सकारात्मकता जोपासणे याचा अर्थ नकारात्मक बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे अथवा कठीण परिस्थितीतून पळ काढणे असा होत नाही, तर सकारात्मक विचारांचा अर्थ जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना निरोगी मानसिकतेने सामोरे जाणे, प्रत्येक समस्येत संधी शोधणे, स्वत:ला आणि स्वत:च्या क्षमतांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे.
मोबाईलच्या जगातही भिंतीवरील कॅलेंडरचे महत्त्व जसे अबाधित आहे तसेच सकारात्मक विचारांचेही महत्त्व कायम आहे आणि राहील. त्यामुळे, अशा विचारांना पोषक वातावरण निर्माण करणे केवळ तुमच्या हातात आहे. वेळेचा सदुपयोग, व्यायामासाठी काढलेला वेळ, शुद्ध भोजन आणि मेंदूसाठी केलेले पोषक वाचन या गोष्टीच तुमची सकारात्मकता वाढवतात. परिणामी, जीवनात सकारात्मक विचार अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सकारात्मक कल्पना किती प्रभावी ठरतात हे तुम्हाला व्हिक्टर फ्रँकल यांच्या प्रत्यक्ष जीवनावरून लक्षात येईल.
व्हिक्टर फ्रँकल: सकारात्मकतेची शक्ती
‘द लॉस्ट ऑफ द ह्युमन फ्रिडम’ मध्ये व्हिक्टर फ्रँकल यांनी आपल्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभव लिहून ठेवलेत. ते यहुदी असल्यामुळे हिटलरच्या नाझी सैन्याने त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह अटक केली. त्यांच्या आई-वडिलांना, भावाला आणि पत्नीला गॅस चेंबरमध्ये डांबून मारण्यात आले. तेव्हा त्यांचं वय पस्तिशीच्या आसपास होतं. व्हिक्टर स्वत:ही छळछावणीत प्रचंड त्रासदायक जीवन जगत होते. त्यांनाही माहिती नव्हतं पुढील क्षणाला त्यांच्यासोबत काय घडेल.
अत्यंत भीतिदायक वातावरणात पूर्ण नग्न अवस्थेत ते छळछावणीतील एका लहानशा खोलीत डांबलेले असताना त्यांच्या डोक्यात वीज चमकावी तसा विचार चमकला. तो असा की, नाझी सैन्य त्यांचं बाहेरील वातावरणात नियंत्रण करू शकतं, परंतु त्यांच्या विचारांवर ते नियंत्रण मिळवू शकत नाहीत. त्यांच्या विचारांवर त्यांचंच नियंत्रण आहे. मग का नाही अशी कल्पना करायची की आपण मुक्ततेचा आनंद घेत आहोत? आपण विद्याथ्र्यांना शिकवत आहोत? त्यांनी त्यांच्या मेंदूला असे विचार करण्यास भाग पाडले की ते नाझी सैन्यातून मुक्त झाले आहेत आणि आपल्या विद्याथ्र्यांना नाझी छळछावणीतील अनुभव सांगत आहेत. त्या परिस्थितीत असे विचार मेंदूत रुजविणे अवघड होते, तरीही त्यांनी सातत्याने आपल्या मुक्त होण्याची कल्पना करणे सुरू ठेवले. अशा पद्धतीने त्यांनी स्वत:ला मानसिक, बौद्धिक आणि भावनिक पातळीवर स्वतंत्र अनुभवले. त्यांचे हे सकारात्मक विचार आणि अनुभव दिवसेंदिवस दृढ होत गेले.
विचारांचे सामर्थ्य आणि वास्तव निर्मिती
त्यांची भीती कमी कमी होत गेली. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात सकारात्मकता आणि आत्मविश्वास यायला लागला. येथपर्यंत की त्या कॅम्पचे सुरक्षा सैनिकसुद्धा त्यांच्या वागण्याने प्रभावित व्हायला लागले आणि ते त्यांना मदत करू लागले. शेवटी तीन वर्षे नरकयातना भोगल्यानंतर खरोखरच त्यांची सुटका झाली आणि त्यांनी कल्पना केल्याप्रमाणे त्यांना जीवन जगण्याचा अनुभव घेता आला. बाहेर आल्यावर त्यांनी बरीच पुस्तके लिहिलीत आणि सकारात्मकतेच्या शक्तीबद्दल लोकांना मार्गदर्शन करणे सुरू केले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली तोपर्यंत ते लोकांना प्रेरित करण्याचं काम करत होते.
आपल्या यशाचे शिल्पकार आपणच असतो. तुम्ही किती ताकदीने सकारात्मक कल्पना करता आणि ती अनुभवता यावरच आपला दृष्टिकोन निर्माण होतो. एकदा का तो तुमच्या अवचेतनमध्ये रुजला की अवचेतन तो प्रत्यक्षात आणण्यासाठी परिस्थितीला व्यवस्थापित करायला लागतो. यासाठी ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात. तुम्हाला प्रत्येक क्षणाला तसा अनुभव यायला लागतो. निराशा झटकली जाते, तसेच तणाव कमी होतो. आनंदी जीवनाची कल्पना प्रत्यक्षात आनंद अनुभवण्याचे प्रसंग पदोपदी निर्माण करायला लागते. हे सर्व स्वप्नवत वाटत असलं तरी हीच वास्तविकता असते. अशाप्रकारे, सकारात्मक विचार तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात.
सकारात्मक विचारांची दिशा
आपण सातत्याने काही ना काही विचार करत असतो. दिवसाला माणसाच्या डोक्यात 60 हजाराहून अधिक विचार येतात. यात जास्त नकारात्मक विचार असतात. एक नकारात्मक विचार त्याच्याच सारख्या इतर नकारात्मक विचारांना जन्माला घालतो. मग नकारात्मक विचारांचे एक चक्रच सुरू होते. सातत्याने तेच ते विचार केल्याने आपली तीच धारणा बनते. ती अवचेतनात घट्ट होते. नकारात्मक विचारांचा न्युरॉलॉजिकल पॅटर्न तयार होतो जो तशाच घटना प्रत्यक्षात आणायला लागतो. म्हणूनच, आपण म्हणतो, मला वाटतच होतं असं होणार म्हणून!
अर्थात आपणच आपल्या विचारांना तशी दिशा दिलेली असते. म्हणून जेव्हाही डोक्यात नकारात्मक विचार येतात ते लागलीच झटकून टाका आणि स्वत:च्या मनाला अशा दिशेनं वळवा ज्या तुम्हाला आनंद प्रदान करतील. तेच ते सकारात्मक विचार सातत्यानं करा. सकारात्मक विचारांचा न्युरॉलॉजीकल पॅटर्न बनला की मग तुमच्या कल्पना अस्तित्वात आल्याशिवाय राहणार नाही. सकारात्मक विचारांत फार मोठी शक्ती असते. त्या दिशेनं स्वत:ला वळवणं फार अवघड नसतं. ज्यानं हे केलं तो निश्चितपणे यशस्वी आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेतो, हेच तर व्हिक्टर फ्रँकल यांना सांगायचं होतं.