एकाग्रतेने अभ्यास: यशाची गुरुकिल्ली | Focused Study: Key to Success

तुम्ही किती तास अभ्यास करता हे फारसं महत्त्वाचं नसतंच, तर तुम्ही किती एकाग्रतेने अभ्यास करता हे जास्त महत्त्वाचं असतं. एकाग्रतेने अभ्यास करणे हे मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. चिंता आणि तणाव हे एकाग्रतेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. म्हणूनच एकाग्रता मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागा बदलण्यापेक्षा आपल्या मनाच्या अवस्थेवर काम करायला हवं.

आम्ही अमूक स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, ती परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किती तास अभ्यास करायला हवा? असा प्रश्न कायमच विचारला जातो. कोरोना काळानंतर असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. खरं तर तेव्हापासूनच आम्ही साप्ताहिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत याबाबतीत मानसशास्त्रीय शोध आणि संशोधनाबद्दलची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करायला लागलो. अर्थात अनेक संशोधनातील निष्कर्षामध्ये साम्य असल्यामुळे माहितीचं रिपीटेशन होत आहे असं काही वाचकांना वाटायला लागलं. मुळात हे वाचक संशोधनाच्या खोलवर गेलेच नाहीत.

माहितीचा भडिमार आणि अभ्यास पद्धतीतील त्रुटी | Information Overload & Study Flaws

दरम्यान ऑनलाईनचं पेव फुटलं आणि सर्वकाही फुकट मिळायला लागलं. आता विद्यार्थ्यांसमोर माहितीचा साठाच होता. त्यानं ती माहिती मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला, पण तो फक्त माहिती मिळवत गेला. त्याची पुनरावृत्तीचे उपाय त्याला योजताच आले नाहीत; त्यासाठी त्याला वेळही मिळाला नाही. परिणामी आपण काल कोणती माहिती मिळविली हे त्याला आज आठवेनासे झाले. हे लक्षात येऊनही त्याने आपल्या अभ्यासपद्धतीत बदल केला नाही. तो पुढे पुढे चालत राहीला. परंतु जेव्हा १२-१२ तास अभ्यास करूनही मॉक टेस्टमध्ये त्याला पाहिजे तेवढे गुण मिळाले नाहीत, तेव्हा तो हादरला. मग त्याने अभ्यासाचे तास अधिक वाढवले, पण अभ्यास पद्धती तीच राहिली. त्यातून फारसे हाती लागणारे नव्हतेच, त्यामुळे तो निराश व्हायला लागला.

त्यात अधिक भर टाकली बाजारात आलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नसंचांनी. आपला ब्रेन वस्तुनिष्ठ माहिती लक्षात ठेवत नाही हेच त्याला माहिती नव्हतं. एखादं स्तोत्र पाठ करावं तसा त्याचा अभ्यास सुरू होता. याचाही परिणाम व्हायचा तोच झाला. जेव्हा चार पर्यायांमधून अचूक पर्याय निवडायची वेळ यायची, तेव्हा त्याचा गोंधळ अधिक वाढायचा. माहिती असूनही आणि अनेकदा वाचन केलेले असूनही त्याची उत्तरं चुकायला लागली. यामुळे विद्यार्थ्यांची निराशा वाढू शकते, जी त्यांच्या अभ्यासातील एकाग्रतेला बाधा आणते.

एकाग्रतेने अभ्यास: योग्य दिशेने वाटचाल | Focused Study: Moving in the Right Direction

नेमकं असं का घडतंय, यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायला हवा यासाठी प्रस्तुत साप्ताहिकातून आम्ही मार्गदर्शनपर लेख द्यायला लागलो. नियमित वाचकाने त्याच्या अभ्यास पद्धतीत बदल केला, तो यशस्वीही झाला. काहींनी आम्हाला मनोगतही पाठविले. मात्र आपला मित्र अभ्यास करताना चुकतोय, त्यानेही अभ्यासपद्धतीत थोडासा बदल केला तर त्यालाही लवकर यश मिळू शकते असं मित्रांना ठासून सांगणारा वर्ग अतिशय कमी होता. त्यांचंही काही चुकत नव्हतं. अनेकदा सांगूनही काहीजण बदलायलाच तयार नव्हते. फक्त मेहनत वाढविल्याने यश मिळते असं मानणारा एक वर्ग होता जो ऐकायलाच तयार नव्हता. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे ठरते.

आता पोलीस भरती प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या निमित्ताने हा वर्ग पुन्हा साप्ताहिकाकडे वळला. त्याने स्वतःला बदलायचं ठरवलं. आतापर्यंत आलेल्या स्वानुभवातूनही तो बरंच काही शिकला. त्याने स्वतःच्या मनाला स्थिर केलं. अर्थात हे अत्यंत अवघड होतं, पण ठाम निश्चय केला की सर्वकाही शक्य असतं. अशा निर्धारपूर्वक वाटचाल करणाऱ्या वर्गाने मोबाईल डिस्ट्रॅक्शनला एका लिमिटमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला, हे बरं झालं.

क्षमता आणि एकाग्रतेने अभ्यास: यशाची गुरुकिल्ली | Capacity & Focused Study: Key to Success

स्वतःच्या क्षमतांना ओळखणं महत्त्वाचं असतं. तुमच्यात क्षमता तर खूप आहेत, पण ऊर्जेच्या अपव्ययामुळे त्याचा सदुपयोग होताना दिसत नाही. त्या ऊर्जेला एकत्रित करून एकाच ध्येयावर केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण प्रेरणात्मक वाचन वाढवावे. एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी योग्य मानसिक स्थिती आवश्यक आहे. अभ्यासाचे तास कमी केले तरी चालतील, पण जेवढा वेळ अभ्यास करता तेवढा वेळ एकाग्र मनाने होणे गरजेचे आहे. यासाठी ज्या अभ्यासाच्या सुयोग्य पद्धती असतील त्याची आपण टप्प्या-टप्प्याने येथे बघणार आहोतच!

Leave a Comment