सात टप्पे यशाचे (Seven stages of success)

एक उच्‍च शिक्षित व्यक्ती खेड्यात गेला व तेथे त्याने एका शेतक-याला प्रश्न विचारला ‘आज मौसम कसा राहील.’ शेतकरी उत्तरला, ‘जसा मला अपेक्षित आहे, तसाच राहणार.’ शिक्षित व्यक्ती म्हणाला, ‘मौसम काय तुझ्या मताप्रमाणे चालतो.’ शेतकरी म्हणाला, ‘म्हणूनच तर मी त्याच्‍या मताप्रमाणे चालतो.’

वेळेचा सदुपयोग

            प्रत्येकाला दिवसाला २४ तासाचा वेळ मिळतो. पैकी १६ तासांचे योग्य नियोजन करणे प्रत्येकाला शक्य आहे. शारीरिक व मानसिक दोन्ही व्यायाम होतील अशाप्रकारे वेळेचे नियोजन करावे. स्वत:ला चांगल्या कार्यात गुंतवून ठेवण्याची कला आत्मसात करावी. मानसिक अस्वस्थता वाढेल असे कार्य टाळावे. टीव्ही, वायफळ चर्चा, आळस यामध्ये वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

सकारात्मक दृष्टिकोन

            कार्य केल्यानंतरही अपेक्षित यश न मिळाल्यास निराशा येते. निराशेने दैनंदिन कार्यक्रम अस्तव्यस्त होतो. कोणत्याही चांगल्या कार्यासाठी घालवलेला वेळ भविष्यात उपयुक्त ठरतोच. त्यामुळे लगेच अपेक्षित फळ मिळाले नसले तरी निराश होण्याचे कारण नाही. इतरांचा विचार न करता स्वत: सकारात्मक असणे अत्यंत आवश्यक असते. न्यूटनच्‍या  तिस-या नियमाप्रमाणे जितक्या सक्षमतेने कार्य कराल तितक्याच सक्षमतेने त्याचे फळ मिळेल. लगेच यश मिळाले नाही, याचा अर्थ प्रयत्न वाया गेलेत, असा होत नाही.

चांगल्या सवयी

            शरीराची एक भाषा आहे. त्याला जशा सवयी लावाल तसे ते वागते. वाईटासारखेच चांगल्या व्यसनाचेही असते. जेव्हा सवयी माणसावर हावी होतात तेव्हा आपण त्याला व्यसन म्हणतो. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, नियमित वृत्तपत्रे वाचणे, आदर्श व्यक्‍तींची चरित्रे वाचणे, फावल्या वेळात इतरांना फायदेशीर ठरतील किंवा कुटुंबाला सहायक ठरतील, अशी कामे करणे इत्यादी कार्य नियमित करीत राहिल्यास आपोआपच त्याचे व्यसन जडते. अशा चांगल्या सवयींमुळे समाजात स्वत:ची प्रतिमा उंचावते. इतरांमध्ये स्वत:ला मिळत असलेला सन्मान पाहून पुन्हा चांगली कामे करण्याची प्रेरणा मिळते. चांगल्या सवयींमुळे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत मिळते.

व्यर्थ आत्माभिमान नको

            आपण केलेल्या कार्याचा अभिमान बाळगणे मानवी सहजगुण आहे. मात्र, त्याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वत:चे मोठेपण सांगणा-या व्यक्ती संकुचित विचारांचे व नेहमीच दु:खी राहतात. इतरांचे मोठेपण सांगणारे केवळ मनानेच मोठे असतात, असे नव्हे, तर अशा व्यक्तींना समाजात सन्मान मिळतो. तोंडावर उधळलेली स्तुतीसुमने म्हणजे सन्मान नाही. ज्‍यांच्‍या गैरहजेरीतही आदरयुक्‍त शब्द वापरले जातात, ते खरे सन्मानास पात्र ठरतात. तुम्ही केलेल्या कार्याचे उगाच प्रदर्शन नको. ज्‍याप्रमाणे कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्य उगवण्याचे थांबत नाही त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या कार्याविषयी मुद्दाम दुस-याला सांगण्याची आवश्यकता नसते, ते सर्वांना दिसते. आपल्या आजूबाजूची माणसेही आपल्याइतकीच हुशार असतात, याचे नेहमी भान असू द्यावे.

आत्मविश्वास

            कोणतेही कार्य तडीस नेण्यासाठी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक असते. नवीन कार्यासाठी धिम्या गतीने निर्णय घेणे, कार्य सुरू करण्यापूर्वी केवळ अडचणींनाच पुढे करणे हे आत्मविश्वासाची कमी असण्याचे निदर्शक आहे. कामाला हाती घेतल्यानंतर पूर्ण आत्मविश्वासाने कामी लागा. पहा, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनुभवातूनच आत्मविश्वास वाढतो,  पुढे आत्मविश्वासातून प्रेरणा मिळते, प्रेरणेने कामाला गती येते, गतीने आळस मागे पडतो, आळस झटकल्याने वेळेचा सदुपयोग होतो. पर्यायाने आपल्या पदरी केवळ यश आणि यशच पडते.

सातत्य

            एका आठवड्याचा व्यायाम एका दिवसात आटोपून आठवड्याच्‍य’ इतर दिवसात विश्रांती घेतल्याने सुदृढ शरीर बनत नाही, तर त्यासाठी थोडा परंतु दररोज व्यायाम करण्याची आवश्यकता असते. तसेच कोणत्याही कामात सातत्य असणे अत्यंत आवश्यक असते. दोन-चार दिवस खूप काम करायचे व नंतर सात-आठ दिवस आराम करणारा व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्ही जन्मत: बुध्दिमान असण्याची आवश्यकता नाही. जगातील सर्व यशस्वी व्यक्तींच्‍या जीवनावर नजर टाकल्यास त्यांच्‍या कार्यामध्ये असलेले सातत्य दिसेल. म्हणूनच आपले पूर्वज ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला सांगत आलेत. जिंकण्यासाठी तुम्ही ससा बनण्याची नव्हे, तर कासव बनण्याची आवश्यकता असते.

नियंत्रण

            मानवाला नियंत्रित करणा-या अनेक शक्‍ती निसर्गात आहेत. सर्वच बाबी, सदासर्वकाळ मनासारख्या घडतातच असे नाही. अशावेळी स्वत:ला नियंत्रित करून सातत्य ढळू न देता तात्पुरत्या कालावधीसाठी इतर चांगल्या गोष्टींमध्येही लक्ष घालावे. स्वत:वर नियंत्रण ठेवणे हे अत्यंत कठीण असले तरी ते असंभव नाही, हे लक्षात ठेवावे. प्रामाणिकता, स्वत:बरोबर इतरांचाही विचार करण्याची वृत्ती, परिस्थितीला स्वत:च्‍या नजरेतून पाहण्याचे कसब अंगी बाणवल्यास नियंत्रण मिळविणे अवघड जात नाही.

एक उच्‍च शिक्षित व्यक्ती खेड्यात गेला व तेथे त्याने एका शेतक-याला प्रश्न विचारला ‘आज मौसम कसा राहील.’ शेतकरी उत्तरला, ‘जसा मला अपेक्षित आहे, तसाच राहणार.’ शिक्षित व्यक्ती म्हणाला, ‘मौसम काय तुझ्या मताप्रमाणे चालतो.’ शेतकरी म्हणाला, ‘म्हणूनच तर मी त्याच्‍या मताप्रमाणे चालतो.’ थोडक्यात, ज्‍याला मी नियंत्रित करू शकत नाही त्याचा उगाच विचार करण्यापेक्षा, जो जसा आहे तसा स्वीकारण्यात आनंद मानणे  अधिक सोयीस्कर नाही का !

(अशाच लेखांसाठी SanjayNathe.com पहावे.)

Leave a Comment