आपल्या मेंदूत चालणाऱ्या विचारांबद्दल बहुतांश लोक अनभिज्ञ असतात. खरं तर आपल्या सर्व समस्यांची जड हेच विचार असतात. जेव्हा ही इंटर्नल चॅटिंग अनियंत्रित होते तेव्हा निराशा, तणाव आपल्याला घेरायला लागते. ही घेराबंदी तोडायची असेल तर आधी आपल्या विचारांना योग्य दिशा देणे गरजेचे असते. जीवनातील अनिश्चिततेची जबाबदारी स्वीकारणे हेच या बदलाचे पहिले पाऊल आहे. त्यामुळेच, तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता आणि अधिक आनंदी जीवन जगू शकता.
‘तुम्ही ‘खुशी तक पहुंचने का कोई मार्ग नहीं है, खुशी तक पहुंचने का खुशी ही एकमात्र मार्ग है,’ हे तथागतांचं वाक्य जीवनाचं खरं रूप आपल्या पुढं मांडतं. तुम्ही जे शोधताय ते दुसरीकडे मिळणार नाहीच, कारण ते तुमच्याजवळच आहे. तुम्ही स्वत:च तुमचे शिक्षक आहात. तुमच्या प्रश्नांची उत्तरेही तुमच्याजवळच आहेत. फक्त ती शोधायची आहेत. दुर्दैवाने, ती शोधण्यासाठी तुम्ही कधी तुमच्यासाठी वेळ काढलाच नाही. सकारात्मक विचार आणि आत्म-चिंतन यातूनच तुम्हाला ही उत्तरे मिळतील.
अनिश्चिततेची जबाबदारी स्वीकारून मानसिक घडण बदला
अनिश्चितता झेलण्यासाठी आपली मानसिक घडण नैसर्गिकरित्या बनलेली नाही. यासाठी आपल्याला स्वत:ला तयार करावं लागतं. तुमच्या विचारांचा नैसर्गिक कल हा सकारात्मकतेकडे जाण्याचाच असतो. मात्र, तुम्ही त्याला बालपणापासून सवयच चुकीची लावली. तशा सवयी लावायला तुमच्या पालकांनी हातभार लावला. आता त्या सवयी तुमच्या अवचेतन मेंदूत स्थिरावल्यात आणि तुम्ही त्याच दिशेने पळताय. आपण आपल्या सवयी बदलू शकतो, ती क्षमता तुमच्यात आहे, पण तसं वागण्याची, त्या रस्त्यावरून चालण्याची हिंमत तुम्ही करत नाही. म्हणूनच तुम्ही गर्दीचं अनुकरण करता. अशा गर्दीचं जिची मानसिकता नसते. गर्दीतील एक होऊनही तुम्हाला मात्र तुमची स्वतंत्र ओळख हवी आहे. गर्दी सोडल्याशिवाय ती कशी शक्य आहे? यश मिळवण्यासाठी सवयींची दिशा बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
अवनी लेखरा: अनिश्चिततेतून यशाकडे
चोवीस वर्षांची अवनी लेखरा ही पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्ण व एक कांस्य अशा तीन पदकांची कमाई करणारी पहिली भारतीय महिला आहे. वयाच्या 11 व्या वर्षी कार दुर्घटनेत तिच्या शरीराला लकवा मारला गेला. कमरेखालील सर्व भाग निकामी झाला. सहा महिने तिला बेडवरच घालवावे लागले. त्यानंतर तिला साधं बसताही येत नव्हतं. बालमनावर त्याचा प्रचंड प्रहार झाला. ती निराशेत गेली. तिनं तिच्या जीवनाकडे सकारात्मकतेनं पहावं म्हणून तेथून तीन वर्षांनी तिचे वडील तिला व्हीलचेअरवर बसवून शूटिंग रेंजवर घेऊन गेले. तिला रायफलसुद्धा पकडता येत नव्हती. नाच-गाण्याची आवड असलेली ही मुलगी व्हीलचेअरला अशी चिकटली की अगदी नित्यकर्मासाठीही तिला दुसर्यावर अवलंबून राहावं लागत होतं. शूटिंग रेंजपासून वॉशरूम लांब होती. तिथेही तिची मोठी घुसमट व्हायला लागली. ती सारखे नकारात्मक विचार करायची. मात्र तिच्या वडिलांनी तिच्यात सकारात्मकतेची बीजं रोवलीत. दररोज त्या बीजांना खतपाणी टाकण्याचं काम केलं. आधी तिने कमावलेली सकारात्मकता परत आणली. जीवनात प्रत्येक परिस्थितीत काही ना काही करण्यासारखं असतं, हे तिला समजावून सांगितले. हळूहळू अवनी सकारात्मक विचार करायला लागली. त्यातून तिला जगण्याचं आणि जिंकण्याचं ध्येय मिळालं. अवनी लेखरा यांच्याबद्दल अधिक वाचा.
जीवनात ध्येय आणि योजनांची गरज असते, जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असते. ते ध्येय, लक्ष्य अवनी लेखराला मिळालं आणि तिच्या जीवनातील अनिश्चितता संपली. जे आहे त्याचा तिने स्वीकार केला. अपंगत्वाचा स्वीकार करणं हेच तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. आता तिची ऊर्जा एकाच दिशनं वाहायला लागली. म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या दिशेने. तिने हे साध्य केलं, कारण तिने आपल्या अनिश्चिततेची जबाबदारी घेतली आणि स्वतःला सकारात्मकतेकडे वळवले.
तुमचे विचार आणि यशाचे गणित
एकदा मनानं ठरवलं की अवघडातील अवघड गोष्टही मिळविता येते. तुमच्यात ती क्षमता असते. मात्र तुम्ही स्वत:ला नको त्या विचारात गुरफटून टाकलेलं असतं. उदाहरणार्थ, परीक्षा देताना उत्तीर्ण होण्याच्या विचारांपेक्षा तुमच्या डोक्यात अनुत्तीर्ण झालो तर… असेच विचार सुरू असतात. तशी सवयच तुम्ही तुमच्या विचारांना लावलीय. म्हणूनच तर तुमच्या जीवनात अनिश्चितता आहे. त्याऐवजी परीक्षा उत्तीर्ण झालो तर… असा विचार तुम्ही का करत नाही? मानसिक दृढता तुम्हाला अशा विचारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते.
आपलं यश-अपयश आपल्याच हातात असतं. यश तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना सातत्याने सकारात्मक ठेवता. याउलट, अपयश तेव्हा मिळतं, जेव्हा तुमची इंटर्नल चॅटिंगच नकारात्मक असते. म्हणून आधी स्वत:च्या नकारात्मक विचारांना आवरा. ते थांब म्हटल्याने थांबणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला मुद्दामहून प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला तुमच्या जीवनातील अनिश्चिततेची जबाबदारीचा स्वत:ला स्वीकार करावा लागेल. येथूनच पुढील वाटचाल सुरू होईल. संघर्षातही सकारात्मक भाषेचा वापर करावा लागेल. आनंदाची बाब म्हणजे हे तुम्हाला जमते.