चारित्र्य

स्वामी विवेकानंद भगवी वस्त्रे घालत होते. एका बैठकीत त्यांचे मोठेपण सहन न झालेला एक विद्वान म्हणाला, ”यांच्‍या पोशाखावरून हे गृहस्थ सभ्य वाटत नाहीत.”  त्यावर विवेकानंद म्हणाले, ”तुमच्‍या देशात माणसाची सभ्यता कपडे शिवणारे शिंपी ठरवतात. आमच्‍या देशात माणसाची सभ्यता त्यांच्‍या चारित्र्यावरून ठरते.” 

मानसिक आजार हे शारीरिक आजारांपेक्षा कितीतरी धोकादायक असतात. भव्यतेचे आणि दिव्यतेचे माणसांना असणारे आकर्षण स्वाभाविक असले तरी कधी-कधी ते मानसिक आजाराचे रूप धारण करते. आपण जसे वागतो, जसे बोलतो, जसे चालतो तेच आपल्याला दृश्य आणि खरे वाटायला लागते. आपल्या वागण्यातील भंपकपणा इतरांना जाणवत असतो, परंतु स्वत: मात्र बडेजावाची, मोठेपणाची पट्टी डोळयावरून  उतरावयाला आपण तयारच होत नाही. इज्‍जत, प्रेम हे मोठेपणातून नव्हे, तर साधेपणातून व्यक्‍त होते हे मानायलाच आपण तयार होत नाही. तुम्ही किती महागडे पोशाख घालून फिरता यावरून तुमची गुणवत्ता ठरविली जात नाही. तुमचे कर्म, तुमची वागणूक, अंगी असलेली गुणवत्ता, जिज्ञासू व अभ्यासू वृत्तीच तुम्हाला इतरांपेक्षा उंच बनवत असते. 

स्वामी विवेकानंद भगवी वस्त्रे घालत होते. एका बैठकीत त्यांचे मोठेपण सहन न झालेला एक विद्वान म्हणाला, ”यांच्‍या पोशाखावरून हे गृहस्थ सभ्य वाटत नाहीत.” त्यावर विवेकानंद म्हणाले, ”तुमच्‍या देशात माणसाची सभ्यता कपडे शिवणारे शिंपी ठरवतात. आमच्‍या देशात माणसाची सभ्यता त्यांच्‍या चारित्र्यावरून ठरते.” आता सांगा, काय बोलणार तो विद्वान!

आज-काल भपकेबाजीचा आजारच जडल्यासारखा वाटतो. दिवसभर राब-राब राबणारा तरुण आपल्या मित्रांसोबत पबमध्ये पैसे उडविण्यात धन्यता मानतो. यातून त्याला तरी सुख मिळते का? कसे मिळणार? गरजू व्‍यक्‍तीला दहा रुपयांसाठी नकार देणारा हा गृहस्थ हॉटेलमध्ये सहजासहजी पाचशे-सहाशे खर्च करतो. मोठ्या हॉटेलमध्ये तो बिलसुध्‍दा पहात नाही, छोट्या-छोट्या बिलाचीही तो टोटल मारतो, असे म्हणून मित्र खिजवतील याची त्याला लाज वाटते. यालाच तो मोठे समजतो. खरे तर, असे वाह्यात मोठेपण समजणा-यांचा तो मानसिक आजार आहे. यावर कोणतीच औषधे काम करीत नाहीत. स्वत:च्‍या वर्तवणुकीत, गुणवत्तेत वाढ करणे एवढाच पर्याय अशा भोपंजी व्‍यक्‍तींकडे शिल्लक असतो. कारण, त्यांच्‍या वागण्याने समाजात प्रभाव पडत नसतो. उलट, समाजही त्याला भोपंजीच मानतो. परंतु अशा व्‍यक्‍तींना मात्र स्वत: कोणी बडे तीसमारखाँ असल्यासारखे वाटत असते. यातून आपण बाहेर पडले पाहिजे. 

मलाही दुस-याकडून तशीच वागणूक मिळायला हवी जशी मी इतरांकडून अपेक्षित करतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण वास्तविकता स्वीकारतो. आज झपाट्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा दुनियेत झपाटलेले व्‍यक्‍तीच पुढे चालू शकतात. कोणत्याही कारणाने थांबलेला व्‍यक्‍ती इतिहासजमा व्हायला वेळ लागत नाही. मी का थांबलो, हे जगाला ऐकण्याची फुरसत नाही. मी यशस्वी झालो तरच जग माझ्याविषयी जिज्ञासेने चौकशी करेल. मला माझ्याविषयी उत्सुकता निर्माण करण्यासाठी महागड्या गाडीत फिरण्याची गरज नाही किंवा काल रात्री मी मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो होतो, हे स्वत:हून सांगण्याचीही गरज नाही. माझी विद्वत्ता, प्रामाणिकपणा, साधेपणाच मला इतरांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देईल.

काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्‍या या विकारांनी कोणाला सोडले! अति ताण स्मृतीभ्रंशाला कारणीभूत ठरतो. म्हणून त्यावर नियंत्रण ठेवा. जेव्हा तुम्हाला स्वत:चे संतुलन गेल्यासारखे वाटेल तेव्हा लगेच स्वत:ला आवरा. तुम्ही असे सहजतेने करू शकता. क्रोध तर स्वत:लाच जाळतो. ज्‍याचा तुम्ही क्रोध करता त्याला इजा पोहोचेल तेव्हा पोहोचेल. तत्पूर्वी, तुम्ही स्वत:च गरम भट्टीत तापलेले असता. लोभ आणि मोह हा केवळ संपत्तीचाच असतो, असे नव्हे. हा तरुण-तरुणींचा सुध्‍दा असू शकतो. ईर्ष्‍या तर मनुष्याला कोठचेच ठेवत नाही. स्वत:समोर दुस-याची केलेली तुलनाही मनात ईर्ष्‍या निर्माण करते. पत्नीसमोर दुस-या सुंदर स्त्री ची केलेली तारीफ तिच्‍या मनात ईर्ष्‍या निर्माण करते. गरीब-श्रीमंतातही ईर्ष्‍या पहायला मिळते. हे सर्व असे विकार आहेत ज्‍याची जाणीव स्वत:ला असते, परंतु तरीही तो स्वत:ला त्यांच्‍यापासून सोडविण्याचा साधा प्रयत्नही करीत नाही. अर्थात, असे सर्व गुण चिटकण्यामागे आपण स्वत:च कारणीभूत असतो. या विकारांचा प्रसाद प्रत्येकाने स्वत: कधी ना कधी कमी-अधिक प्रमाणात घेतला असतो. तरीही सुधारणा ही दुस-यांमध्ये व्हायला हवी, आपण अशी चूक करूच शकत नाही किंवा करणार नाही, अशी खोटी तसल्ली स्वत:ला देत असतो. आपण हे लक्षातच घेत नाही की, स्वत:ला फसविणे यापेक्षा मोठा गुन्हाच नाही.

हा स्वार्थ नव्हे !

तुम्ही तुमच्‍या जीवनाविषयी जसा विचार केला असेल तशीच ब्रह्मांडाकडे मागणी करा. ब्रह्मांडाला जास्त मागितल्याने तुम्ही स्वार्थी होणार नाही. स्वत:चा विचार करा, तुमचा संघर्ष पाहून तुमच्‍या परिवाराला आणि मित्रांना कसे वाटत असेल ! तुम्ही त्यांच्‍यासाठी कसे उदाहरण बनत आहात. तुमच्‍याजवळ चांगल्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी पैसे नाहीत, दुस-यांच्‍या मदतीसाठी तुमच्‍याकडे पैसे नसणे, हे महान उदाहरण निश्चितच असू शकत नाही. म्हणून स्वत:साठी ब्रह्मांडाकडे मागणी करणे, हे स्वार्थीपणाचे उदाहरण होऊ शकत नाही. तुमच्‍याकडे अधिकता असेल, तरच तुम्ही  दुस-यांची मदत करू शकाल. म्हणून चांगले आरोग्य, भरपूर पैसा आणि आनंदी जीवनाची ब्रह्मांडाकडे मागणी करा आणि त्यावर विश्वास ठेवा की, ते तुम्हाला मिळत आहे. मोठ्या गोष्टींची मागणी करा आणि मागितलेल्या त्या सर्व गोष्टींवर विश्वास असू द्या की, हे सर्व संभव आहे. तुम्ही ह्दयापासून आणि विश्वासाने मागितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, अवश्य मिळतील. कधीच जीवनातील कमतरतेविषयी बोलू नका, फक्‍त आणि फक्‍त चांगल्या गोष्टींविषयी बोला. स्वत:साठी नवे स्टँडर्ड बनवा, स्वत:ची नवी विचारशैली असलेली मानसिकता बनवा आणि पूर्ण विश्वासाने, कोणताही संकोच न करता  ब्रह्मांडाकडे मागणी करा.  – आकर्षणाचा नियम       


( Visit SanjayNathe.com for more articles )

Leave a Comment