यशाचे गुपित (The secret of success)

अकबर हसला आणि पुढे चालायला लागला. बिरबलाच्‍या चातुर्याचे त्याला कौतुक होतेच, परंतु नकारात्मक प्रश्नांनाही सकारात्मक पध्‍दतीने सोडविण्याचे कसबही त्याच्‍यात आहे याची जाणीव त्याला झाली होती.

अकबर आणि बिरबल एकदा बागेत फिरत असताना अकबराने बिरबलला प्रश्न विचारला, ‘इंद्रदेव मोठा की मी मोठा.’ बिरबलाने सुस्कारा टाकत विचारपूर्वक उत्तर दिले, ‘जहांपनाह तुम्ही मोठे.’ अकबर म्हणाला, ‘ते कसे?’, बिरबलाने उत्तर दिले, ”यावेळी पृथ्वीची निर्मिती करण्यात आली त्यावेळी ब्रम्हदेवाने तुम्हा दोघानांही तराजूत तोलले. त्यात तुमचे वजन जास्त भरले म्हणून तुम्हाला खालचे म्हणजे पृथ्वीचे राज्‍य बहाल केले आणि इंद्रला वरचे म्हणजे स्वर्गाचे राज्‍य बहाल केले.’ अकबर हसला आणि पुढे चालायला लागला. बिरबलाच्‍या चातुर्याचे त्याला कौतुक होतेच, परंतु नकारात्मक प्रश्नांनाही सकारात्मक पध्‍दतीने सोडविण्याचे कसबही त्याच्‍यात आहे, याची जाणीव त्याला झाली होती.

पुन्हा एकदा अकबराने बिरबलाची फिरकी घेण्याचे ठरविले. अकबर आणि जेदा आंबे खात बसले होते, तेवढ्यात बिरबल तिथे आला. बिरबल येण्यापूर्वी अकबराने खाल्लेल्या आंब्याच्‍या आठोळया राणीसमोर टाकल्या होत्या. बिरबल पोहोचताच अकबर म्हणाला, ‘पहा बिरबल, राणी किती खादाड आहे. एकाच वेळी किती आंबे   खाल्ले तिने.’ बिरबल उच्‍चारला, ‘जहांपनाह, माफी असावी, परंतु आपण तर आठोळीही सोडली नाही, आठोळीसहित आंबे खाल्ले’. राणीला हसू आवरता आले नाही. याही वेळेस बिरबिलाच्‍या उत्तराने राजा निरुत्तर झाला. ”

तात्पर्य, योग्य वेळी योग्य उत्तर देण्याचे कसब निर्माण करणे हेही एक यशस्वीतेचे गुपित आहे. बिरबलाला अशाप्रकारे कसब एकदम प्राप्त झाले नव्हते. सुरुवातीला केलेल्या चुकांमुळे त्याचा  मृत्यूदंड थोडक्यात वाचला होता. अनेक चुकांतून तो अचूकतेकडे वळला म्हणूनच यशस्वी ठरला. केवळ मृत्यूदंडाचा विचार करून उत्तर देण्याचे टाळले असते, तर आज बिरबलाएवढी प्रसिध्‍दी मिळाली नसती. कार्य करणाराच अपयशी होतो. जो कार्यच करीत नाही तो अपयशी होण्याचा प्रश्नच नाही. मग मी अपयशाला घाबरतो म्हणजे काय? तर मी यशापासून दूर जातो. एखाद्या कार्यात यश मिळविल्याने व्‍यक्‍ती यशस्वी बनत नाही. प्रत्येक घरात शिकणारा मुलगा किंवा मुलगी आहे. प्रत्येकाच्‍या कामाची, त्याच्‍या करिअरची माहिती ‘रोजगार नोकरी संदर्भ’मध्ये असावी, असा माझा अट्टाहास असतो. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही केले जातात. कशासाठी तर प्रत्येकाच्‍या घरात असणारा तरुण, तरुणी सकारात्मक विचारांची असावी, ते विचार व आचाराने रोजगारक्षम तर असावेतच शिवाय मोठ्यांचा सन्मान ठेवणारे ‘संस्कारक्षम’ सुद्धा  असावेत. अर्थात, त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत असतोच. त्यामुळेच दिवसागणिक साप्ताहिकात नवनवीन बदल केले जातात. मुलांची निकड म्हणून साप्ताहिक प्रत्येकाच्‍या घरी पोहोचलेसुद्धा. म्हणून काय आमची जबाबदारी तिथे संपेल का? पुन्हा गाठलेले यशाचे शिखर कायम ठेवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू होतील. अधिक चांगले, त्याहूनही अधिक चांगले, त्याहूनही अधिक चांगले…. आणि हे प्रयत्न कायमच राहील. थोडक्यात, यश म्हणजे नक्की काय, तर सातत्यपूर्वक ध्येयाच्‍या दिशेने केलेली घोडदौड. ती एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ती कोठेही थांबत नाही. एक उद्दिष्ठ गाठल्यानंतर पहा दुसरे उद्दिष्ट डोळयासमोर असतातच. मात्र, यशाचे मूल्यमापन आपण तुलनात्मक करीत असतो. मी इतरांच्‍या तुलनेत श्रीमंत झालो म्हणजे मी माझे उद्दिष्ट गाठले. आता पुन्हा त्या स्थानावर टिकून राहण्यासाठी  प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होते. कारण, दुस-या व्यक्‍तीही तुमच्‍यापेक्षा अधिक श्रीमंत होण्यासाठी धडपडत असतातच.

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

Leave a Comment