विचाराचे धारिष्ट्य (Arrogance of thought)

अंधार घालविण्याचा हा प्रकार पाहून राजश्रीला हसू आले. तिने एक मेणबत्ती घेतली आणि जिथे लोकं अंधार टोपलीत भरत होते त्या खोलीत जाऊन पेटवली. क्षणात संपूर्ण खोलीतील अंधार नाहीसा झाला.

अंधाराचे राज्‍य संपवून आपल्या राज्‍यात प्रकाशाचे राज्‍य आणण्या-या उद्देशाने राजा सूर्यवर्धनने राज्‍यातील जनतेला अंधार संपविण्याचा आदेश दिला. लगेच जनता कामाला लागली. रात्री अंधार पडल्याबरोबर प्रत्येकाने आपापल्या घरातील अंधार टोपल्यात भरून लांब असलेल्या खोल दरीत फेकून देण्यास सुरुवात केली. अंधाराचे टोपले भरायचे, दरीत नेऊन टाकायचे… दिवस, हप्ते आणि काही महिने संपले, परंतु अंधार काही कमी होत नव्हता. शेवटी, सूर्यवर्धन ने राज्‍यात दवंडी पिटवली आणि जाहीर केले की, जो अंधार संपवेल त्याला मोठे बक्षीस देण्यात येईल. मोठ्या बक्षिसाच्‍या लालसेने पुन्हा काही लोकांनी अंधार आता मोठ्या टोपलीत भरून फेकण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच कालावधीत राजश्री नावाची चुणचुणीत पंधरा-सोळा वर्षाची मुलगी त्या नगरात पाहुणी म्हणून आली होती. अंधार घालविण्याचा हा प्रकार पाहून राजश्रीला हसू आले. तिने एक मेणबत्ती घेतली आणि जिथे लोकं अंधार टोपलीत भरत होते त्या खोलीत जाऊन पेटवली. क्षणात संपूर्ण खोलीतील अंधार नाहीसा झाला.

अंधार घालविण्यासाठी ज्‍या पध्‍दतीचा अवलंब नगरातील एका व्‍यक्‍तीने केला त्याच गोष्टीचे अनुकरण इतरांनी केले. याउलट त्या मुलीने थोडा वेगळा विचार केला आणि फारसा प्रयत्न न करता अंधाराला घालवले. असाच प्रत्येकाला आपल्या जीवनात अंधारच दिसतो आणि तो घालविण्यासाठी आहे त्याच परिस्थितीतून मार्ग काढण्याचा म्हणजे चुकीच्‍या मार्गाचा अवलंब केला जातो. खूप प्रयत्न करूनही अंधार कायमच आहे, हे लक्षात येताच आपण दु:खी-कष्टी होतो. आमचं जीवनच दु:खातील आहे, कष्ट उपसणे हेच आमच्‍या नशिबी आहे, असे शब्दप्रयोग करतांना आपल्याला किंचितही वाईट वाटत नाही. अशा नकारात्मक विचारांमुळे जीवनातील अंधार कमी होणार नसून तो अधिक वाढणारच असतो. अंधार घालविण्यासाठी अशा नकारात्मक विचारांची नव्हे, तर सकारात्मक वेगळया विचारांची म्हणजेच प्रकाशाची गरज असते, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण परिघाबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच करीत नाही. नवीन रस्त्यानेही आपण गंतव्य स्थानावर पोहोचू शकतो, याचा विचारही मनात न येऊ देणा-यांची संख्या खूप मोठी असते. आपण ज्‍या परिस्थितीत आहोत त्याच परिस्थितीनुसार आपण बाहेर निघण्याचा विचार करीत असतो. आपल्या परंपरागत विचारांच्‍या पलीकडेही नवीन मार्ग आहेत, यावर विचार करण्याची हिंमत आपण करीत नाही. परंपरांची मानसिक गुलामगिरी सोडून जोपर्यंत तरुण नवीन मार्ग शोधण्याच्‍या उद्देशाने बाजारात उतरत नाही तोपर्यंत त्यांची उन्नती होण्याची शक्यता नाहीच.

कोलकात्याला अजूनही हाताने रिक्षा ओढण्याची पध्‍दत आहे. ती पिढ्यान-पिढ्या सुरू आहे. आजच्‍या प्रगतीशील कालखंडात ते दृश्य मनाचा थरकाप उडविते. भारतातील दारिद्र्याची भयानकता किती,  हे त्यावरून लक्षात येते. एका राजकीय कार्यक्रमानिमित्त आम्ही अलीकडेच कोलकात्याला जाऊन आलो. बाजारात फिरत असताना मी एका रिक्षेवाल्याला विचारले, ”दिन में कितना मिलता है.” तो म्हणाला, ”सौ-देड सौ मिलता है साहब.” ”आप दुसरा काम क्यों नही करते, आपको इससे ज्‍यादा मिलेगा.” ”दुसरा काम कौन देगा साहब, और हमको भी वह काम आना चाहिए ना..” थोडक्यात, तो रिक्षेवाला त्या रिक्षाशिवाय दुस-या कामाचा विचारच करू शकत नव्हता. म्हणजे, त्याला कोणतेच काम जमत नव्हते,  असे नव्हे. जोपर्यंत तो रिक्षाशिवाय दुसरा विचारच करणार नाही तोपर्यंत त्याला दुसरे काम तरी कसे मिळेल? मेहनत तो आताही करतो, परंतु त्यात वाढ होण्याची शक्यता शून्य. त्याच्‍या आजच्‍या परिस्थितीला  तो स्वत:च जबाबदार नाही का? तुम्ही नवीन विचार करण्याचे धारिष्ट्य करणार नाही आणि आपल्या दु:खासाठी नशिबाला दोष देत राहणार यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते.

नवीन विचारासाठी एखाद्याला प्रवृत्त करणं खरंच किती अवघड असतं याचे मी अनेकदा अनुभव घेतले आहेत. काहीही करून व्‍यक्‍ती सामाजिक दबावाचे विचार सोडायला तयार नसतात. लोकं काय म्हणतील, माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला तोंड काढायला जागा मिळणार नाही, हे शब्द तर अंगवळणीच पडलेत. अशिक्षितांपेक्षाही सुशिक्षितांवर केलेले प्रयोग भयंकर तापदायक आणि मनाला कष्ट देणारे होते. जी बाब वाईट नाही, समाजविघातक तर नाहीच उलट समाजहितकारकच आहे, जी वैयत्तिक विकासासाठी गरजेचीच नव्हे, तर चांगलं जगण्यासाठी आवश्यक आहे. याची पुरेपूर कल्पना असूनही नवीन मार्गावर चालण्याचे तर सोडाच थोडा वेगळा विचार करण्याचे धारिष्ट्यसुद्घा आपण करीत नाही. ज्‍यावेळी परिस्थतीच सर्व मार्ग बंद करते तेंव्हा कोठे अगदी नाईलाजाने आपण नवीन मार्ग शोधायला लागतो, परंतु मित्रांनो तोपर्यंत आपण बराच वेळ घालविला असतो. निसर्गात चुकीबद्दल कोणालाही क्षमा नसते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

काही भारतीय परंपरा अतिशय बोधात्मक आहेत. हिंदू धर्मियांतील सर्व सण पौर्णिमेच्‍या दिवशी साजरे केले जातात, परंतु दिवाळी हा एकमेव सण असा आहे जो अमावस्येच्‍या दिवशी साजरा केला जातो. अमावस्येचा काळोख लख्ख प्रकाशाने घालविण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात, नवीन विचारांची सुरुवात आपल्या घरापासूनच व्हावी, हा यामागील उद्देश होता. कालांतराने सर्व उद्देश धार्मिक देवदेवतांशी जोडण्यात आले…. यातून अनेक कथा जन्माला आल्यात आणि कर्म मागे पडून अंधश्रध्‍दा बाबींना खतपाणी घातले गेले. ही पूजा… ती पूजा हे सर्व करावेच लागते नाही, तर देव कोपतील आणि काय भयंकर होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे, या सर्व परंपरा आमचा तरुण वर्ग मोठ्या भक्‍तीभावाने कोणत्याही बाबीची शहानिशा न करता पूर्णपणे आंधळा बनून पाळत असतो. आत्मिक बळ मिळण्यासाठी काही गोष्टी गरजेच्‍या असतीलही, परंतु अशा गोष्टींची गरजच काय ज्‍या आपण यंत्रवत पाळतो. गरजू माणसाची केलेल्या मदतीने जे आत्मिक समाधान मिळते तेवढे समाधान सहा-सात दिवस उपवास करून मिळेल का? सातत्याने देव-देव करून मिळेल का? स्वत:ला इतके सक्षम बनवा की, आपण तर प्रकाशात राहूच शिवाय इतरांच्‍या जीवनातील अंधार नाहीसा करण्याचाही प्रयत्न करू. आपल्याला माहिती असायला हवे…

Life has no second Edition to correct it later.
It has only Edition which should be the best.
So let’s be careful while writing every page.  

अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

1 thought on “विचाराचे धारिष्ट्य (Arrogance of thought)”

Leave a Comment