सूर्यतेज (Sunlight)

विद्वत्ता कोणाहीजवळची असो ती क्षणात मिळविता येणारी बाब नाही. तुम्हाला एकदाच विजेसारखे चमकायचे की, सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे तुम्हालाच ठरवायचे आहे.

एकदा एका पंडितानं राजा राणासंघाच्या दरबारातील सर्व पंडितांना वादविवादाचं आव्हान दिलं. ते आव्हान पाळण्यासाठी तो पंडित राजा राणासंघाच्या राज्याच्या सीमेवर पोहोचला. तिथं त्याला सन्मानानं पालखीत बसविण्यात आलं. भोई लोक पालखी घेऊन निघाले. त्या भोयांपैकी एक जण अधूनमधून पालखीचा दांडा डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर, उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर, असा बदल करीत होता. पालखीत बसलेल्या पंडितानं त्याला संस्कृतमध्ये विचारलं, ‘‘कि ते दण्डो बाधति ?’’ अर्थात, तुझ्या खांद्याला दांडा बाधतोय काय, रुततोय काय ? संस्कृतमधील ‘बाध’ धातूचा अर्थ बाधा पोहोचवणं, त्रास देणं इ. प्रकारचा होतो. इथं ‘रुतणं’, ‘बोचणं’ असा त्याचा अर्थ घेता येईल. पंडिताचा हा प्रश्न ऐकून तो भोई संस्कृतमधूनच उत्तरला, ‘‘न तथा बाधते दण्डो यथा ‘बाधति’ बाधते !’’ तुमचा ‘बाधति’ हा शब्द मला जितकी बाधा देतोय, तितकी बाधा काही हा दांडा देत नाही, हे त्याचं उत्तर होतं. संस्कृत भाषेमध्ये ‘बाध्’ धातू परस्मैपदी नसून आत्मनेपदी आहे. त्यामुळं त्या पंडितानं वापरलेलं ‘बाधति’ हे परस्मैपदी रूप चुकीचं होतं. उलट भोयाचं ‘बाधते’ हे उत्तर बरोबर होतं. भोयाचं पांडित्य पाहूनच त्या पंडिताची बोबडीच वळली. भोईच एवढा पंडित असेल, तर राजदरबारातील पंडित कसे असतील? या प्रश्नाच्या उत्तरानंच त्या पंडिताने माघार घेतली. अर्थातच, तो राजा राणासंघाच्या दरबारात हजर न होताच वाटेतून परत फिरला. त्याने आपल्या विद्वत्तेचा जो दरारा निर्माण केला होता तो भोयाच्या उत्तरानं नाहीसा झाला.

विद्वत्ता कोणाहीजवळची असो ती क्षणात मिळविता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळ्या एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात, परंतु जेवढी खोल मुळे असतात तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो, तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. तुम्हाला एकदाच विजेसारखे चमकायचे की, सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे,  हे तुम्हालाच ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याजवळून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळविण्यात खूप धन-संपत्ती खर्ची घालावी लागत नाही. 

पण एकदा ती तुमच्याजवळ आली की, संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा, अशी भावनाच मनातून निघून जाते. कारण, सर्वचजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हाला ते सर्व मिळवून देते ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. म्हणून जगातील अनुभवता येणा-या सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा. 


(Visit  SanjayNathe.com  for more articles)

3 thoughts on “सूर्यतेज (Sunlight)”

  1. May I just say what a comfort to discover someone who really understands what they’re discussing on the internet. You certainly understand how to bring a problem to light and make it important. More people really need to read this and understand this side of your story. It’s surprising you’re not more popular because you definitely possess the gift.

    Reply
  2. Thank you for another magnificent article. Where else may just anyone get that kind of info in such an ideal approach of writing? I have a presentation next week, and I am at the search for such information.

    Reply

Leave a Comment