सुसंस्कारी संगत

बिकट प्रश्न सोडविण्यास तुम्ही सक्षम आहात म्हणून ब्रम्हांडाने ते प्रश्न तुमच्यावर सोडलेत.  ते सुटेपर्यंत वाकण्याचा प्रसंग आला तरी चालेल, परंतु स्वत:ला तुटू देऊ नका, हिम्मत सोडू नका. जोपर्यंत तुम्ही स्वत:हून हारत नाही तोपर्यंत दुसरा कोणी तुम्हाला हरवू शकत नाही.

एक सज्जन माझ्याकडे कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन आले आणि ऑगस्टमध्ये तुम्ही द्याल त्या तारखेला कार्यक्रम घेऊ. तुम्ही तारीख आजच निश्चित करून सांगा. ते पुढे म्हणाले, `माझी ड्युटी संपल्यानंतर मी ज्यांच्याकडे जातो त्यांना आपल्या पेपरविषयी सांगतो. अलीकडे आपला पेपर खूपच वाढला. अनेकांच्या घरी दिसतो. पेपर दिसला की, मी ज्याने पेपर लावला त्या मुलाविषयी आस्थेने चौकशी करतो. पेपर वाचणा-या मुलांमध्ये तीन-चार महिन्यातच परिवर्तन पहायला मिळाल्याचे त्यांच्या घरचेच सांगतात. हे ऐकून खूपच चांगले वाटते. आता तर एखाद्याच्या घरी पेपर दिसला तरी तो मुलगा कसा असावा, याचा अंदाज येतो.’ मनापासून पेपर वाचणा-या मुलांवर खरच खूप चांगले संस्कार होत आहेत, तशा प्रतिक्रिया आहेत. हे सर्व ऐकून साहजिकच मला बरे वाटत होते. खरे म्हणजे, मी नागपुरात आलो तेव्हापासून म्हणजे गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या कार्यक्रमाला जात आहे. त्यामुळे ते आले की, हक्कानेच बोलतात. त्यांचा पिंड सामाजिक असल्यामुळे ते आले की, मलाही चांगले वाटते. आमंत्रणाच्या दिवशी जेवढे ते पेपरविषयी माझ्याजवळ बोलले नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कार्यक्रमाच्या दिवशी सर्वांसमक्ष डायसवरून बोलले. खरं म्हणजे, तरुण मित्रांच्या प्रतिक्रियेने प्रभावित होणं आणि प्रत्यक्ष ऐकून भारावून जाणं या दोन्ही बाबी पेपरची उपयुक्तता सांगणा-या आहेत.

आज करिअरचा मोठाच प्रश्न आहे, हे मान्य केले तरी सर्वप्रथम आपण करिअर म्हणजे काय, हे समजावून घेतले पाहिजे. मागील आठवड्यात आम्ही घेतलेल्या करिअर मेळाव्यात मी या प्रश्नाला हात घातला होता आणि याविषयीचा थोडक्यात वृत्तांत `रोजगार नोकरी संदर्भ’ मध्येही प्रसिद्ध केला होता. मी तरुण मित्रांना एकच सांगेल की, त्यांनी संवादाची प्रक्रिया थांबवू नये. कोण काय आणि किती बोलतो, याकडे लक्ष देऊ नये. त्यातील किती भाग आपल्याला स्वीकारायचा एवढेच आपण लक्षात ठेवायचे. प्रत्येकाकडे असलेले वेगवेगळे अनुभव आपल्याला बरेच काही देऊन जात असतात.

इतरांना तुच्छ समजणारी जमात अधिक काळ टिकत नाही, हे आपण समजले पाहिजे. कारण, लहान असो की मोठा असो प्रत्येकाला स्वत:ची केलेली इज्जत आवडते. अर्थातच, दुसरा कोणी त्याची टवाळकी करीत असेल, तर तोही संधी मिळाल्यावर तुमची टवाळकी केल्याशिवाय राहणार नाही. कर्तृत्त्वाने लहान-मोठा असा भेद करता येईल म्हणून मुद्दाम दुस-याला कमी लेखणे योग्य ठरत नाही. आपण अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. आपला स्वत:चा प्रश्न काय आहे आणि त्याचे उत्तर कोठून मिळेल याच्याच शोधात आपण असले पाहिजे.

अलीकडे तरुणांच्या करिअरविषयी अडचणी वाढल्यात, असा भास होतो. अर्थात, यामध्ये लग्न झालेल्या तरुण-तरुणींची संख्याही मोठी आहे. त्यांच्या अडचणी ऐकून मलाच आश्चर्य वाटते. एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्याच स्वत:च्या अडचणी असतात. त्यांच्या घरचे काही सामाजिक परंतु किचकट असे प्रश्न असतात. ते प्रश्न सोडविण्यास तुम्ही सक्षम आहात म्हणून ब्रम्हांडाने ते प्रश्न तुमच्यावर सोडलेत. ते सुटेपर्यंत वाकण्याचा प्रसंग आला तरी चालेल, परंतु स्वत:ला तुटू देऊ नका, हिम्मत सोडू नका. जोपर्यंत तुम्ही स्वत:हून हारत नाही तोपर्यंत दुसरा कोणी तुम्हाला हरवू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात, परंतु त्या परंपरेला धरून नसतात त्याविषयी लोकांची चिंता करण्याची फारशी गरज नसते. तुमचे जीवन तुम्हाला जगायचे आहे, त्या वाटचालीतील सुख-दु:खे तुम्हाला भोगायची आहेत. त्यात तुमचा खरा सोबतीच तुमच्या पाठीशी असतो तो म्हणजे पहिले तुम्हीच असता आणि दुसरा तो असतो जो तुम्हाला नेहमी सुखी-समाधानी पाहत असतो, पाहू ईच्छित असतो. तो खरा मित्र, खरा पती असतो. आपला स्वत:चाही जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. खरे म्हणजे, प्रत्येकाचेच प्रेमपूर्ण सुखी-समाधानी जीवनाचे स्वप्न असते.

या जगात प्रेमाने जगलात तर प्रेमच प्रेम आहे. द्वेषाने जगलात तर द्वेषच आहे. प्रेमाने प्रेम वाढते, तर द्वेषाने द्वेष. आपल्याला ठरवायचे अमृत हवे की विष. अमृत हवे आहे ना, मग अमृतच वाटा. प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आवश्यक ठिकाणी गरजेएवढीच चुकीसाठी शिक्षाही द्या, परंतु त्यात द्वेष असू देऊ नका. पहा प्रेमाने काहीही जिंकता येते.

जीवनात काही सामाजिक प्रोटोकॉल पाळायचे असतात. जसे वरिष्ठांचा सन्मान करणे, विनाकारण आपल्यापासून दुस-याला त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, अत्यंत जवळच्या व्यक्तीजवळ मग तो पती असो वा पत्नी, मित्र वा अन्य कोणी त्यांच्याजवळ मनातील भावनांना वाट मोकळी करून द्यावी. आवश्यक ठिकाणी ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा, गुरुजनांचा आदर करावा, घरातील वरिष्ठ रागावला असेल, तर त्यांना लगेच उत्तर न देता त्यांचा राग शांत झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधायचा. 


( Visit SanjayNathe.com for more articles )

1 thought on “सुसंस्कारी संगत”

Leave a Comment