जीवन पुनर्विलोकन: अतिरेक टाळा, आरोग्यदायी जीवन | Life Review: Avoid Excess, Live Healthy

दैनंदिन आयुष्यात नकळत आपण काही चुका करतो, ज्यांचा परिणाम आपल्या यशावर आणि मानसिक आरोग्यावर होतो. वेळेचा अपव्यय, आळस आणि सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष अशा अनेक गोष्टींमुळे आपण प्रगतीपासून दूर जातो. नको त्या गोष्टींचा अतिरेक तुम्हाला तळाला नेऊन ठेवतो. या चुका टाळण्यासाठी आणि अधिक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जीवन पुनर्विलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला मुलांना शिक्षण घेण्यासाठी, दोन वेळेच्या जेवणासाठी पैसे नसतात, परंतु आपण मात्र मंदिरात दान देण्यात धन्यता मानतो. हे केवळ एक उदाहरण आहे की, आपण आपल्या प्राधान्यक्रमांचे योग्य पुनरावलोकन करत नाही.

सामाजिक प्रतिष्ठा ही दुसऱ्यांसाठी जगण्यातून प्राप्त होते. गरजूंना मदत करण्याऐवजी लग्न समारंभ, वाढदिवस इत्यादींवर प्रतिष्ठा मिरविण्यासाठी वारेमापखर्च करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रसंगी कर्ज काढून अशा खोट्या प्रतिष्ठा जपल्या जातात, ज्यांचे सामाजिक मूल्य जवळजवळ शून्य असते. अशा बढाईखोर समारंभामुळं प्रतिष्ठा मिळाल्या असत्या तर इतिहास सर्व श्रीमंतांनीच भरला असता. परंतु इतिहासाने दखल घेतली ती समाजसुधारकांची, व्यापक दृष्टिकोन असलेल्यांची. जे भलेही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील, पण समाजाला दिशा देण्यासाठी जीवन झोकून देणाऱ्यांची. खुळचट प्रथांना बाजूला सारून मानवतावादाची कास धरणाऱ्यांची. निवृत्तीनंतरही समाजासाठी सातत्याने काम करत असलेल्यांची. नियतीने प्रत्येकाला इतिहासाचा भाग होण्याचे सामर्थ्य दिले आहे. पण त्यासाठी तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी असायला हवी.

अतिरेक नकोच: जीवनात संतुलन साधा

राजकुमार श्रोणने गौतम बुद्धाकडून दीक्षा घेतली आणि प्रयत्नपूर्वक तपाच्या उच्च सीमेपर्यंत पोहोचला. मात्र तो दोन दिवसांतून एकदाच अन्न ग्रहण करायचा, ज्यामुळे तो दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता. ही बाब इतर शिष्यांनी बुद्धाच्या नजरेस आणून दिली. बुद्धाने श्रोणला जवळ बोलावून विचारले, ‘‘तू सितार छान वाजवतोस, असं मी ऐकले आहे. जर सितारच्या तारा ढिल्या झाल्या किंवा घट्ट झाल्या तर काय होईल?’’ श्रोण उत्तरला, ‘‘तारा ढिल्या झाल्या तर सूर बिघडेल आणि घट्ट झाल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते, म्हणून त्या मध्यम असाव्यात.’’ बुद्ध म्हणाले, ‘‘आपलं जीवनही असंच आहे. तप करावं, पण योग्य प्रमाणात अन्नाचं सेवनही गरजेचं असतंच. जीवनात प्रत्येक गोष्टीचं संतुलन असावं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.’’ गौतम बुद्धांच्या ‘मध्यम मार्गा’चा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे.

तथागतांचा हा संदेश प्रत्येकालाच लागू पडतो. आपल्या जीवनात आपण काही अतिरेक तर करत नाही ना! कधी यावर आपण चिंतन केले आहे का? आपले दैनंदिन व्यवहार आणि निर्णय तपासण्यासाठी जीवन पुनर्विलोकन हे एक प्रभावी माध्यम आहे.

वेळेचा अपव्यय आणि ज्ञानाचे खरे मोल

टीव्ही, मोबाईल आल्यापासून मुलांचं खेळणं कमी झालं आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकतात आणि नैराश्यात जातात. सर्व गुगल, यूट्यूबवर मिळतं, या गैरसमजातून त्यांनी वाचनाला फाटा दिला. अर्धवट ज्ञानाने समृद्ध ही सुशिक्षित पिढी ज्ञानाने समृद्ध असल्याच्या अविर्भावात जगतेय. काहींना तर पदव्या मिळविणे म्हणजेच हुशारी असं वाटतंय. जोपर्यंत ज्ञानाचा उपयोग समाजकल्याण, पर्यावरणासाठी होत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाची उपयोगिता शून्य असते, याचं साधं भानही त्यांना राहिलेलं नाही. हेच कारण आहे की कौटुंबिक, सामाजिक कलह कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. केवळ मानसिक ऊर्जा वाया जाते.

दुसऱ्याला मदत केल्याने खरा आनंद मिळतो. मदतीचा देखावा करणारे, स्वार्थ बाळगून मदत करणारे, सन्मान मिळावा म्हणून काम करणारे आणि सोशल मीडियावर मिरविणाऱ्यांना कधीच समाधान प्राप्त होत नाही. ज्या कार्याचं उत्पादन मूल्य शून्य असतं, त्या कार्यासाठी घालवलेला वेळ निरर्थक ठरतो. विद्यार्थी जीवनात तर वेळेचं महत्त्व असाधारण असतं. फावल्या वेळेचाही जे विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी उपयोग करतात, ते स्पर्धा परीक्षेतही सहजतेने उत्तीर्ण होतात.

विद्यार्थ्यांकडे जी नैसर्गिक बहुमूल्य संपत्ती असते, त्यात आरोग्य आणि वेळ हेच सर्वोच्च स्थानी असतं. म्हणूनच, प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास व्यायामासाठी द्यायलाच हवा. शाळा, कॉलेजच्या अभ्यासानंतर जो वेळ मिळतो, त्याचा उपयोग वाचनासाठी करावा. डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी पुस्तकेच वाचलेली बरी.

चांगल्या सवयी आणि स्मरणशक्ती सुधारणा

आठवून पाहण्याची सवय ही मेंदूच्या व्यायामासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. रोजनिशी लिहिण्याची सवय ही चांगली बाब ठरावी, कारण यामुळे मानसिक तणाव तर घटतोच शिवाय स्मरणशक्ती सुधारण्यासही मदत होते. धरसोड वृत्तीला सुधारण्यासाठी आणि चुकांतून शिकण्यासाठीही या पद्धतीचा चांगला उपयोग होतो. सातत्याने स्वतःचे निरीक्षण करणे आणि सुधारणा करणे हेच तर प्रभावी जीवन पुनर्विलोकन आहे.

भविष्याची तयारी आणि सातत्यपूर्ण पुनरावलोकन

सरकारी नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षेशिवाय दुसरे कोणते माध्यमच नाही. शिवाय आजही खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय विभागातच मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाते. या वास्तवाची जाणीव असूनही विद्यार्थी तिकडे दुर्लक्ष करतात. याला अपवाद अगदीच अल्प विद्यार्थी असतात, जे कॉलेजमध्ये शिकत असतानाच आपले पर्याय मजबूत ठेवतात. बरं, यासाठी फारसा खर्च येत नाही, मात्र फावल्या वेळेचा सदुपयोग होतो. असे विद्यार्थी जीवनाच्या कोणत्याच परीक्षेत फेल होत नाहीत. स्पर्धा परीक्षा यशाची गुरुकिल्ली म्हणजे योग्य नियोजन आणि सातत्य. यासाठीच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राचे नियमित जीवन पुनर्विलोकन करणे आवश्यक ठरते.

आपल्या चुकांमधून शिकून, वेळेचा सदुपयोग करून आणि सामाजिक भान जपून आपण एक आरोग्यदायी व यशस्वी जीवन जगू शकतो. स्वतःच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या भल्यासाठी सतत आत्मपरीक्षण करत राहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment