सिकंदरच्या इच्छा

कितीही तज्ज्ञ आले आणि प्रगती झाली तरी मृत्युपुढे वैद्य हतबल ठरतात. त्यांची ही हतबलता आणि त्यांच्या मर्यादा जनमाणसात ठसाव्यात म्हणून ते डॉक्टरच माझे खांदेकरी व्हायला हवेत. हि-या-माणिकाच्या राशी कितीही मिळवल्या तरी उत्तम आरोग्य नसेल, तर त्या निरुपयोगी आणि त्याज्य ठरतात, हेही मला लोकांना दाखवायचे आहे.

जगाला जिंकण्याची इच्छा असलेला किंबहुना, बहुतांशी त्यात यशस्वी ठरलेल्या जगज्जेत्या सिकंदरला जीवघेण्या आजाराने गाठले. आता या आजारातून आपली सुटका नाही, हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या सरदारांना बोलावून शेवटच्या तीन इच्छा सांगितल्या. त्या अशा-

१. मृत्यूनंतर माझी शवपेटी माझ्या डॉक्टरांनीच दफनभूमीकडे न्यावी.

२. ज्या मार्गाने अंत्ययात्रा जाणार असेल, त्या मार्गावर दुतर्फा मी आजवर मिळविलेली हिरे-माणिक-रत्न-पाचू यांच्या राशी पसराव्यात. 

३. माझे हात शवपेटीच्या बाहेर काढून दोन्ही बाजूंना लोंबकळू द्यावेत.

आपल्या या आश्चर्यकारक इच्छा पूर्ण करण्याचे वचन सरदारांनी दिल्यावर अलेक्झांडर शांत झाला. इतर  सरदार निघून गेल्यावर प्रमुख सरदाराने या अजब इच्छामागची कारणं सांगण्याची विनंती केली. ‘मृत्यूपुढे वैद्यकशास्त्रही पराभूत आहे, हे जनतेला माहिती व्हावे म्हणून माझी शवपेटी डॉक्टरांनी उचलून न्यावी, अशी इच्छा मी प्रकट केली. कितीही तज्ज्ञ आले आणि प्रगती झाली तरी मृत्युपुढे वैद्य हतबल ठरतात. त्यांची ही हतबलता आणि त्यांच्या मर्यादा जनमाणसात ठसाव्यात म्हणून ते डॉक्टरच माझे खांदेकरी व्हायला हवेत. हि-या-माणिकाच्या राशी कितीही मिळवल्या तरी उत्तम आरोग्य नसेल, तर त्या निरुपयोगी आणि त्याज्य ठरतात, हेही मला लोकांना दाखवायचे आहे. महत्त्वाचा आहे तो वेळ.  वेळ पाळणे, वेळ वाया न दवडणे आणि वेळेचा सदुपयोग करणे हीच खरी समृद्धी. लोंबकळणारे माझे हात रिकामे असतील, त्यात आभूषण-अलंकार नसतील, तसेच पराक्रम गाजवणारी तलवारही नसेल. मी रिकाम्या हाताने आलो होतो आणि आज रिकाम्या हातानेच परत जातो आहे. जाताना आजवर मिळवलेले काहीही बरोबर नेता येत नाही, हेच मला जगाला दाखवून द्यायचे आहे.’  यानंतर सिकंदर-द-ग्रेट ने डोळे मिटले ते कायमचेच.

अलीकडेच ही कथा माझ्या वाचण्यात आली तेव्हापासून सारखे विचारचक्र फिरत आहे. शेवटच्या काळात असहाय्य असताना सिकंदर नम्र झाला, तसेच संपत्तीपेक्षा आरोग्य आणि वेळेचे महत्त्वही तो पटवून सांगतो. ते खरेही आहे. आजच्या तरुणाला खडबडून जागे करेल, अशा त्याच्या इच्छा होत्या. आळसापोटी आणि अनावश्यक विचारापोटी इडिएट बॉक्सपुढे बसून आपण जीवनातील बहुमूल्य तासचे तास घालवतो, परंतु दररोजच्या व्यायामाकरिता, मोकळा श्वास घेण्याकरिता सकाळचा अर्धा ताससुद्धा ते देऊ शकत नाहीत. नियतीने दिलेल्या सुंदर शरीराची निगा राखण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण असमर्थ ठरत आहोत. ज्या गोष्टी आपल्याला सहजासहजी मिळतात त्या गोष्टीची किंमत नसते. जोपर्यंत शरीर निरोगी असते तोपर्यंत त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नसते. जेव्हा कटकटी सुरू होतात तेव्हा त्याचे महत्त्व कळते, तसेच वेळ निघून गेल्यावर वेळेच महत्त्व समजते.

तुम्ही किती ‘मोठे’ आहात, हे तुम्ही किती नम्रतेने वागता, यावरून ठरत असते. नम्रता म्हणजे लाचारी वा अगतिकता नव्हे. नम्रता आपल्या विचारांचं कृतीतून अभिव्यक्त होणारं प्रतिरूपच असतं. आयुष्यभर विद्यार्थी होऊन जगता आलं पाहिजे. नम्रता आपल्याला बरेचदा आपल्या पात्रतेपेक्षाही प्रतिष्ठा, प्रेम आणि पद देत असते. म्हणून तुकोबा म्हणतात, ‘‘महापुरे झाडे वाहती, तेथे लव्हाळे वाचती.’’ त्याविषयी आपल्याला असेही म्हणता येईल की, ‘‘झुकता वही है; जिस मे जान होती है। अकडे रहना तो मुडदे की पहचान होती है।’’ 

जगज्जेत्या सिकंदरचा प्रवास ध्येयनिष्ठ नव्हता, असे कोण म्हणेल! त्याने जी कामगिरी केली ती केवळ इतिहास घडविणारीच नव्हती, तर इतिहासाला कलाटणी देणारी सुद्धा होती. त्याने इतिहास घडविला. जगाचा नकाशा बदलण्याचे सामर्थ्‍य त्याच्या मनगटात होते. अतिशय धाडसी, शूरवीर, कल्पक, असा तो बादशहा होता. ध्येय ठरविणे आणि ते गाठण्यासाठी जिद्द, धडाडी आणि समर्पणाने कामाला लागणे, हे गुण त्याच्या अंगी होते. त्याशिवाय एवढे मोठे यश मिळविणे शक्य नव्हतेच. म्हणूनच तो इतिहास घडवू शकला; परंतु तो तरुण वयातच मरण पावला. त्यामुळे जिंकलेल्या प्रदेशाचा, संपत्तीचा उपभोग घेण्याचे नशीब त्याला लाभले नाही. तरीही शेवटच्या काळात तो अतिशय नम्रतेने समाज जीवनाच्या समृद्धतेसाठी अखेरच्या इच्छा प्रकट करतो. त्या कुण्या सामान्य गृहस्थाच्या इच्छा नव्हत्या. त्या सिकंदर महानच्या इच्छा होत्या. अर्थातच, त्यावर चिंतन व्हायलाच हवे.


( Visit SanjayNathe.com for more articles )

1 thought on “सिकंदरच्या इच्छा”

Leave a Comment