यश मिळवायचेय, मग सवयींची दिशा बदला (If you want to succeed, then change your habits)

मनुष्य दिवसातील ४० टक्के काम आपल्या सवयींनुसार करतो. यातील सर्वच सवयी चांगल्या असतीलच असे नाही. काही अनुत्पादक सवयी वाढत जातात. त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतात की त्याचा त्रास असह्य होतो. मग तणाव निर्माण होतो. स्वत:चा चिडचिडेपणा दुस-यांसाठी डोकंदुखी ठरते. घरातील अशांत वातावरण शांत होण्याऐवजी अधिक अशांत होतं. या सर्व घडामोडीला एकच गोष्ट कारणीभूत ठरलेली असते, ती म्हणजे तुमची चुकीची सवय. जी तुम्हाला तेव्हाच थांबविता वा बदलता आली असती.

आपल्या दैनंदिन कार्याचे आपण ढोबळमानाने तीन भागात वर्गीकरण करतो, १) अनावश्यक २) महत्त्वाचे आणि  ३) अति महत्त्वाचे. खरं तर आपल्या काम करण्याचा क्रम अति महत्त्वाच्या कामाकडून सुरुवात व्हायला हवा असतो. परंतु आपण आपल्या सवयींमुळं अशा गोष्टींवर वेळ घालवत असतो ज्या महत्त्वाच्या नसतात. साहजिकच अशा सवयी स्वत:चाच तणाव वाढवतात. सवय कायमच राहिल्यास हाच तणाव डिप्रेशनला कारणीभूत ठरतो. विशेष म्हणजे, काय योग्य, काय अयोग्य हे तपासण्याची प्रत्येकाची क्षमता असते. पण आपण ती क्षमताच धुडकावून लावतो आणि स्वत:ला बजावत राहतो की प्रश्न  तर दुस-यांत आहेत. खरं तर प्रश्न तुमच्या स्वत:त असतात ते तुम्ही इतरांवर थोपवत असता. हेच तुमच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण असतं. संशोधन असं सांगतं की वीस टक्के चांगल्या कामात घालविलेला वेळ तुम्हाला ऐंशी टक्के फायदा करून देत असतो.

स्टॅनफोर्ड विद्यापीठात लहान मुलांवर प्रयोग करण्यात आला. एका हॉलमध्ये चाळीस कम्पार्टमेंट तयार करण्यात आलेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये केक ठेवण्यात आला. तिथे सहा वर्षे वयोगटातील मुलांना पाठविण्यात आले. प्रत्येकाला केकजवळ अर्धा तास केक न खाता थांबायचे होते. प्रत्यक्षात केवळ ३० टक्के मुलांनीच केक खाल्ला नाही. बाकी सर्वांनी पहिल्या अर्ध्‍या तासात केक खाल्ला. पुढे वीस वर्षांनी जेव्हा त्याच मुलांचे निरीक्षण करण्यात आले तेव्हा असे आढळले की, ती सर्वच ३० टक्के मुले उर्वरित 70 टक्के मुलांच्या तुलनेत यशस्वी जीवन जगत होती. म्हणजे ज्यांच्यात इच्छाशक्ती होती ते यशस्वी झाले होते. इच्छाशक्ती असणे हे सुद्धा महत्त्वाचे असते. अभ्यासाने इच्छाशक्ती वाढविता येते.

एमआयटीच्या प्राध्यापकांनी सवय कशी लागते यासंबंधित उंदरावर प्रयोग केले. उंदराला दिसणार नाही अशा अडगळीच्या ठिकाणी चॉकलेट ठेवण्यात आले. सुरुवातीला जेव्हा उंदराने ती चॉकलेट शोधून काढली तेव्हा त्याचा मेंदू जास्त क्रियाशील होता. परंतु एकदा त्याला चॉकलेटचे ठिकाण आणि तेथपर्यंत जाण्याचा रस्ता माहिती झाला तेव्हा त्याचा मेंदू कमी क्रियाशील झाला. अर्थात तो त्याच्या सवयीचा भाग झाला. जेव्हा कोणतीही गोष्ट आपल्या सवयीचा भाग बनते, तेव्हा मेंदू कमी क्रियाशील राहतो हे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. सामान्य मनुष्य दिवसभरातील चाळीस टक्के काम सवयीनुसारच करत असतो. जसजसा तो सवयींच्या कामातील वेळ वाढवितो तसतशी त्याच्या मेंदूची क्रियाशीलता कमी होत जाते. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा त्याच्या सवयींनुसार काम होत नाही तेव्हा तेव्हा त्याच्यात चिडचिडेपण पहायला मिळते. म्हणून येथे जास्त महत्त्वाचं ठरतं की, तुमच्या सवयी कोणत्या आहेत. चांगल्या सवयी असतील तर काही प्रश्न नसतो. पण वाईट सवयी असतील तर प्रश्नच प्रश्न निर्माण होतात. महत्त्वाचे म्हणजे वाईट सवयींना विरोध करून त्या बदलविता येत नाहीत. सवयी बदलण्यासाठी सवयींची दिशा बदलायला हवी. चांगल्या सवयी कशा लागतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सवयी बदलता येतात, यावर विश्वास असायला हवा. सवयी कशा बदलायच्या यावरही बरीच संशोधनं झाली आहेत. दारूसारखं व्यसन सोडण्यासाठी अल्कोहोलिक अॅनानिमसमध्ये याचा उपयोग केला जातो. विचारांमधून व्‍देशाला हद्दपार करता आले तरी ब-याच विकार निर्माण करणा-या सवयी बदलता येतात. काही सवयी जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर बदलता येतात. तुमच्या इच्छाशक्तीला चार्ज करण्याचं बटन तुमच्याकडेच असतं. चांगल्या सवयी तुमची वेगळी ओळख निर्माण करतात. आपल्या मनाला अशाच चांगल्या सवयीकडे वळविता यायला हवं. हे फार अवघड नसतं, फक्त थोड्या प्रयत्नांची गरज असते.

सवयींना विरोध करून त्या बदलविता येत नाहीत. सवयी बदलण्यासाठी सवयींची दिशा बदलायला हवी. चांगल्या सवयी कशा लागतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सवयी बदलता येतात, यावर विश्वास असायला हवा.
सवयी कशा बदलायच्या यावरही बरीच संशोधनं झाली आहेत. दारूसारखं व्यसन सोडण्यासाठी अल्कोहोलिक अॅनानिमसमध्ये याचा उपयोग केला जातो. विचारांमधून व्‍देशाला हद्दपार करता आले तरी ब-याच विकार निर्माण
करणा-या सवयी बदलता येतात. काही सवयी जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर बदलता येतात. तुमच्या
इच्छाशक्तीला चार्ज करण्याचं बटन तुमच्याकडेच असतं. चांगल्या सवयी तुमची वेगळी ओळख निर्माण करतात. आपल्या मनाला अशाच चांगल्या सवयीकडे वळविता यायला हवं. हे फार अवघड नसतं, फक्त थोड्या प्रयत्नांची गरज असते.

अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

Leave a Comment