नैसर्गिक बुध्दिमत्ता लाभलेल्या विलक्षण बुध्दिमत्तेच्या गणितज्ज्ञाला केवळ शिक्षण नाही म्हणून क्लर्कपदी नेमण्यात आले. तरीही मोलमजुरीपेक्षा हे काम बरे होते. त्यांचे गणिती सिध्दांत समजावून घेण्यासाठी मद्रास विद्यापीठातील अभियंत्यांची एक टीमच कार्य करीत होती.
पहिला भारतीय गणितज्ज्ञ म्हणून श्रीनिवासा अयंगार रामानुजन (Srinivasa Iyengar Ramanujan) यांना ओळखले जाते. ‘शून्याचे मूल्य’ याची ओळख जगाला करून देणारे ते पहिले गणितज्ज्ञ होते. युरोपीय गणितज्ज्ञांचे सिध्दांत आपल्या शालेय पुस्तकात असल्यामुळे लहानपणापासून आपण त्यांना ओळखतो. मात्र, श्रीनिवासा रामानुजन यांच्याविषयी जुजबी माहितीही अनेकांना नाही. २२ डिसेंबर १८८७ मध्ये तामिळनाडूतील इरोडा जिल्ह्यात जन्मलेल्या श्रीनिवासा यांचा परिवार कापडाच्या दुकानात मोलमजुरी करीत होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते दहावीपर्यंतच शिकू शकले. त्यांना गणितात प्रचंड रुची होती. दहावी झाल्यानंतर त्यांनाही उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागली. फावल्या वेळेचा उपयोग ते गणिताचा छंद जोपासण्यासाठी करू लागले. इतर मुलांनी फेकून दिलेले पाठमो-या को-या असलेल्या कागदावर त्यांची आकडेमोड चालत होती. त्यांचे गणित उच्च दर्जाचे असल्यामुळे त्यांच्या आकडेमोडीने अनेक सिध्दांताला जन्म दिला. असे फाटक्या कागदावरील सिध्दांत तेव्हा मद्रास युनिव्हर्सिटीचे चीफ अकाऊंटन्ट एस.एन. अय्यर यांच्या हाती लागले. त्यांनी सर्वप्रथम श्रीनिवासाची क्लर्कपदी नियुक्ती करून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला. नैसर्गिक बुध्दिमत्ता लाभलेल्या विलक्षण बुध्दिमत्तेच्या या गणितज्ज्ञाला केवळ शिक्षण नाही म्हणून क्लर्कपदी नेमण्यात आले. तरीही मोलमजुरीपेक्षा हे काम बरे होते. त्यांचे गणिती सिध्दांत समजावून घेण्यासाठी मद्रास विद्यापीठातील अभियंत्यांची एक टीमच कार्य करीत होती. त्या अभियंत्यांनी श्रीनिवासा रामानुजन यांचे सर्व हस्तलिखित जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ प्रो. जी.एच. हार्डी यांना पाठविले.
१९१२ मध्ये प्रो. हार्डी यांना ते सिद्घांत मिळाले. प्रो. हार्डी यांनी रामानुजनच्या सिध्दांताचा अभ्यास करून त्यांना ‘मोठा गणितज्ज्ञ’ म्हणून गौरविले आणि त्यांच्या भेटीसाठी लंडनहून भारतात आले. अनेक दिवस उपासमारीत काढलेल्या, अत्यंत हलाखीचे जीवन जगणा-या श्रीनिवासाला तेव्हापासून ख-या अर्थाने ओळख मिळाली. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांच्या शोधकार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. ते प्रथम भारतीय व्यक्ती होते ज्यांना कॅम्ब्रिज विद्यापीठाचे फिलॉसॉफिकल व रॉयल सोसायटी फॉर इंग्लंडच्या प्रमुखपदी नेमण्याचा सन्मान मिळाला, परंतु तेथील हवामान त्यांना सुट झाले नाही. ते सातत्याने बिमार पडू लागले. बिमारीमुळे ते भारतात परतले, परंतु केवळ वयाच्या ३३ व्या वर्षी तामिळनाडूतील कुंभकोणम् येथे २० एप्रिल १९२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रचंड बुध्दीमत्तेच्या या गणितज्ज्ञाचे अकाली निधन झाले.
श्रीनिवासा रामानुजन यांना त्याकाळी त्यांच्या क्षमतेला पेलवेल असे वातावरण मिळाले असते तर काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. सुरुवातीचे १६-१७ वर्षे शिकण्यात गेलीत, त्यानंतरची पहिली १० वर्षे पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षात गेलीत, मिळालेल्या सहा-सात वर्षात त्यांनी जगाला गणिताची वेगळी ओळख करून दिली. त्यावेळी त्यांना प्रत्येक पावलागणिक करावा लागणारा संघर्ष, गणिताच्या आवडीसाठी लागणारा वेळ उदरनिर्वाहाच्या साधनासाठी खर्च करावा लागल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणा-या अस्वस्थतेचे वर्णन किंवा अंदाज आपण घेऊ शकत नाही. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या छंदाची आवड जोपासणारे श्रीनिवासा रामानुजन विद्यार्थीमित्रांना सातत्यपूर्ण कार्याची, चिकाटीची आणि कितीही कष्ट पडले तरी ध्येय न सोडण्याची प्रेरणा देतात.
आज प्रत्येक क्षेत्रात गळेकापू स्पर्धा आहे, सततची आव्हाने आहेत. ते पेलण्यासाठी तरुण सातत्याने धडपडतो आहे. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर होत आहे. परिणामी, मनस्वास्थ्य बिघडत चालले आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धेची जाणीव करून दिली जात आहे. अशी स्पर्धा जी कधीच थांबणारी नाही. अशा स्पर्धेत उतरलेला तरुण मनस्वास्थ्य टिकविण्याच्या नादात ते अधिक बिघडविण्याचे कार्य करीत आहे. प्रसंगी व्यसनाचा आधार घेऊन स्वत:ला सावरण्याचा हा केविलवाणा प्रयत्न त्याच्याच अंगलट येत आहे. स्पर्धेला खुलेपणाने सामोरे जायला हवे. स्पर्धा म्हटले की यश-अपयश येणारच. आजची स्पर्धा बहुतांश पैशाभोवती फिरणारी आहे, त्यामुळे आर्थिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठे उद्योगपती आपली प्रतिष्ठा, प्रतिमा कायम ठेवण्यासाठी, तर नवोदित कार्याची गती वाढविण्यासाठी झटत आहे. सुरक्षित जीवनासाठी केला जाणारा हा प्रवास मात्र असुरक्षित रस्त्यावर हेलकावे खात आहे. अडचणी प्रत्येकाला जातात, त्यातून बाहेर पडण्यासाठीही प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे, परंतु ते शरीरस्वास्थ्य व मनस्वास्थ्य बिघडविणारे असेल तर आपणच स्वत:ला सांभाळण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. ताण-तणावाचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि मनाचा शरीरावर. या धावपळीत कामाला खीळ न बसू देता, अनावश्यक जाणारा वेळ आपण स्वत:साठी द्यायला हवा. आपल्या आवडीनुसार चांगले पुस्तक वाचणे, चांगले विचार करणे, आवडीच्या कार्यात मुद्दाम स्वत:ला झोकून देणे, आपल्याला आनंद देणा-या ठिकाणी भेट देणे इत्यादींमुळेही मनाला आनंद होतो. विशेष म्हणजे, यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागत नाही. मनस्वास्थ्यामुळे शरीरस्वास्थ्य उत्तम राखण्यास मदत मिळते, कार्यक्षमतेत वाढ होते. एकच काम वेगळ्या पध्दतीने करण्याची क्षमता विकसित होते. परिणामी, जे मिळते ते आपल्यासाठी उत्साहवर्धक व फायद्याचेच राहते.
– Visit SanjayNathe.com for more articles –
Source of image – श्रीनिवास रामानुजन्