तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसाच्या मेंदूचाही ताबा घेतला हे सारासार विचार करण्याची क्षमता गमावलेल्या आणि अति-आत्मकेंद्रित वृत्ती बळावलेल्या माणसाला कळलेसुद्धा नाही. याचे दृश्य परिणाम तरुणाईवर दिसायला लागलेत. मानसिकतेबरोबरच शारीरिक आरोग्याच्या हिंदोळ्यावर हेलकावत असलेल्या तरुणाईला अंशत: जाग यायला लागली. याला वाचन संस्कृतीची वाचलेली लव्हाळेच कारणीभूत ठरतायेत. ही वाचन संस्कृती तरुणांना मानसिक स्थैर्य आणि समृद्धीकडे घेऊन जाते.
इटलीमध्ये ‘आनंद देणारा आळशीपणा’ (Dolce far niente) हा शब्द फार प्रचलित आहे. धावपळीतून स्वत:साठी वेळ काढण्याचा हा एक अनोखा प्रकार आहे. हळूहळू हा प्रकार आता जगभर रुजतोय. आपण जे काम करतोय त्यात मुद्दामून आनंद निर्माण करण्यासाठी या पद्धतीचा वापर केल्या जातो. म्हणजेच, जीवनातील धावपळ आणि ताण कमी करण्यासाठी स्वतःसाठी शांत वेळ काढणे आवश्यक आहे.
स्पर्धेचे दुष्परिणाम आणि मानसिक ताण | Impact of Competition and Mental Stress
शैक्षणिक क्षेत्रातील प्रचंड स्पर्धा, पालकांच्या अपेक्षांचा ताण, समाजमाध्यमावरील चुकीचे आदर्श, आर्थिक समस्या, करियर, शिक्षण, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनिश्चितता, एकटेपणा इत्यादी बाबी तरुण मनावर मोठा परिणाम करतात. शिवाय, करियर निवडीबाबत संभ्रम आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दीर्घ कालावधीच्या प्रक्रियांमुळे तरुणांमध्ये नैराश्य जाणवते. सेरोटोनिन आणि डोपामाईन यासारख्या न्युरोट्रान्समीटरच्या कमतरतेमुळे मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडते. त्यामुळे विस्मरण, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव, ताण-तणावाची एक साखळी (चेन) निर्माण होते.
बरं, त्यातून बाहेर पडण्याऐवजी तरुण त्यात अधिक अडकत जातो. कारण तो त्याच्या लागलेल्या सवयी मात्र बदलण्यास तयार नसतो. आत्मसन्मानाचा अभाव आणि नकारात्मक विचारशैलीमुळे मेंदूचा ताबा घेतलेला असतो. त्यामुळे नैराश्यातून बाहेर पडणे त्याला अवघड जाते. अशा वेळी, निराशेचं उदात्तीकरण टाळून त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे ठरते. त्यात सामाजिक दबाव, मित्रमंडळीच्या अपेक्षा, कुटुंबीयांचे वर्तन आणि समाजमाध्यमातील सहज मिळणारी मोठेपणाची काल्पनिकता आगीत तेल ओतण्याचं काम करते. वास्तविकता स्वीकारण्याऐवजी जे तरुण या चक्रव्यूहात अडकतात ते निराशेत ढकलले जातात. जे वास्तविकता स्वीकारतात, जे आहे जसं आहे त्याचा स्वीकार करून त्यातून बाहेर निघण्याच्या वाटा शोधतात ते कालांतराने यशस्वी ठरतात. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनात पुढे जाणे शक्य होते.
डिजीटल व्यसनापासून मुक्ती आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व | Freedom from Digital Addiction and Importance of Reading Culture
टीव्ही स्क्रीन, मोबाईल फोन, लॅपटॉपसमोर जास्त वेळ बसल्याने एकतर शारीरिक हालचाली कमी होतात. उलट, स्क्रोलिंगमध्ये सतत कार्यशील राहिल्याने मेंदू थकतो. शिवाय, मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश ज्याला ‘हाय एनर्जी व्हिजीबल लाईट’ असं म्हणतात, तो डोळ्यांवर परिणाम करू शकतो. आवश्यकतेपेक्षा कोणतीही गोष्ट केल्यास त्याचे नकारात्मक परिणामच होतात. त्याऐवजी आपण पुस्तक वाचनाला प्राधान्य दिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यास मदतच होते. जे दीर्घकाळ डिजीटल डिव्हाईससमोर राहतात त्यांना सुद्धा हे कळतं. अभ्यासाची खरी मजा पुस्तकातूनच घेता येते असं तेही मान्य करतात. मात्र सवयी सहजासहजी सुटत नसतात, मग त्याचे परिणामही भोगावे लागतात. चांगल्या सवयी अंगीकारल्यास हे टाळता येते आणि वाचन संस्कृती वाढते.
शांतता आणि एकाग्रतेसाठी मौन | Silence for Peace and Concentration
आपण शरीराची काळजी घेतो पण मेंदूकडे फारसे लक्ष देत नाही. आजकाल प्रत्येकाला हायपरकनेक्टेड आयुष्यात मौन व शांततेचे क्षण अतिदुर्मिळ झाले आहेत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत आपण विविध सूचना, नोटीफिकेशन व सोशल मिडीयाच्या न संपणाऱ्या स्क्रोलमध्ये गुंतलेले असतो. याचा परिणाम आपल्या रक्तदाबावर आणि एकाग्रतेवर होतो. शांतता मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठातील न्युरॉलॉजी तज्ज्ञ डॉ. रिचर्ड सायटोविड यांनी केलेल्या अभ्यासानुसार मौन ही आपल्यासाठी सर्वोत्तम ताकद आहे. मात्र त्यासाठी अतिउत्साहीपणा, चिडचिडेपणा, तुटून पडण्याची वृत्ती टाळणे ही पहिली पायरी आहे. डॉ. रिचर्ड म्हणतात, आपण तंत्रज्ञानात इतके गढून जातो की, त्यामुळे बराच काळ अगदी निष्क्रिय होऊन जातो आणि हेच मोठे नुकसानकारक ठरते. स्ट्रेस हार्मोनवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुस्तक वाचन, निसर्गाचे सान्निध्य, मौन धारण करून चालणे अतिशय उपयुक्त ठरते आणि त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो. वाचनाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे फायदे अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पुस्तकांची लवचिकता आणि वाचन संस्कृतीचे पुनरुत्थान | Resilience of Books and Revival of Reading Culture
नव्वदीच्या दशकात डिजीटल क्रांती झाली आणि त्याचा पहिला दृश्य परिणाम अमेरिकेत पहायला मिळाला. तेथील पुस्तकांची दुकाने धडाधड बंद व्हायला लागली. ‘बॉर्डर्स’ने तर त्यांच्या चारशेहून अधिक पुस्तकांच्या दुकानाला टाळे ठोकले आणि दहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला. त्यानंतर पुस्तकांची चेन असलेल्या ‘वाल्डन बुक्स’, ‘क्राऊन बुक्स’ सारख्या साखळ्याही तुटल्या. मात्र अशा परिस्थितीतही काहीजण पुस्तकांच्या प्रेमापोटी पुस्तकांची दुकाने थाटायला निघालीत. अर्थात, त्यांनाही आपलं दुकान चालेल की नाही याची भीती होतीच. म्हणून जोश स्पेन्सर या तरुणाने त्याच्या दुकानाचं नाव ‘द लास्ट बुक स्टोअर’ असं ठेवलं.
तोपर्यंत डिजीटलमुळे हात पोळून घेतलेला एक वर्ग निर्माण झाला होताच. तो वर्ग आणि पुस्तकप्रेमींनी अशा दुकानांचा मार्ग पकडला आणि पुस्तकांच्या दुकानांवरील गर्दी वाढायला लागली. पुस्तकांच्या सहवासात राहून पुस्तक निवडणं, ते वाचायला विकत घेणं आणि महिन्यातून किमान एकदा बुक स्टोअरला भेट देणं हा पुस्तकप्रेमींचा सवयीचा भाग झाला. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ या उक्तीप्रमाणे लहान दुकाने लवचीकता स्वीकारून चिवटपणे टिकून राहिली आणि आता तर बहरायला सुद्धा लागलीत. हे वाचन संस्कृतीचे पुनरुत्थान आहे.
निरोगी मन आणि समृद्ध जीवनासाठी वाचन संस्कृती | Reading Culture for a Healthy Mind and Rich Life
वाचन संस्कृती टिकवणं हे महत्त्वाचंच आहे. यासाठी आज जे जे पुढाकार घेतील ते भविष्याचाही सुखद आनंद घेतील. पुस्तकांच्या सहवासात कोणी निराश झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं का? कारण पुस्तकं माणसं घडवतात. पुस्तकं वाचताना डिस्ट्रॅक्शन होत नाही. वाचनाचा खरा आनंद मिळतो. हेच कारण असावं वॉरन बफेट असो वा बिल गेट्स असो यांचं ग्रंथालय हजारों पुस्तकांनी समृद्ध असल्याचं मुद्दामून सांगितल्या जातं. खरं तर पुस्तक वाचनाचं महत्त्व आजही तितकंच टिकून आहे जेवढं ते आधी होतं, उलट कदाचित ते अधिक वाढलंच असावं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. खरं तर तरुणांचा मनविध्वंस थोपविणारी ही लव्हाळेच मेंदूची सुपीकताही टिकवून ठेवतील आणि त्यांना एक निरोगी, समृद्ध जीवन देतील.