतं हुंदडणं सुरू होतं, पण या परिस्थितीनं आईवडीलांचे रोजच्या रोज काळवंडलेले चेहरे पाहून तो अस्वस्थ व्हायला मात्र लागलेला होता. हळूहळू या तरुणात अकाली प्रौढत्व संचारून त्याच्यातलं सेल्फ मोटिव्हेशन जागं व्हायला लागलेलं होतं. आपणच या घरातले मोठे आहोत, ही भावना आतल्या आत ढुसण्या देऊ लागली. काही तरी केलं तर पाहिजेच म्हणून त्यानं मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी जॉईन केली. तसंच आई घरीच वस्तू तयार करायची आणि संदीप त्या घरोघरी जाऊन विकायचा, पण संदीपचा पाय एका जागी टिकतच नसे. अनेकानेक लहानसहान कामं त्यानं करून पाहिली. संदीप स्वत:तल्या क्षमतांचा शोध या सा-या धडपडीतून घेत राहिला. नंतर त्यानं कशीबशी बी.कॉम.ची पदवी घेतली. शिक्षणाचा तेवढाच काय तो आधार. नंतरही त्याचे अनेक व्यवसाय बुडाले. अनेकदा मित्रांनी त्याची जाम खिल्ली उडवली. संदीपही निराश राहू लागला, पण एका मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीच्या चर्चासत्रानं त्याच्यात प्राण फुंकला. त्यावेळी तो होता 19-20 चा. त्यानं स्वत:लाच पुन्हा एकदा संघर्ष करण्याची संधी दिली. अशी संधी प्रत्येकानं पुन्हा पुन्हा स्वत:ला द्यायचीच असते. तो पायपीट करतच राहिला. स्वभावाप्रमाणे त्यानं नवीन फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. अनेक अपयशं पचवली, पण अढळ राहिला. 

त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय इतका चालला की, 12 तासात 100 मॉडेल्सचे 1 हजार फोटो त्यानं काढले. या विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉडनं दखल घेतली. त्यामुळे अनेक जाहिरात कंपन्यांची कामंही चालून आली…. आणि बघता बघता त्याची कंपनी भारतातली सर्वात मोठी फोटोग्राफी एजंसी म्हणून नावारूपास आली. 2006 मध्ये ऑनलाइन इमेज बाजारात तो उतरला. आज देशातली ही सर्वात मोठी ऑनलाइन फोटोग्राफी कंपनी झालेली आहे. आज त्याच्याकडे सुमारे 45 देशांमधले 7800 क्लायंट्स आहेत. आज तो इमेज बाजार डॉट कॉमचा संस्थापक सीईओ आहे. देशविदेशात त्याला मोटिव्हेटर म्हणून निमंत्रित केलं जातं. नैराश्यग्रस्त अनेक तरुणांना त्यानं जगण्याची नवी उभारी दिलेली आहे. संदीप आळसावर आणि अपयशांवर मात करणं शिकला. त्याच्या लाईफ चेंजिंग सेमिनार्सना तर तरुणाईची अफाट गर्दी असते. क्रिएटिव्ह एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर पुरस्कारानं त्याला गौरवण्यात आलेलं आहे. बिझनेस वर्ल्‍ड या नामवंत मासिकानं पहिल्या पानावर त्याचं छायाचित्र प्रकाशित केलं. ग्लोबल मार्केटिंग फोरमनं त्याला निवडलं. ब्रिटिश हायकमिशनचा युवा उद्यमी पुरस्कारही त्याला मिळाला. संदीप म्हणतो, ‘प्रत्येकाच्या मनात त्याचा गुरू असतोच. योग्य वेळी या गुरूचं ऐका.’ त्याचा कौल घ्या. ‘सब कुछ आसान’ हा त्याच्या आयुष्यातला परवलीचा शब्द आहे. ‘अ स्मॉल बुक टू रिमाईंड यू समथिंक बिग’ हे त्याचं पुस्तक खूप गाजलेलं आहे.

‘सेल्फ मोटिव्हेशन’चा कोणत्याही यशात मोठा वाटा असतो. शाळा, कॉलेज सुरू असताना अभ्यासक्रम संपवणं, ही साधारण बाब असते, परंतु शाळा, कॉलेज बंद असताना अभ्यासक्रम आटोक्यात आणणं, ही असाधारण बाब असते. कारण, शाळा, कॉलेज बंद असताना तुम्हाला प्रेरणेचा अभाव असतो. शिक्षक, मित्रपरिवार दुस-या प्रकारात उपस्थित नसतो. अशा वेळी स्वत:च स्वत:ची वातावरणनिर्मिती करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. विशेष म्हणजे, याचे सर्व पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतात, परंतु महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष आणि कमालीचा आळस तुम्हाला त्या दिशेनं वळूच देत नाही. परिणामी, स्वत:च्या चिंता आपण स्वत:च वाढवत असतो. तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, त्या अभ्यासात नियमितता नसेल, तर तुमच्या मित्रांनाही त्या दिशेनं प्रवृत्त करा. इथं दोन-चार मित्रांचा ग्रुप बनेल. जेव्हाही तुम्ही एकत्र याल तेव्हा अभ्यासावर चर्चा कराल. प्रत्येक चर्चेत तुम्हाला तुमच्याच अभ्यासातल्या कमतरता लक्षात येतील, त्या भरून काढण्यासाठी आणि इतर मित्रांपेक्षा पुढाकार घेण्यासाठी तुम्ही जोरात कामाला लागाल, सेकंद-सेकंदाचा हिशेब ठेवाल. नकळत तुम्ही यशासाठी मेहनत करायला लागाल. आपोआपच अभ्यासात सातत्य निर्माण होईल. अशीच वातावरणनिर्मिती करायची असते. यासाठी तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही, परंतु मित्रांना जवळ करेल कोण?

जिंकण्यासाठी फक्त प्ल्ॉनिंग करून चालणार नाही, केलेल्या प्ल्ॉनवर अंमलबजावणी करणं महत्त्वाचं असतं. बरेचदा स्वत: केलेल्या प्ल्ॉनवर अंमलबजावणी करण्यासाठी स्वत:वरच अक्षरश: जबरदस्ती करावी लागते. दोन-तीन वेळा यात तुम्ही यशस्वी झालेत की, मग मात्र ते सहजतेनं जमायला लागतं. काहीच दिवसात वेळापत्रक तुमच्या सवयीचा भाग बनतं. तरीही कधी ना कधी तुमचा आळस तुमच्या आडवा येतोच आणि पुन्हा वेळेचा अपव्यय सुरू होतो. म्हणून स्वत:ला सेल्फ मोटिव्हेटेड ठेवणं गरजेचं असतं. धरपकड करणा-या विद्यार्थ्‍यांचं काही खरं नसतं. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. पण तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना, मग इथं दिलेले सर्व लेख वाचा. प्रेरक पुस्तकं जवळ असू द्या. जेव्हा जेव्हा निराशा येईल तेव्हा प्रेरक पुस्तकं वाचा, परंतु करिअरच्या दिशेनं टाकलेलं पाऊल डळमळू देऊ नका.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांसाठी

N Rojgar या अॅपवर घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षा मैलाचा दगड ठरतील. तुमच्या अभ्यासाला गती देण्याचं कार्य या परीक्षा करतील. प्रामाणिकपणे या परीक्षांचा अभ्यास करा. या स्पर्धा केवळ एकाच टप्प्यात संपणार नाही. प्रत्येक महिन्यात या परीक्षा नवीन स्वरूपात तुमच्यासमोर येत राहतील. सध्याच या अॅपमध्ये पोलीस भरतीचे 3000 हून अधिक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांचा अभ्यासू विद्यार्थ्‍यांकडून टप्प्या-टप्प्यानं अभ्यास करवून घेण्याचं काम आम्ही करू. विद्यार्थ्‍यांनी या परीक्षेत भाग घेताना ठरवायचंय की, मलाच प्रथम यायचंय आणि प्रत्येकानं अत्यंत प्रामाणिकपणे जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा. यशासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावंच लागतं, हे लक्षात असू द्या. तुमचे आताचे हे प्रयत्न निश्चित तुम्हाला तुमचा उद्देश गाठण्यासाठी उपयुक्त ठरतील, याची खात्री आहे.

आपलीच प्रतिमा होते….

आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार, दयाभाव असला, तर इतरांच्या मनातूनही चांगलेच विचार, चांगल्याच भावना आपल्यापर्यंत येतील व आपला उत्कर्ष होईल. म्हणजेच, उत्कर्षाची सुरुवात आपल्याच विचारांतून आणि विचारांमुळे निर्माण झालेल्या भावनेतून होते. आपल्याच भावना आपल्याला चांगल्या किंवा वाईट विचारांविषयी अवगत करत असतात.

 दिवसभ-यात माणसाच्या डोक्यात साठ हजारांहून अधिक विचार येतात. यात सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक विचार जास्त असतात. एवढ्या विचारांवर लक्ष ठेवणं आपल्याला शक्यही नसतं. यातले नकारात्मक विचार कोणते, हे ओळखण्याची व्यवस्था निसर्गानंच करून ठेवली आहे. ज्या विचारांनी आपल्या भावना उत्साही, आनंदी, प्रेरणात्मक बनतात ते सर्व विचार सकारात्मक आणि जेव्हा तुमच्या भावना निरुत्साही, पिडादायक बनतात ते विचार नकारात्मक असतात. जर आपण आपल्या भावनांवर लक्ष दिलं, तर आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक विचार ओळखता येतात. जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार मनात कुरतडू लागतात तेव्हा सरळ सरळ आपण त्या विचारांकडे दुर्लक्ष करून स्वत:ला जाणीवपूर्वकच आनंददायी गोष्टींकडे वळवायचं असतं. नकारात्मक विचार दुस-यांचं नव्हे, तर स्वत:चंच नुकसान जास्त करतात. असे विचार व्‍देष, मत्सराला जन्म देऊन स्वत:लाच अस्वस्थ करतात. व्‍देषातून निर्माण झालेला राग स्वत:चा विचार करण्याच्या क्षमतेला कुंठित करतो, बुद्धीवरच काळोखी ओढतो. परिणामत: मनुष्य आपला सद्सद्विवेक गमावून बसतो. नेहमी नेहमी केलेले असे विचार मनुष्यालाच चिंतेच्या खाईत ओढत नेतात आणि पुढं जीवनच यातनामय होऊन जातं.

तुम्ही नेहमीच सुखी, आनंदी राहावेत यासाठीच निसर्गानं तुम्हाला भावना दिलेल्या आहेत. त्याचा उपयोग स्वत:चे विचार सकारात्मक करण्यासाठीच केला, तर जीवनात आमूलाग्र बदल घडून येतील. तुमच्या जीवनात होणा-या बदलांची तुम्ही कल्पनाही केली नसेल एवढे चांगले बदल होतील. याविषयी आपण सविस्तर माहिती ‘आकर्षणाचा नियम’ या पुस्तकात बघितली आहे. असं म्हणतात की, ‘व्हॉट गोज अराऊंड कम्स अराऊंड.’ म्हणजे, तुमच्या मनात जे विचार येतील, तुम्ही जे विचार व्यक्त करालतेच विचार तुमच्याकडे परततात. म्हणूनच नेहमी चांगलाच विचार करा. अगदी शत्रूच्याही भल्याचाच विचार करा, असं आपले संत महात्मे सतत बजावत आलेले आहेत. कारण, चांगले विचार चांगल्या विचारांनाच आणि वाईट विचार वाईट विचारांनाच आकर्षित करतात. कारण, आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी. परंतु तुमचे आजूबाजूचे वातावरणच नकारात्मक असेल तर काय? तर तुम्ही तिथून स्वत:ला अलिप्त करून चांगल्या व्यक्तींच्या किंवा तेही शक्यच नसेल, तर चांगल्या प्रेरणादायी पुस्तकांच्या सहवासात ठेवा. ग्रंथ वाचनानं माणसांची आयुष्यं बदललेली आहेत, हे वास्तव आहे. ‘किनवटचे दिवस’ हे पुस्तक वाचल्यावर डॉ. अशोक बेलखोडे या उच्चशिक्षित डॉक्टरला आदिवासींची आरोग्यसेवा करण्याचा ध्यास लागला. ते ध्यासपर्व आजही सुरू आहे. विनोबाजी आणि जयप्रकाश नारायण यांच्या शब्दांनी चंबळ खो-यातल्या खुंखार दरोडेखोरांना माणसात आणलं, हा तो व्यक्तिप्रभाव असतो. म्हणून चांगल्या व्यक्ती किंवा चांगलं वाचनच माणसाचे विचार सकारात्मक ठेवतात. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक तुम्ही यात सातत्य ठेवलं, तर पुढं पुढं तो वाचनसंस्कार तुमच्या अंतर्मनाचा भाग होऊन विचारांना हवी ती दिशा देण्याची ताकद तुमच्यात निर्माण करतो.

शॉलो वॉटर कॅन नॉट…

मानवी शरीर काम करण्यासाठी बनवलेलं आहे. आराम करण्यासाठी नाही. तुम्ही दैनंदिन जीवनात ठरवलेले उद्देश गाठण्यासाठी तुम्हाला मिळालेली ती अप्रतिम देणगी आहे. तुम्ही जीवनात असेही लोक पाहिले असतील जे बुद्धिमत्तेनं आणि शारीरिक क्षमतेनं तुमच्यापेक्षा कमजोर आहेत, परंतु ते तुमच्यापेक्षा अधिक यशस्वी ठरल्याचं बघितलं असेल. ते यशस्वी ठरलेत कारण, त्यांनी असं कार्य केलं जे त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आलेत. एका सुरक्षित जागी बसून राहण्यापेक्षा नवीन काहीतरी करून पाहण्याच्या प्रचंड इच्छेमुळेच ते यशस्वी ठरलेत.

आपल्या भौतिक सुखांच्या विळख्यातून एक ना एक दिवस सोडावाच लागेल तेव्हाच आपल्या प्रगतीचे व यशाचे मार्ग सुकर होतील. ज्यांना कोणतीच सुखं लाभलेली नव्हती त्यांनीही यशोशिखरं काबीज केलीच आहेत. यशस्वी व्हायचं, तर तुम्हाला काहीतरी ध्येय तर ठरवावंच लागेल. कुठं जायचंय हेच माहिती नसेल, तर मार्ग तरी कसा गवसणार? 

श्रीकांत बोल्ला जन्मांध. सा-यांनीच त्याला असं मोठं करण्यापेक्षा आताच संपवून टाकण्याचा सल्ला दिला. त्याच्या आईवडीलांनी त्यांना हुसकावून लावलं. आंध्र प्रदेशातल्या सातीरामपूरममधल्या या कुटुंबाची गुजराण फक्त शेतीवर. सर्व अपमान त्यांनी शांत मनानं पचवले. श्रीकांतला त्यांनी गावातल्या सामान्य मुलांच्या शाळेत घातलं खरं, पण तिथं त्याच्याशी कुणी बोलेनात. अचकट-विचकट शेरे ठरलेलंच. तो आतून धुमसत राहिला. श्रीकांत मात्र स्वत:शीच बोलत राहायचा. प्रत्येकानं आपण जसं आहोत तसं स्वत:ला स्वीकारलं की, प्रश्न सोपे होत जातात. त्यानं तेच केलं. त्यानं फक्त स्वत:तल्या उणिवांशीच स्पर्धा केली. तो 90 टक्क्यांनी दहावी झाला. अकरावी-बारावी त्याला विज्ञान शाखेतून करायचं होतं, पण सगळीकडून नकारघंटा. सहा महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर त्याला या शाखेत प्रवेशाची परवानगी मिळाली. त्यानं बारावीला 98 टक्के गुण घेतले. आत्मविश्वास असा लखलखीतच असतो. बारावीनंतर इंजिनीअरिंगसाठी त्यानं आय.आय.टी.त जायचं होतं. पुन्हा तेच. मग या पठ्ठ्यानं जगातल्या चार-पाच विद्यापीठांना अर्ज टाकले आणि आश्चर्य म्हणजे, भारतातल्या आय.आय.टी.नं नाकारलेल्या श्रीकांतला अमेरिकेतल्या म्ॉसाच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं प्रवेश दिला. तिथं मेंदू व बुद्धी आकलनशा व बिझनेस म्ॉनेजमेंटमध्ये पदवी घेणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होता. अनेक कार्पोरेट कंपन्यांच्या ऑफर्स टाळून तो मायदेशात परतला आणि 2011 मध्ये विकलांग बालकांसाठी ‘समन्वय’ नावानं केंद्र सुरू केलं. 2012 मध्ये श्रीकांतनं स्वत: बोल्लांट इंडस्ट्रिज नावानं कंपनी काढली. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांनी त्याच्या इंडस्ट्रीला मदत केली. टाकावू कागदांपासून पुन्हा टिकावू वस्तू तयार करणारी त्याची इंडस्ट्री 2016 मध्ये 150 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत होती. 2017 मध्ये 30 वर्षाखालील आशियातल्या 30 नवोदित व्यावयायिकांच्या यादीत फोर्ब्‍सनं त्याची नोंद केली. जगातल्या दूरदर्शन वाहिन्यांनी त्याची दखल घेतलीच, पण देशविदेशातले पुरस्कारही त्याला लाभले. श्रीकांत बोल्ला आज या कंपनीचा सीईओ आहे. तो म्हणतो, ‘‘आयुष्यातल्या ब:याच टप्प्यांवर मी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी बोलत राहिलो. त्यांनी मला, आयुष्यात मागं वळून न बघता भविष्याकडे डोळे लावण्याचा वेळोवेळी सल्ला देऊन हिंमतच दिली.’’ यासाठी सुरक्षित कम्फर्ट झोनच्या बाहेर यावंच लागतं. ‘शॉलो वॉटर कॅन नॉट मेक द सेलर टफ.’ म्हणजे, शांत समुद्र नावाड्याला कणखर बनवत नसतो. त्याचा खरा कस लागतो तो खवळलेल्या समुद्रातच, असा त्याचा अर्थ, पण यातच मोठा जीवनार्थ दडलाय.

(  See SanjayNathe.com for similar articles  )

6 thoughts on “यशासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Get out of the comfort zone for success)”

Leave a Comment