काही गोष्टींना पर्याय नसतो: शाश्वत मूल्यांचे महत्त्व | Some Things Have No Alternative: The Importance of Timeless Values
जीवनात काही गोष्टींना पर्याय नसतो. तुमचा अभ्यास दुसरा कोणी करू शकत नाही. तुमचा व्यायाम दुसऱ्यानं करून तुम्हाला आरोग्य लाभणार नाही. तुमचा श्वास दुसऱ्यानं घेऊन चालणार नाही. अशा मूलभूत गोष्टींना कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे मानवी स्वभाव सतत काहीना काही नवं शोधत असला तरी, काही शाश्वत सत्यांना आपण विसरू शकत नाही.
आपल्याला प्रत्येकवेळी काही ना काही नवीन हवं असतं. मोबाईलपासून तर गाडी घोड्यापर्यंत सर्वच लेटेस्ट. यालाच बाजार म्हणतात, कारण यात सर्व भौतिक वस्तूंचा समावेश असतो. येथे शाश्वत असं काहीच नसतं. उपभोगात बुडालेला तरुण वर्ग या भौतिक दुनियेत एवढा हरवलाय की तो स्वत:ला हरवून बसलाय.
अस्थिर बाजार व्यवस्था आणि नावीन्याची ओढ | Unstable Market and the Allure of Novelty
अस्थिर मनाने निर्माण केली अस्थिर बाजार व्यवस्था. नोकियाने बाजारात आणलेला पहिला मोबाईल एवढा मजबूत होता की त्याला ‘अमर फोन’ असं संबोधल्या जायचं. कंपनीचं घोषवाक्य होतं ‘कनेक्टिंग पीपल’. 1998 ते 2012 या काळातील ती सर्वात मोठी फोन निर्माता कंपनी होती. तिचा बाजारातील हिस्सा 40 टक्के होता. 2000 साली त्या कंपनीचं बाजारमूल्य होतं 30 हजार कोटी. नेल्सन मंडेलांपासून प्रिन्सेस डायनापर्यंत जगातील अनेक नामांकित व्यक्तींजवळ नोकियाचाच मोबाईल असायचा. कंपनीचा दरारा एवढा की ज्या देशात नोकियानं पाय ठेवला तिथलं एकहाती मार्केट हाती घेतलं. मात्र आजघडीला नोकिया कुठेच दिसत नाही. एवढी मोठी कंपनी अचानक कशी गायब होऊ शकते! बाजारात एवढी अस्थिरता, अनिश्चितता कशी काय असू शकते?
नावीन्याचा अभाव: नोकियाच्या पतनाचे कारण | Lack of Innovation: The Reason for Nokia’s Downfall
2006 मध्ये नोकियानं जोरमा ओलिल्ला यांना हटवून ओली-पेक्का यांना कंपनीचं सीईओ बनवलं. ओली यांनी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला आणि नवे प्रॉडक्ट, नवीन टेक्नॉलॉजीला अगदीच कमी महत्त्व दिलं. तोपर्यंत बाजारात टचस्क्रीन, नवीन ऑपरेटिंग सिस्टम असलेला अॅण्ड्रॉईड बाजारात आला होता. नवी टेक्नॉलॉजी लोकप्रिय झाली आणि नोकिया मागे पडत गेला. शेवटी 30 हजार कोटी डॉलर बाजारमूल्य असलेली कंपनी नोकिया मायक्रोसॉफ्टनं 2014 मध्ये फक्त 700 कोटी डॉलरला विकत घेतली. कधीकाळी 150 देशांत 40 टक्के बाजारावर एकहाती साम्राज्य करणारी कंपनीचा आजघडीला फक्त एक टक्का मार्केट शेअर आहे. कंपनीच्या सीईओनं घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळं कंपनीचा बट्ट्याबोळ झाला.
लोकांना हेच आवडतं. उपभोग्य वस्तूंमधील नावीन्यता मनुष्याला आकर्षित करते. त्यात नावीन्य नसेल तर ती कितीही टिकाऊ असली तरी बाजारात टिकत नाही. अॅम्बेसीडर, राजदूत, हरक्युलस अशा टिकाऊ उत्पादनं देणाऱ्या कंपन्या केवळ याच एका कारणानं बंद पडत गेल्यात. आता हीच नावीन्यता तरुणांच्या चिंतेला कारणीभूत ठरतेय.
मिलेनियल्सची चिंता आणि शाश्वत मूल्यांचे महत्त्व | Millennial Concerns and the Importance of Timeless Values
खर्च वाढला, आरोग्याचे प्रश्नही वाढलेत. 1981 ते 1997 दरम्यान जन्मलेल्यांना ‘मिलेनियल्स’ असं संबोधतात. सध्या यांचे वय 27 ते 44 वर्षांदरम्यान आहे. या मिलेनियल्सचा जगण्याचा प्राधान्यक्रमच बदलला असल्याचे पॉलिसी बाजारने जारी केलेल्या अहवालातून पुढे आले आहे. या तरुणांना वयाच्या तिशीतच मालकीचे घर झाले पाहिजे असे वाटू लागले आहे, तर बहुतांश तरुणांना हातातील नोकरी टिकवायची कशी, याची चिंता सतावत आहे. वित्तीय नियोजन हीच यांची खरी चिंता असल्याचा अहवाल सांगतो. हेच कारण आहे ते हृदयविकार, मधुमेह इत्यादी तणावाशी निगडित आजारांसंबंधित विमा दावे करत आहेत.
काही गोष्टींना पर्याय नसतो: अभ्यास, आरोग्य आणि पुस्तकांचे महत्त्व | Some Things Have No Alternative: The Importance of Study, Health and Books
चालणे हा सर्वोत्तम व्यायाम समजल्या जातो. ट्रेडमिल हा त्याचा पर्याय असू शकत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाण्याने जो उत्साह, आनंद मिळतो तो ट्रेडमिलवर बंद खोलीत एसीच्या वातावरणात कधीच मिळणार नाही. सकारात्मक दृष्टिकोन आणि शारीरिक आरोग्य हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत, ज्यांना कोणताही पर्याय नाही.
पुस्तकांच्या दुकानात फार तर तुम्ही पुस्तके ठेवण्याची रचना बदलू शकाल, पण पुस्तके स्वतः बदलणार नाहीत. तसेच अभ्यास करण्याची जागा तुम्ही अधिक आल्हाददायक बनवू शकाल, परंतु अभ्यासाची पद्धत कशी बदलणार? तुम्ही अभ्यास बसून करता की झोपून करता हा मुद्दा नसतो. याउलट, परीक्षेच्या वेळी तुम्हाला किती चांगलं आठवतं आणि किती चांगला स्कोअर करता येतो हेच तेवढं महत्त्वाचं असतं. यात काहीही नावीन्य नसतं, कारण काही गोष्टींना पर्याय नसतो.
आज अभ्यासाच्या सोयी अधिक सुलभ झाल्या आहेत, तरीही पुस्तकाचं महत्त्व कमी झालेलं नाही. रिविजन आणि रिपीटेशन करण्यासाठी जेवढं पुस्तक उपयुक्त ठरतं तेवढी समाजमाध्यमं ठरत नाहीत. ज्ञानार्जन करण्यासाठी पुस्तके हीच सर्वोत्तम साधने आहेत. शिवाय, पुस्तके तुमच्यासोबत बोलतात, ती डिस्ट्रॅक्शन क्रिएट करत नाहीत. याउलट, समाजमाध्यमांवर मात्र डिस्ट्रॅक्शन मोठ्या प्रमाणात होतं. म्हणूनच, पुस्तकातून अभ्यास केल्यानं जे समाधान लाभतं तेवढं समाजमाध्यमातून लाभत नाही, हा अनुभव तुम्ही स्वत:ही घेतला असेलच. अखेरीस, काही गोष्टींना पर्याय नसतो असं जे म्हटल्या जातं ते उगाच म्हटल्या जात नाही हे सिद्ध होतं.