योग्य पद्धतीने जगणेही महत्त्वाचे

फक्त जगणं काफी नसतं, योग्य पद्धतीनं जगणंसुद्धा आवश्यक असतं. तुम्ही किती वर्षे जगलात याला किंमत नाही, तुम्ही कसं जगलात याला महत्त्व असतं. आपल्या मनातल्या इच्छा आपल्या कार्यावर प्रभाव टाकतात. इच्छेला योग्य पद्धतीनं वळवणं तुमच्या हाती असतं. स्वत:च्या सुखासाठी दुस-याला दु:खात ढकलणारा कधीच आनंदी राहू शकत नाही. तुमच्यामुळे कुणाला आनंद मिळत असेल, तरच व्यक्तिमत्त्व चुंबकासारखं बनू शकतं. धन, संपत्तीनं आनंद विकत घेता येऊ शकत नाही. मात्र, दुस-यांच्या बाबतीत केलेल्या कल्याणकारी विचारानं आनंद मिळू शकतो.

सर्वजण तुम्हाला हरलेले समजतात तेव्हा आवश्यक नसतं की तुम्ही हरालच. दुस-याला हरवण्यासाठी जीवनखेळ खेळत असाल, तर निश्चित दु:खाच्या गर्तेत ढकललं जाल. दुस-याला हसवण्यासाठी खेळत असाल, तर आनंद प्राप्त कराल. जोपर्यंत तुम्ही मनानं हरत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. जिंकण्यासाठी मेहनतीची गरज असते. ती मेहनत कशी असावी? श्रीमंत तथा यशस्वी माणसं मेहनत करतात, परंतु ते आपण किती मेहनत केली, यावर लक्ष देत नाहीत. आपल्याच कामानं आपल्याला आनंद किंवा दु:ख मिळत असतं. लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरात आहात. दिवसभराच्या दिनचर्येवर नजर टाका आणि डोळे बंद करून आठवून पहा कोणत्या कामानं तुम्हाला आनंद मिळाला? दिवसभर टीव्हीसमोर बसून तुमच्यात उत्साह निर्माण झाला का? सोशल मिडियावरचे व्हिडिओ पाहून आनंद मिळाला की, मित्रांसोबत दिवसभर चॅटिंग करण्यात आनंद मिळाला? एखाद्या पोस्टवर नकारात्मक कॉमेंट्स टाकून आनंद मिळाला असेल, तर तेही अंतर्मनात डोकावून बघा. या सर्व गोष्टींनी तणाव कमी होत नाही, तो अधिक वाढतो. अशाप्रकारचा तणाव अनेक प्रकारचे विकार जन्माला घालतो. कारण, टीव्ही, सोशल मिडिया, नकारात्मक प्रतिक्रिया यातून तुम्ही तुमच्या बुद्धीला कोणत्या प्रकारचं खाद्य देत आहात? जसं फिडिंग कराल तसेच विचार बनतील. असले नकारात्मक विचार कशाप्रकारचं व्यक्तिमत्त्व जन्माला घालतील? श्रीमंती म्हणजेच यश, असं समजणा-यांना हे समजावून सांगण आणि त्यांनीही असं समजावून घेणं अवघडच. परंतु प्रत्येक मनुष्यात उदार अंत:करणाचा एक कप्पा असतो. या कारणानं जर त्यानं तो कप्पा उघडला, तर सत्वगुणात वाढ व्हायला वेळ लागत नाही.

आपण त्या गोष्टींच्या मागं लागतो जे मिळाल्यावर मन शांत तर होतच नाही उलट, अधिक हव्यासापायी कायमच धावत राहतं. एखाद्याला आभासी जगातले लाईकसुद्धा आनंद मिळाल्याचं समाधान देतात. हेच लाईक कमी पडलेत की, यापूर्वी जेवढा आनंद मिळाला होता त्यापेक्षा अधिक दु:ख देतात. तुमचा आनंदी फोटो पाहून जेवढा आनंद मिळत नाही तेवढा तुमच्या ख-या आनंदानं आनंद मिळतो. खरा आनंद अशा तरंगलहरी निर्माण करतो ज्या शेकडो किलोमीटर दूर आप्तालाही सुखद आनंद प्रदान करतात. आभासी जगात जेवढं गुरफटाल तेवढं अधिक दु:खाला आमंत्रित कराल, वास्तविकतेचा जेवढा लवकर स्वीकार कराल, तेवढ्या लवकर स्वत:ला सुखी पहाल. खुषी लोकांना दाखवण्यासाठी नसते. जेव्हा तुम्ही स्वत: ती अनुभवता, आपोआपच वातावरणसुद्धा तुमच्याप्रमाणे डोलायला लागतं. म्हणूनच जशी दृष्टी तशी सृष्टी, असं म्हटलंय. प्रत्येकामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचा वास असतो. सत्वगुण हे सुख, आनंद प्रदान करतात. रजोगुण कर्मावर आधारित असले, तरी दु:खाकडे खेचतात. अज्ञान, अंध:कारातून तमोगुणाची निर्मिती होते. कोणता गुण किती वाढवायचा, हे स्वातंत्र्य तुमचं.

यशासाठी काही चांगल्या सवयी आपल्याला असाव्यात.

1) सकाळी उठल्याबरोबर त्या गोष्टी टाळा ज्या बिलकूलच कामाच्या नसतात. जसं सोशल मिडियावरच्या वायफळ चर्चा. सकाळी काय नाही करायचं, एवढं जमलं तरी त्या दिवशीचा वेळ प्रॉडक्टिव्ह कामात घालवण्याचे विचार डोक्यात येतील.

2) ध्येय ठरवलं असेल, तर ते गाठण्यासाठी छोटे-छोटे टप्पे तयार करून रोजच ते टप्पे कसे गाठायचे, किती गाठल्या गेलेत, याची उजळणी करा.

3) वेळेचं महत्त्व लक्षात घ्या. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होतं अशा गोष्टी टाळा. जवळच्या व्यक्तीच्या नाराजीकडे दुर्लक्ष करा. कारण, खरा नातेवाईक, प्रेमी कधीच दूर जात नाही. तुमच्या यशात, आनंदात स्वत:च्या यशाचा अनुभव तो घेत असतो.

4) वाचनाची सवय महत्त्वाची. जगातल्या सर्वच यशस्वी व्यक्तींना वाचनाची सवय होती. तुम्हाला मात्र व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतूनच वेळ मिळत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, स्वत:च्या वर्तनात बदल करा.

5) संगत महत्त्वाची. ज्या क्षेत्रात करिअर करायचं त्याच क्षेत्रातल्या यशस्वी लोकांची सोबत ठेवा.

6) जास्त ऐका आणि कमी बोला.

7) उशिरा पोहोचण्याची सवय सोडा.

8) स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी योग्य Affirmation चा वापर करा.

अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

Leave a Comment