निराशेचं उदात्तीकरण: तरुणाईतील मानसिक ऱ्हासावर उपाय | Glorification of Despair: Solutions for Youth Mental Decline

बॉक्सिंग रिंगमध्ये बॉक्सर पडला म्हणून तो पराभूत होत नाही; पडून उठला नाही तर पराभूत होतो. जिंकण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणं आणि त्याच दिशेनं आपल्या विचारांचा रोख ठेवणं हा खरं तर मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव असतो. यशासाठी शिस्तीने लढत राहणे महत्त्वाचे आहे. परंतु रिकामं डोकं असलेल्या, बेरोजगारीनं पछाडलेल्या, गरिबीनं वैतागलेल्या आणि सोशल मीडियावर नको ते पाहण्यात दंग असलेल्या मनुष्यांच्या समूहात Mass psychogenic illness अशी मानसिक अवस्था लवकर निर्माण होऊ शकते. या अवस्थेत, व्यक्तीचे अनियंत्रित वर्तन हे निराशेचं उदात्तीकरण असू शकतं.

युवकांमधील मानसिक ऱ्हास आणि निराशेचं उदात्तीकरण | Mental Decline and Glorification of Despair in Youth

यशाचं श्रेय स्वतःला देणं आणि अपयशाचं खापर परिस्थितीवर, घरच्यांवर किंवा मित्रांवर फोडणं, असं करणाऱ्यांचं प्रमाण सध्या वाढत आहे. यामुळे अनेकजण तात्पुरता दिलासा मिळवतात. उदाहरणार्थ, एखादा उच्चशिक्षित स्पर्धा परीक्षार्थी चार-पाच वर्षांपासून सलग परीक्षांमध्ये अपयशी ठरत असेल, तर त्यापेक्षा कमी शिकलेल्याने एखादी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन-तीन वर्षे घेतली तर त्यात काय चूक, असं स्वतःलाच समाधान देणारे अनेकजण आहेत. अशाप्रकारे स्वतःच्या नकारात्मक मानसिकतेला प्रोत्साहन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. ही आता तरुणांची सामूहिक मानसिकता बनत चालली आहे.

या निराशेतून निर्माण झालेल्या मानसिकतेमुळे आपलंच नुकसान होतंय, याचं भानही या तरुणांना नसतं. कारण ‘चुकतंय कुठे?’ यावर विचार करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. तसेच, तीन-चार वर्षांपासून तोच तो अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक एवढं व्यस्त असतं की, ते सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत स्वतःला अभ्यासिकेत, ग्रंथालयात किंवा एखाद्या खोलीत डांबून ठेवतात.

त्यांचा जगाशी, समाजाशी केवळ चालू घडामोडींच्या अभ्यासातून संबंध येतो. तिथे भावना नसतात, तर फक्त अभ्यासाचा दृष्टिकोन असतो. समजा, त्यांना वेळ मिळाला किंवा अभ्यासात मन लागत नसेल, तर थोड्या वेळासाठी जवळ घेतलेला मोबाईल तास-दोन तास त्यांच्या हातातून सुटत नाही. स्क्रोलिंग केल्याने माइंड फ्रेश होतं असं वाटणारेही काहीजण असतात. थोडक्यात, दिवसभरात आत्मचिंतन करायला, चांगलं अभ्यासेतर परंतु मेंदूला पोषक वाचन करायला यांच्याकडे वेळच नसतो. त्यांचा दिनक्रम प्रचंड व्यस्त असतो.

खरं तर हे निरोगी मानसिकतेचं लक्षण अजिबातच नाही. टेक्नॉलॉजीने उपलब्ध करून दिलेल्या प्रचंड माहितीच्या जंजाळात अडकलेल्या तरुणांच्या मानसिक ऱ्हासाची महासाथ सगळीकडेच पसरतेय, अगदी खेड्यापाड्यातसुद्धा. ही स्थिती ‘निराशेचं उदात्तीकरण’ वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

अपयश: शिकण्याची संधी, ‘निराशेचं उदात्तीकरण’ नव्हे | Failure: An Opportunity to Learn, Not Glorification of Despair

अपयशाची तुलना करणं आणि इतरांच्या तुलनेत आपलं अपयश फार मोठं नाही असं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणं, हे क्षणिक सुखासाठी आणि स्वतःला दिलासा देण्यासाठी पूर्णपणे चुकीचं ठरवता येत नाही. मात्र, अशा मानसिकतेची एक पिढीच तयार होणं किंवा एखाद्या क्षेत्रातील बहुसंख्य तरुणांना तसंच वाटणं, हे मात्र एखाद्या मानसिक ऱ्हासाच्या साथीसारखं आहे.

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग (Carl Jung) अशा मानसिक ऱ्हासाबद्दल म्हणतात की, ‘भूकंप, दुष्काळ किंवा कर्करोगाच्या आजारापेक्षाही ही साथ जास्त घातक आहे, कारण ती अव्यक्तपणे माणसांच्या नेणिवेमार्फत पसरते आणि त्या समूहांना दुर्बल बनवते.’ कार्ल युंग यांच्या सिद्धांतांबद्दल अधिक जाणून घ्या. खरं तर, कोणतंही अपयश वाईट नसतंच. ते तुम्हाला यशस्वी होण्यापेक्षा अधिक शिकवतं. पण हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुकीतून शिकण्यासाठी वेळ काढता. अनेकदा तुम्ही तुमच्या अपयशाचे निष्कर्ष आधीच काढून ठेवलेले असतात, जसं की आपलीच मेहनत कुठेतरी कमी पडली असेल म्हणून आपण अपयशी झालो.

मेहनत नव्हे, हमाली! स्मार्ट अभ्यासाचे महत्त्व | Hard Work vs. Smart Study

तुम्ही आठ-दहा तास अभ्यास करता, परंतु देशातील सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवारही तेवढाच अभ्यास करत असतात. ते यशस्वी झाले, मग तुम्ही का नाही? तुम्ही तर वर्ग ३ च्या परीक्षेतही उत्तीर्ण होऊ शकले नाही. विशेषतः, त्यांची शैक्षणिक पात्रता तुमच्यापेक्षा जास्त होती असंही नव्हतं, किंवा ते बुद्धिमत्तेनं तुमच्यापुढे असतील असंही नाही.

तुम्ही देशातील आयएएस टॉपरच्या मुलाखती सलग सहा महिने प्रस्तुत साप्ताहिकात वाचल्या असतील. त्यावरून तुम्हाला काही गोष्टी निश्चितच शिकायला मिळाल्या असतील. त्यांची अभ्यासपद्धती बेसिक स्तरापासून आणि स्मार्ट होती. ठोकळ्यांची भाषा बोलणारे तुम्ही, बेसिक अभ्यासाकडे जास्त लक्षच दिलं नाही. अमुक एखाद्या ठोकळ्यातून अभ्यास करण्याच्या नावाखाली तुम्ही केवळ हमाली करत आहात. परंतु, आपण हमाली करतोय हे स्वीकारण्याची साधी मानसिकतासुद्धा तुमची नाही. मग बदल होतील कसे? हेच ‘निराशेचं उदात्तीकरण’ टाळण्याचा पहिला टप्पा आहे.

सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व | Importance of Positive Outlook and Right Guidance

अनेकजण म्हणतात की, लॉकडाऊनपूर्वी आम्ही साप्ताहिक वाचत होतो आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्णही झालो. परंतु, त्यानंतर सर्व काही मोबाईलवर फुकट मिळाल्याने साप्ताहिक वाचणं बंद केलं. मग जे हवं ते यूट्यूब, इन्स्टाग्रामवर शोधायला लागलो. त्यामुळे शासनाने जागाच काढल्या नाहीत आणि परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. ज्या परीक्षा झाल्या, त्यांची संख्याही अल्प होती, म्हणून आता निराश झाल्यासारखं वाटतंय आणि अभ्यासातही मन लागत नाही, अशी त्यांची तक्रार असते.

खरं तर, लॉकडाऊननंतर केंद्र आणि राज्य शासनाने २० लाखांहून अधिक पदे भरली आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत तुम्हीसुद्धा चार-पाच परीक्षा दिल्या आहेत. पण जेव्हा तुम्ही साप्ताहिकाचे नियमित वाचक होता, तेव्हा तुम्ही लेखी परीक्षा एक-दोन वर्षांत उत्तीर्ण करू शकलात आणि आता चार वर्षांत एकही परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही. याचा अर्थ कुठेतरी मार्गदर्शनाची आणि आत्मविश्वासाची कमी पडतेय. एवढा साधा विचार करायलाही मोबाईलने तुम्हाला वेळ दिला नाही.

जिथे दररोज आपल्या ज्ञानात भर पडायला हवी, तिथे तुम्ही जेथच्या तिथेच राहिलात आणि ‘निराशेचं उदात्तीकरण’ करत, अपयशाचं कारण जागा न निघण्याला देत आहात! थोडा तरी विचार करायला हवा होता ना. चहापाण्यावर आठवड्याला सर्रास पाच-पन्नास रुपये खर्च करणारा तरुण साप्ताहिकावर पंधरा रुपये खर्च करताना हात आखडता घेतो. ही मानसिकता कशाचं द्योतक आहे?

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तरुण मात्र याबाबतीत संवेदनशील आढळतात. ग्रंथालयात साप्ताहिक फुकट वाचायला मिळत असूनही ते विकत घेतात. लेख पुन्हा पुन्हा वाचतात, चालू घडामोडींची टिपणं काढतात. वेगळं काही हवं असल्यास तशा सूचनाही देतात. विशेष म्हणजे, उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये तेच बहुसंख्य असतात.

सकारात्मक वाचन आणि योग्य मार्गदर्शनाचे फायदे | Benefits of Positive Reading and Right Guidance

सकारात्मक वाचनाचा आणि अभ्यासपूर्ण लेखांचा विद्यार्थ्यांवर निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. हे वेळोवेळी विद्यार्थ्यांनीच प्रतिक्रिया देऊन सिद्ध केलं आहे. अभ्यास कसा करायचा, सराव कसा करायचा, नोट्स काढण्याचे फायदे कोणते, इत्यादी माहिती वेळोवेळी साप्ताहिकात दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा ‘निराशेचं उदात्तीकरण’ करण्याकडे असलेला कल कमी होतो.

यामागे उद्देश एवढाच की, प्रत्येक विद्यार्थी हुशारच असतो. त्याला फक्त योग्यवेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. प्रस्तुत साप्ताहिक याच गरजेची पूर्तता करण्याचं काम करतं, ज्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते.

Leave a Comment