संकल्पशक्ती

संत कबीर हसून म्हणाले, ‘‘वेदना दिसू शकत नाहीत तरी पण त्या असतात. प्रेम दिसून येत नाही तरीही  ते असते. असाच ईश्वरही आहे.’’ जीवनात जे दिसते तेच तुम्हाला प्रभावित करते, असे नाही, जे दिसत नाही त्याचाही आपल्यावर प्रभाव असतो.

एकदा संत कबीरांना कोणीतरी विचारले,‘‘ईश्वर आहे तर तो दिसत कसा नाही?’’ संत कबीर म्हणाले,‘‘ईश्वर म्हणजे वस्तू नाही, ती एक अनुभूती आहे. तो दिसेल, असा कोणताही उपाय नाही, परंतु त्याचा अनुभव अवश्य येऊ शकतो.’’ मात्र, शंका विचारणा-याचे समाधान झाल्यासारखे न वाटल्यामुळे संत कबीरांनी जवळच असलेल्या शेकोटीतील जळता निखारा हाताने उचलला. हे पाहून ती व्यक्ती म्हणाली, ‘‘हे काय केलंत तुम्ही ? अशानं तुम्हाला फार वेदना होतील.’’ संत कबीर हसून म्हणाले, ‘‘वेदना दिसू शकत नाहीत तरी पण त्या असतात. प्रेम दिसून येत नाही तरीही ते असते. असाच ईश्वरही आहे.’’ जीवनात जे दिसते तेच तुम्हाला प्रभावित करते असे नाही, जे दिसत नाही त्याचाही आपल्यावर प्रभाव असतो. गरजू व्यक्तीला मदत केल्यावर जो आत्मानुभव स्वत:ला होतो त्याला शब्दात मांडता येते का ? स्वार्थी वृत्ती ठेवून 

दुस-याकडून काही काढून घेतल्याने ख-या सुखाची चव चाखता येत नाही. म्हणून परम आनंद मिळविण्यासाठी सर्व उपभोग घेतल्यानंतर मनुष्य निश्चित भक्तीरसात तल्लीन होऊ इच्छितो. 

भारतामध्ये अनेक प्रकारच्या परंपरा आहेत ज्या समजून न घेताही आपण पाळत असतो. मनुष्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्रथांनी कालांतराने विकृत रूप धारण केले. मग आसारामाने सांगितलेले अपरंपरागत अनुष्ठान करणा-यांचीही गर्दी वाढली. त्यातून विकृतीने कळस गाठला. मुळात हिंदू धर्मातील सर्वच प्रथा कालबाह्य नव्हत्या आणि नाहीत. हिंदू परिवारात एखाद्या कार्याची सुरुवात व्रत किंवा संकल्प घेऊन होते. जो व्यक्ती अनुष्ठान करतो तो अशी घोषणा करतो की, मी, संजय नाथे या वर्षातील या महिन्यात या दिवशी पूजा करण्याचा संकल्प करतो. देव जर सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि सर्वच जाणणारा आहे, तर मग अशा संकल्पाची गरज काय? असा संकल्प खरंच देवाला प्रसन्न करू शकेल का? खरे म्हणजे, हा संकल्प देवासाठी नसतोच, तर तो अनुष्ठानकर्त्‍या व्यक्तीचा व्रताच्या संकल्पाप्रती, दृढतेविषयी असतो. उद्देशाप्रती एकनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि एकाग्रता ठेवण्यासाठी हा संकल्प असतो. तुम्ही अशा परंपरांना कोणत्या अर्थाने घेता त्यावर तुमचा विकास अवलंबून असतो. कोणत्याही संतांनी मंदिरात जाऊन पूजा करण्याविषयी सांगितले नाही. संत गाडगेबाबा पंढरपूरला जाऊनही मंदिरात जात नव्हते व लोकांनाही समाजसेवेचा उपदेश देताना खरा देव माणसातच असतो, असे सांगत. आपण मात्र माणूस सोडून सर्वच तीर्थक्षेत्र जवळ करतो, चारही धाम करणा-याला तर स्वर्गच मिळतो. 

आपला संकल्पच स्वार्थी असतो, त्यात परमार्थ नसतोच. त्यात असतो तो केवळ ‘अहं’, ‘मी’पणा. ज्या मनुष्याने सदा नि:स्वार्थ परोपकार करावा, असे अपेक्षित असते तो स्वार्थ ठेवून परोपकार करतो. सोवळे वगैरे घालून हा कोणता संकल्प करतो ज्याचा त्यालाही पत्ता नसतो…. म्हणून अशांचा विकास तर होतच नाही शिवाय, यांच्या देवभक्तीमुळे घरातील इतर सदस्यांना मात्र मोठा कंटाळा येतो. एवढा देव देव करणारा मनुष्य ज्याप्रमाणे आचरण करतो, इतरांच्या भावनांना काडीचीही किंमत देत नाही, तो केवळ स्वत:ची फसवणूक करीत असतो. आता नवरात्र आहे. या नवरात्रात कोणी पायात चप्पल घालत नाहीत, कोणी भल्या पहाटे दररोज मंदिरात दर्शनाला जातो, कोणी जवळ असलेल्या त्रिवेणी संगमावर न चुकता आंघोळ करतो…. हे सर्व व्रत संकल्पशक्ती वाढवून स्वत:चा विकास साधण्यासाठी की, केवळ कोणीतरी सांगितले म्हणून आंधळेपणाने पाळण्यासाठी…. खूप देव-देव करणारे, दिवसातील बहुतांश वेळ देवाजवळ घालविणारे व्यक्ती मी पाहिलेत. ते नेहमी दुस-यांनी कसे वागावे एवढाच सल्ला देताना आढळतात, त्यांचे स्वत:चे आचरण मात्र त्याउलट इतरांना त्रासदायकच असते. देवाच्या भक्तीत ते एवढे तल्लीन असतात की, मनुष्यालाच ते तुच्छ मानायला लागतात. अशा आंधळ्या परंपरा अधिक किती दिवस जोपासणार ?

इमर्सनच्या व्याख्यानाला एक गरीब अशिक्षित म्हातारी नेहमी हजर राहायची. इमर्सनचे भाषण तिला कितपत समजायचे, असा लोकांचा प्रश्न होता. न राहवून एकाने तिला विचारलेच की, ‘‘तुला खरंच भाषणातले काही समजते का ?’’ त्यावर ती म्हातारी म्हणाली,‘‘ तुम्हाला किती समजते हे मला माहिती नाही, परंतु ईश्वरप्राप्तीसाठी मला दुसरीकडे जाण्याची गरज नाही… मानवातच देव वसतो एवढे मात्र मला समजले.  तुम्हाला काही समजले असते तर अशा तुच्छतेच्या भावनेतून मला पाहिले नसते.’’ 

ऐकणारे सर्वच स्तब्ध झाले. कारण, म्हातारी खरे बोलत होती. मानवसेवेतच ईश्वर आहे, निसर्गातील कणांकणात तो विराजमान आहे, तो नि:स्वार्थ प्रेमात आहे, तो देण्यात आणि फक्त देण्यात आहे…. घेण्यात नाही. 

तरुण मित्रांनो, तेच जीवन जगा जे तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटते. कालबाह्य परंपरा आणि दुस-याचे अनुकरण सोडा.  


(Visit  SanjayNathe.com  for more articles)

Leave a Comment