अभ्यास करण्याची तीव्र इच्छा असूनही आपण वर्षभर चालढकल करतो आणि ऐन परीक्षेच्या वेळीच अभ्यास करतो. अभ्यासाचं ठीक आहे, पण विजेचे बिल, मोबाईलचे बिल, टेलिफोनचे बिल हे सुद्धा शेवटच्या तारखेलाच भरतो. जे सहज शक्य आहे त्याच्याही बाबतीत आपण चालढकल करतो आणि शेवटच्या तारखेपर्यंत त्या अभ्यासाचं, त्या बिलाचं ओझं वाहत राहतो. गरज नसताना समाधानाची झोप नाकारतो. उगाच पुढे ढकललेली कामं केवळ झोपच खराब करीत नाहीत, तर तणावातही वाढ करतात. हे कळतं आपल्याला. तरीही आपण आपली सवय बदलत नाही. आपण असं का वागतो? खरंच चालढकलची असलेली सवय आपण टाळू शकत नाही का?
एका संध्याकाळी संता रस्त्यानं चालला होता. अंधारलं होतं. अचानक संताच्या लक्षात आलं की, रस्ता सुनसान आहे. मागे-पुढे कुणीच दिसत नाही. त्याचवेळी लांबवरून काही लोकं त्याच्याच दिशेनं येताना त्याला दिसले. त्याने चोर-डाकूंबद्दल ऐकलं होतं. हे चोर-डाकू तर नसावेत, असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि तो भीतीने थरथरू लागला. स्वत:चा जीव वाचवावा म्हणून तो लपण्याची जागा शोधू लागला. बाजूलाच स्मशानभूमी होती. तिथे नवीनच खड्डा खोदला होता. संताला तीच जागा लपायला योग्य वाटली. मुर्दा समजून डाकू निघून जातील, असं त्याला वाटलं. म्हणून तो खड्ड्यात निपचित पडून राहिला. थोड्या वेळात ते लोकं तिथपर्यंत पोहोचले. ती लग्नाची वरात होती. त्यातील एकाचे लक्ष उघड्या असलेल्या मुदर्याकडे गेले. त्याने ते इतरांना सांगितले. वरातीतल्या लोकांना वाटलं की, कोणीतरी इथं मरून पडलं, त्यावर आपण माती टाकायला पाहिजे. संता हे सर्व ऐकत होता. जिवंतपणीच हे लोकं आपलं थडगं बनवतील म्हणून तो घाबरला. तोपर्यंत वरातीतील सर्व लोकं त्या खड्ड्याभोवती जमले होते आणि आता माती टाकायला सुरुवात करणार तोच संता उठून बसला आणि जोरात ओरडला, ‘मी जिवंत आहे.’ लोकं घाबरलीत, पण त्यातील एका ज्येष्ठानं हिंमत करून विचारलं, ‘तू इथं कसा?’ संतानं खरी हकीकत सांगितली. ‘तुमच्या भीतीमुळं मी इथं लपलोय आणि मला माती देण्यासाठी तुम्ही इथं आलात.’ थोडक्यात काय तर, संताच्या भीतीचं कारण लोकं होती आणि लोकांचं त्या स्मशानात असण्याला कारण संता होता.
जीवन हे असंच चाललंय. तुमच्या भीतीचं कारण तुम्हीच असता. आपणच आपल्या वागण्यानं लोकांना गोळा करतो आणि नंतर त्यांच्या वागण्यानं आपण त्रस्त होतो. शांततेने विचार केल्यास या सर्व गोंधळाला आपण स्वत:च जबाबदार असतो. ब-याच गोष्टी आपल्याला लोकांना दाखविण्यासाठी हव्या असतात, गरज म्हणून नव्हे. मग तो महागडा मोबाईल असो, महागडी गाडी असो वा महागडी घड्याळ असो. कर्ज काढून असल्या गोष्टी पूर्ण करायच्या आणि नंतर कर्जाच्या तणावात स्वत:ला गाडून टाकायचं, ते फेडण्यासाठी राब राब राबायचं. दुस-याला गरज असूनही रुपयाची मदत न करणारा तोच माणूस विनाकारणच हॉटेलचे हजारोंचे बिल चुकते करतो. केवळ हौसेखातर सुटीच्या दिवशी लाँग ड्राईव्ह वा जंगल सफारीला जातो. जवळच असलेल्या अत्यंत गरीब मुलाला शिक्षणासाठी लागणारी पुस्तकेसुद्धा त्याला द्यावीशी वाटत नाही. त्याने जो त्याच्या समाधानाचा मार्ग निवडला तो खरच त्याला झोपू देत असेल का? एखाद वेळी गरजूंना आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करून बघा. पहा, समाधानाची झोप लागते की नाही!
असंच आपल्या दैनंदिन कामांबद्दलही आपण असंच वागतो. शाळा-कॉलेजला जावं लागतं म्हणून जातो. मात्र, अभ्यास अगदी परीक्षेच्या वेळीच करतो. ऐन परीक्षेच्या वेळी कळतं की, आधीपासूनच थोडा-थोडा अभ्यास केला असता, तर किती चांगले गुण पदरी पाडता आले असते. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत तर असंच घडतं. वर्षभर रिकामा राहणारा विद्यार्थी अभ्यासासाठी ग्रंथालयातील पुस्तकांवर अवलंबून असतो. दरम्यानच्या काळात ब-याच अनावश्यक बाबींवर तो पैसे उधळतो, पण अभ्यासासाठी लागणा-या अगदी तुटपुंज्या रकमेसाठी मात्र चालढकल करतो. दरम्यानच्या कालावधीत तो अभ्यासिका वा क्लासेससाठी हजारो रुपये उधळतो, पण पुस्तकांसाठी मात्र त्याला काही खर्च करावा वाटत नाही. ऐन परीक्षेच्या वेळेवर त्याला सद्बुद्धी सुचते आणि मग त्याची धावपळ सुरू होते, पण उशीर झालेला असतो. अशी दोन-तीन वर्षे सहज गमावणारी अनेक मुले आपल्या आजूबाजूला असतात. असं ते मुद्दामून करीत नाहीत तर हा त्यांच्या सवयीचा भाग असतो.
कोणतंही काम अगदी वेळेवर धावपळ करून करायचं, मग ते इलेक्ट्रिक बिल असो वा घरचं एखादं काम. अशा चालढकलपणामुळं त्या कामाचं भूत कायमच आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं. त्यामुळं दुस-या कामाला न्याय देता येत नाही, आणि हे काम वेळ गेल्याशिवाय करायचं नाही. हीच वृत्ती तणाव तर निर्माण करतेच शिवाय, आपली प्रतिमासुद्धा कुटुंबात आणि मित्र परिवारात खराब करते. खरं तर, तीव्र इच्छाशक्तीने आपल्या मनाला लगाम घालून एका झटक्यात आपल्याला यातून सुटका मिळविता येते. पण सवयच ती, तिला बदलणार कोण? तुमच्या ताण-तणावाला तुमचीच बेजबाबदार वृत्ती जबाबदार असते. काम पूर्णत्वास नेण्याचा विचार करण्याऐवजी ते कसं पुढं ढकलता येईल, याची कारणं शोधण्यात विनाकारणच आपण आपली ऊर्जा नष्ट करीत असतो. अशाप्रकारे अनावश्यक ऊर्जा गमावणारा खरं तर स्वत:च स्वत:चा अपराधी असतो. म्हणून ज्या गोष्टीला आपण जबाबदार असतो त्या गोष्टी टाळू नका, त्वरित कामाला लागा. जीवन सुंदर आहे, ते सुंदरतेनेच जगा.
(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)
खूप छान 👏👏