तुमच्या ध्येयधिष्ठित प्रचंड इच्छाशक्तीला लगाम घालण्याची ताकद विश्वात केवळ स्वत: तुमच्यातच असते. आयुष्यात दोनच दिवस महत्त्वाचे असतात, एक तुम्ही जन्माला आला तो दिवस आणि दुसरा तुम्ही जन्माला का आला आहात, याचे उत्तर सापडते तो दिवस.
वॉल्ट डिस्ने, ग्रॅहम बेल, एडिसन, आईनस्टाइन यांचे जीवनकार्य बघता यांना dyslexia म्हणजे स्लो लर्निंग ही व्याधी होती, यावर तुमचा विश्वास बसतो का? परंतु ध्येय समोर असेल, ते साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपल्या कार्यावर आपली निष्ठा असेल, तर कुठलेही काम असाध्य नसते.
वयाच्या तिस-या वर्षी झालेल्या अपघातामुळे आलेल्या अंधत्वाने खचून न जाता लुईस ब्रेल यांनी बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या बहुमोल लिपीचा उपयोग आज जगभरातील लाखो अंध व्यक्तींना होत आहे. स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असा असाध्य आजार झाला की, ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुध्दिमत्तेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावर सखोल संशोधन करून महान शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला. १८८० साली जन्मलेल्या हेलन केलर यांच्यावर मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्त्व आणि अंधत्व ही दोन्ही संकटे एकत्रितरीत्या कोसळली. यापैकी कोणतेही एक अपंगत्वसुध्दा सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करायला पुरेसे असते, परंतु या असामान्य स्त्रीने शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले उच्चशिक्षण पहाडाएवढ्या अडचणींना तोंड देत पूर्ण केले. हेलन अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्वविख्यात झाल्या. थोडक्यात शारीरिक व्याधी, कमजोरी मनुष्याची मानसिक दृढशक्ती रोखू शकत नाही. अपंगांच्या ऑलिम्पिकचे रेकॉर्डसुद्घा भारतासारख्या देशातील चांगल्या खेळाडूंच्या रेकॉर्डला लाजवतील, असे असतात. म्हणजे, तुमच्या ध्येयधिष्ठित प्रचंड इच्छाशक्तीला लगाम घालण्याची ताकद विश्वात केवळ स्वत: तुमच्यातच असते. अर्थात, आपणच आपल्याला थांबवत असतो. कधी आपण कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करतो, कधी सामाजिक परिस्थितीचे कारण पुढे करतो, तर कधी आपल्याला सल्ला देणा-या हितचिंतकाचे कारण पुढे करतो आणि आपल्या अपयशाचे खापर आपण दुस-या कोणावर तरी फोडत असतो. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो, ”आपल्या आजच्या परिस्थितीला दुसरा कोणीही कारणीभूत नसतो, तर आपण स्वत:च ती परिस्थिती निर्माण केलेली असते.”
मारिया रॉबिन्सन आणि मार्क ट्वेन यांची वाक्ये येथे मुद्दामून द्यावी वाटतात. ”भूतकाळात शिरून कोणीही पुन्हा नव्याने सुरुवात करू शकत नाही, पण कोणीही आज आणि आता सुरुवात करून शेवट चांगला करू शकतो.” तुमचा भूतकाळ कितीही चांगला किंवा कितीही वाईट असला, तरी तुमच्या भविष्यातील कार्यवाहीवर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम तेव्हाच घडून येतो जेव्हा तुम्ही त्याला वर्तमानात जागा करून देता. मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण जरी दवबिंदूसारखे असले तरी त्याची चकाकी मोत्यासारखी असते, हे विसरून जो स्वत:च्या जीवनातील दु:खाविषयीच बोलत असतो तो पुन्हा तशाच दु:खांना आपल्या जीवनात आकर्षित करीत असतो. म्हणून आठवायचे झाल्यास चांगले क्षण आठवा, नाही तर आजमध्ये जगा, उद्देश ठरवून आजचा दिवस सत्कर्मी घाला. आयुष्यात दोनच दिवस महत्त्वाचे असतात, एक तुम्ही जन्माला आला तो दिवस आणि दुसरा तुम्ही जन्माला का आला आहात, याचे उत्तर सापडते तो दिवस.
आपण आणि फक्त आपण स्वत:च आपल्या प्रत्येक निर्णयाला जबाबदार असतो, हे कायम लक्षात ठेवा. जीवनात यश मिळविण्यासाठी मेहनत ही महत्त्वाची आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो, तो स्वत:वरचा विश्वास. कोणत्याच परिस्थितीत आपल्या यशाचे मार्ग बंद होत नाहीत. असे तुम्हाला वाटत असेल की, आपण अशा विपरीत परिस्थितीत सापडलो जिथे सर्वच मार्ग संपतात… तर तुम्ही चुकीचा विचार करीत आहात. जिथे एक मार्ग बंद होतो तिथे अनेक मार्ग उघडलेले असतात. फक्त तुम्ही संयम ठेवायला हवा… परंपरागत मार्गानीच नव्हे, तर इतर नवीन मार्गांनीही आपण ध्येय गाठू शकतो का? याची चाचपणी करावी. ब्रम्हांडात न्याय-अन्याय हा प्रकारच नसतो. तो त्याचीच मदत करतो जो स्वत:ची मदत करतो. म्हणून मनातल्या भीतीपेक्षा तुमची स्वप्न मोठी आणि शब्दांपेक्षा तुमची कृती अधिक बोलकी असायला हवी. एक मार्ग बंद झाला म्हणून थांबायचे नसते, नवनवीन मार्ग शोधून पुढे चालायचे असते. मनुष्याची प्रगती नव्हे जीवनात क्रांती नवीन मार्गांनीच घडविली, हे विसरून चालणार नाही.
लोक काय म्हणतील… हा एवढासा विचारही आपल्याला किती अस्वस्थ करतो, हे आपल्याच वागण्याचे वस्तुनिष्ठ अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येईल. खरं म्हणजे, तुमच्याविषयी लोकांच्या भावना फार वरवरच्या असतात. त्यातही जे तुमच्या मागे बोलतात त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रश्नच नसतो. कारण, ते नकळतपणे तुम्हालाच लोकप्रिय करत असतात. दखलपात्र व्यक्तीतींच लोकं दखल घेतात. तुमच्या भावना व उद्देश चांगला असेल तर तुम्हाला खूप विचार करण्याची किंवा घाबरण्याची गरज नसते. शेवटी आपले जीवन आपल्यालाच जगायचे असते. ते कसे जगायचे ते आपल्याला ठरवायचे असते. आपल्या जीवनाचे आपणच लेखक असतो… मी जसे लिहिणार आणि त्यावर प्रत्यक्ष विश्वास ठेवणार तसेच माझे जीवन घडणार असेल, तर वेळ कशाला घालवायचा, घ्या पेन आणि लिहा तुम्हाला काय पाहिजे… कोणते उद्दिष्ट गाठायचे…
अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)