1952 पूर्वी लोकांमध्ये असा समज होता की, कोणताही व्यक्ती एका दमात चार मिनिटात एक मैल अंतर पार करू शकत नाही. मात्र, इंग्लंडचा दिग्गज अॅथलेट सर रॉजर वॅबिस्टर यानं एका दमात एक मैल धावून हा रेकॉर्ड बनवला आणि असं करणारे ते पहिले अॅथलेट बनले. त्यानंतर मात्र अनेकांनी चार मिनिटात एक मैल धावण्यात यश मिळवलं. थोडक्यात, यश मिळवताच येत नाही, ही मानसिकता तुम्हाला यश मिळवूच देत नाही, परंतु त्यानं यश मिळवलं, ते आपणही मिळवू शकतो, अशी मानसिकता यश मिळवून देते. म्हणजे, तुम्ही ठरवलेल्या उद्देशाबद्दल कशी मानसिकता ठेवता, यावर तुमचं यशापयश अवलंबून असतं. यालाच दी पॉवर ऑफ माईन्डसेट, असं म्हणतात.
जीवनातल्या यश-अपयशात तुमच्या माईन्डसेटची भूमिका महत्त्वाची असते. चुकीच्या अथवा नकारात्मक मानसिकतेनं जिंकणं अवघडच, म्हणून मानसिकता बदलवणं गरजेचं असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, योग्य मानसिकता ठेवणं असतं. कारण, यश हे योग्य मानसिकतेनंच मिळतं. मानसिकतेचे दोन प्रकार असतात 1) Fixed Mindset, २) Growth Mindset
Fixed Mindset : The general Attitude of a person and their fixed ideas that are often difficult to change, अशी मानसिकतेची व्याख्या केली जाते. Fixed Mindset ही लहान वयात विकसित होणारी बाब. अशा मानसिकतेची लोकं मेहनतीत कमी असतात, असं बिलकूलच नसतं, परंतु या मानसिकतेमुळे आपण काही बदल घडवून आणू शकतो, असं त्यांना वाटत नाही. ते जबरदस्त मेहनत करणारे असतात, परंतु स्वत:च्या वा आपल्या स्नेह्यांच्या स्वभावात बदल करता येत नाही, असं त्यांना वाटतं. चॅलेंज स्वीकारायला ही माणसंसुद्धा मागं नसतात, परंतु आपण ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही, असं त्यांचं ठाम मत असतं. म्हणून ते कठोर मेहनतीचाच मार्ग निवडतात, भलेही दुसरे पर्याय उपलब्ध असतील आणि कठोर मेहनत करून अपयश पदरी पडलंच तर ते खचून जातात, फ्रस्टेड होतात. ते स्वत:च्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांच्या अशा वर्तनानं आणि विचारानं त्यांची ही मानसिकता अधिक दृढ होते.
Growth Mindset : कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात करता येते, विपरीत परिस्थितीवर मात करण्याचे काहीतरी उपाय असतीलच, अशा संभावना तपासून पाहणा-यांचा ग्रोथ माईन्डसेट असतो. अशा माईन्डसेटची माणसं स्वत:च्या क्षमता विकसित करण्यासाठी सदैव तत्पर असतात. असा स्वभाव असणारी माणसं लवचिक मानसिकतेची असतात. त्यांचे मार्ग संपलेले नसतात. फिक्स माईन्डसेटवाल्यांचा दिमाख मात्र जिथं काम करणं थांबवतो तिथं ग्रोथ माईन्डसेटवाल्यांचं काम सुरू होतं. परिस्थितीनुरूप स्वभावातही बदल घडवून आणला जाऊ शकतो, असं या लोकांना वाटतं. म्हणून प्रयत्न करूनही जर अशी माणसं अपयशी झालीच, तर ते निराश होत नाहीत. ते यशाच्या दुस-या संभावना तपासून पाहतात, कायम प्रयत्नशील राहतात. अशा माईन्डसेटची माणसं जबरदस्तीनं काम करत नाहीत, तर जे काम करतात त्यात ते आवड निर्माण करतात. म्हणून अशा मानसिकतेच्या लोकांचं जिंकण्याचं, यशस्वी होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मानसिकतेनंच प्राप्त होतो. म्हणून स्वत:बद्दलचा माईन्डसेट जाणून घेणं महत्त्वाचं असतं. हे आपल्याला दुसरा कुणीतरी येऊन सांगणार नाही. आपला माईन्डसेट आपल्यालाच ओळखता येतो आणि आपली मानसिकता बदलण्याची क्षमता आपल्यातच असते. सातत्यानं सकारात्मक विचार ठेवणारा हा ग्रोथ माईन्डसेटचा धनी बनतो. जे काम इतरांना जमलं नाही म्हणून मलाही जमणार नाही, अशी मानसिकता तुम्हाला नवं काही करण्यापासून थांबवते. याउलट, ग्रोथ माईन्डसेटचं असतं. लहान वयात घडलेल्या काही गोष्टी, दुदैर्वी घटना, कुटुंबातल्या व्यक्तींच्या वर्तणुकीतून व कार्यकर्तृत्वातून तुमचा माईन्डसेट बनलेला असतो, परंतु माईन्डसेट बदलला जाऊ शकतो, हे कळणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. एकदा तुम्ही तुमची मानसिकता उर्ध्व दिशेनं वळवली की, निसर्गातली अनेक गुपीतं जादूच्या कांडीप्रमाणे तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मदत करतील, नवनवीन मार्ग दाखवतील. यश मिळवण्यासाठी हेच तर महत्त्वाचं असतं.
अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)