हे जपायलाच हवे

“हातातून सुटलेला बाण, तोंडाने उच्चारलेले शब्द आणि वाया गेलेला वेळ यांपैकी काहीच परत येत नसते.” याची माहिती आणि जाणीवसुद्धा आपल्याला आहे. जे अमूल्य असते त्याचा वापरही फार जपून करायला हवा.

लहान मूल चालण्यापूर्वी त्याचे निरीक्षण करा. ते अनेकदा पडते, डोके-तोंड-हात-पाय शरीराच्या ठिकठिकाणी ते जखमी होते, परंतु लवकरच ते चालायलाही लागते. `चालणे’ हा त्याचा उद्देश नैसर्गिक असला तरी ठरलेला असतो. जेवढा अधिक तो पडतो, तेवढ्या लवकर तो चालायला लागतो, परंतु एवढे लागूनही त्याचे चालण्यासाठी लागणा-या प्रयत्नांचे सातत्य कमी होत नाही. म्हणजे नियतीने सर्वांना `सातत्य’ ही बाब समजावून सांगितली आहे, तसेच प्रत्येकाला वेळही सारखाच मिळतो. जो यशस्वी होतो आणि जो अयशस्वी होतो, या दोहोंनाही दिवसाला २४ तासच मिळतात. तुम्ही वेळेचे नियोजन कसे करता यावरही बरेच यश-अपयश अवलंबून असते. यातील कोणतीही बाब पुन्हा मिळविता येणारी नसते. 

“हातातून सुटलेला बाण, तोंडाने उच्चारलेले शब्द आणि वाया गेलेला वेळ यापैकी काहीच परत येत नसते.” याची माहिती आणि जाणीवसुद्धा आपल्याला आहे. जे अमूल्य असते त्याचा वापरही फार जपून करायला हवा. म्हणूनच वेळेच्या नियोजनावर विशेषत्वाने लक्ष द्यायला हवे. जीवनातील अनेक घटना तात्कालिक असल्या तरी दूरगामी परिणाम करणा-या असतात. त्यातील काही तर पाण्याचे बुडबुडेच असतात. पाण्यात राहून पाण्यालाच दूर सारतात आणि हवेत आली की विरून जातात. आपण घालवित असलेला वेळ कोठे खर्ची होत आहे, आता या क्षणी वापरलेला वेळ भविष्यात उपयुक्त ठरेल की, अपायकारक ठरेल! याविषयी आपल्याला खूप चिंतन करण्याची गरज नसते, ते आपण सहजतेने ओळखू शकतो. असे असूनही अपयशाच्या वेळी आपण ज्या पद्धतीने सुन्न होतो आणि अनावश्यक एकांतात, इर्शेत, दु:खात वेळ घालवितो, तो आपल्याला टाळता येत नाही का? एक लक्षात घ्या, जिंकताना कधीच समस्या नसते, पण तुम्ही हरू लागता तेव्हा तुमच्या भावनांचा कडेलोट होण्याची शक्यता असते. खरे तर, अपयशाशिवाय यशाची कल्पनाच करवत नाही आणि समजा अपयशाशिवाय ते मिळाले तर ते दीर्घकाळ टिकेल, मानवाची लढावू आणि जिज्ञासू वृत्ती कायम ठेवेल, याची शक्यता कमीच असते. म्हणजे, यशाचा सर्वात मोठा वाटा अपयश उचलत असेल, तर अपयशाची भीती कशाला? म्हणूनच तर जॉर्ज कार्लिन म्हणतात, “जर तुम्ही अपयशी होण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळाले तर तुम्ही काय निवडाल?”

कोणतेही अपयश हे दीर्घकाळ टिकत नसते. शिवाय, ते मिळायला दुसरा कोणीही कारणीभूत नसतो. तुमचे अपयश हे पूर्णपणे तुमचेच अपयश असते. त्याला तुम्ही स्वत: कारणीभूत असता. अशा कारणांना दुस-याला दोषी ठरविण्यापेक्षा आपण स्वत:च चिंतन केले पाहिजे. विचार करा, अपयशाशिवाय यश मिळविणे किती लोकांना शक्य झाले? म्हणून अपयशाला घाबरू नका, त्याला दोषही देऊ नका. अपयशाला धीराने सामोरे जा. यश मिळविणे हे सुद्धा एक टिमवर्क आहे, हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे. ती टीम म्हणजे – कार्य करण्याची स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास, वाणी, सातत्य, वेळेचे नियोजन, आर्थिक नियोजन, अवलंबित्व नसणे, जिद्द, त्यागाची भावना, काहीतरी नवीन करून पाहण्याची उर्मी, तुमचा व्यवहार, चांगल्या सवयी. म्हणजे स्वत:ची उन्नती किंवा अधोगती ही स्वत:च्या कार्यावरच अवलंबून असते, ती कोण्या परिस्थितीची, नशिबाची मोहताज नसते. म्हणूनच श्रीकृष्णाचे वचन येथे दिले आहे, `स्वत:च स्वत:चा उद्धार करा, स्वत:ची उपेक्षा करू नका. तुम्हीच स्वत:चे खरे मित्र आणि सर्वात मोठे शत्रू आहात.’


(Visit   SanjayNathe.com   for more articles)

Leave a Comment